आणि सुदैवाने डॉ. हेडगेवार हॉस्पीटल भाराणी आयसीयु आगीमधून बचावले

नंदा मार्केटमध्ये आमचे डॉ. हेडगेवार हॉस्पीटल - भाराणी आयसीयु आहे. हॉस्पिटलला लागून अनेक छोटे मोठे व्यावसायिक आहेत. यातच हिंद गादी कारखान्याचा समावेश आहे. रोजच्या प्रमाणे आम्ही सर्व स्टाफ आपापले दैनंदिन कामे करीत होतो. बिलिंग क्लार्क म्हणून माझे काम सुरु होते. साधारण ऑक्टोबर महिना. .......आग ... आग ... आवाज कानी पडताच आम्ही दचकलो. प्रथम वाटले, एवढे तेवढे काही तरी असेल. पण तरी बाहेर धावलो. पाहिले तर आमच्या हॉस्पीटल लगतचा गादी कारखाना पेट घेत होता. पाहता पाहता आग वाढत होती.

आग दिसल्याने गार्ड नितीन टेकाडे यांनी सांगितले, गादी कारखान्याला अचानाक आग लागली आहे. कारखान्याचे मालकही सुदैवाने हजार होते. मी वार्ड बॉय कुशल दोडेला सोबत घेतले. त्यालाही आगीचा धूर दिसला आणि आम्ही दोघेही बाहेर धावलो. आम्ही कार्यकर्ते अशा वेळी मदतीला नेहमीच सज्ज असतो ! आम्हाला समय सूचकता आणि निर्भीडपणाचे प्रशिक्षण दिले जाते आणि त्याची कसोटी घेणारा हा निर्णायक क्षण होता ! आम्ही पाहिले तेव्हा आग सौम्य होती पण कापूस आणि कापड ह्या दोन्ही गोष्टी आगीला पूरक असल्याने काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले. मग आम्ही सुचेल तसे उपाय सुरु केले. बादली, डस्टबिन .... जे हाती लागेल त्याने पाणी मारणे सुरु केले. पण आग आटोक्यात येईना. दरम्यान लोक जमले. फायर सिस्टीमचे पाईप काढले पण धावताना नेमका मी खाली पडलो. मला खांद्याला मार लागला, पण लक्ष नं देता मी आग विझवणे महत्वाचे, हे लक्षात घेऊन धावलो. कारखाना वाचविणे, हे तर डोक्यात होतेच. शिवाय मनात विचार आला की, जवळच, अगदी लागुनच आमचे हॉस्पीटल आहे. हॉस्पीटलची करोडोची महागडी सामग्री, शेकडो कर्मचारी आणि रुग्ण, आप्त ...आणि जवळच हॉस्पिटलचे छोटे मोठे ऑक्सिजन सिलेंडर्स .... जर आग पसरली असती तर केवढा अनर्थ ओढवला असता. सगळ्यांचे जीव आणि लाख मोलाची सामग्री धोक्यात होती. काय करावे सुचेना. फायर सिस्टीमचे पाईप उचलून जीवाची पर्वा न करता धावलो. दरम्यान हॉस्पिटलचे कर्मचाऱ्यांनी महापालिकेला कळविले. आयसीयुचे प्रमुख डॉ. श्याम गिरी सरांनी समय सूचकता दाखवली. त्यांनी मागच्या दाराने हॉस्पिटलचे रुग्ण आणि आप्त, कर्मचारी यांना सुरक्षित बाहेर काढण्याची तयारी केली. तोवर रुग्णांना आयसीयु व जनरल वार्डच्या रुग्णांना रूम बाहेर, मोकळ्या जागेत हलविले. मुख्य प्रशासकीय अधिकारी मंगेश कुळकर्णी, व्यवस्थापक केदार गोगरकर, वैद्यकीय अधिक्षक डॉ. राजेंद्र इंगोले, सहकारी डॉ. शिल्पा गारोडे आणि अन्य सहकारी पुन्हा वेगळ्या कामी लागले. कारण आग बरोबर जनरल वार्डच्या खाली पेटली होती! फायर सिस्टीम मजबूत असल्याने ती आग विझविताना योग्य वेळी कामी आली. त्या पाईपने लगेच काम केले. पाईपमधील पाण्याला इतका वेग असतो की ते सांभाळताना मी पुन्हा दोनदा मागे खेचल्या गेलो व पडलो. आगीचा धूर नाकातोंडात जात असल्याने गुदमरल्यासारखे होत होते. पण सगळ्याकडे दुर्लक्ष करीत आग विजवत राहिलो. त्यात जवळच विजेचे जिवंत तार आणि वरून पडणारे पाणी यामुळे शॉक लागण्याचा मोठा धोका होता.

पण एकच लक्ष होते.... आगीवर नियंत्रण आणणे ! आग जवळपास आटोक्यात आली. महापालिकेचे अग्निशमन दल व पोलीस पोहचले होते पण तोवर आग बरीच आटोक्यात आली होती. आम्ही थोडे निश्चिंत झालो. पण कापूस बाजूला हलवताच आग पुन्हा पेटली कारण आतील कापूस कोरडाच होता व पेट घेऊ लागला. मग सारी यंत्रणा कामी लागली आणि मोठा अनर्थ टळला. करोडो रुपयांची वित्त हानी व प्राणहानी टळली.
सगळे स्थिरस्थावर झाल्यावर मग मला जाणवले की, आपल्याला लागले आहे, मग मी उपचार केले. आठ दिवस जखम आणि मार त्रास देत होता. अजूनही ती जागा ठसठसते तेव्हा तेव्हा आग लागल्याची घटना आठवते. मात्र समाधान आहे की आम्ही जो खारीचा वाटा उचलला यामुळे मोठा अनर्थ टळला...

 

प्रज्वल घाटोळ
कुशल दोडे