एक रुग्णानुभव असाही !

रोज दवाखान्यात गेले की रुग्णांच्या कितीतरी प्रकारच्या समस्यांना आम्हा डॉक्टरांना तोंड द्यावे लागते. कोणाची शस्त्रक्रिया आहे तर पैसे नाहीत, हे तर नेहमीचेच. अशा वेळी आम्हाला आमचे वैद्यकीय कौशल्य, माणुसकी आणि त्यांना मदत कशी करता येईल, हा विचारही महत्वाचा ठरतो .असे रुग्ण मनात घर करून राहतात तर त्यांच्या मनात डॉक्टर !

नेहमीप्रमाणे मी ओपीडीमध्ये सकाळी पोहचलो आणि रुग्ण तपासणी सुरु झाली. काही रुग्ण तपासून झाले आणि एक अशक्त , थकलेली, त्रस्त महिला रुग्ण दीनवाणेपणे आत आली .ती मध्यमवयीन स्त्री आत येताच तिने तिला होणारा त्रास सांगण्यास सुरुवात केली .

“गेली ५ वर्षे मला गिळताना त्रास होतो आहे. मी अनेक डॉक्टर्सना दाखवले . काही टेस्ट झाल्या, औषधे घेतली .... पण थोडे दिवस बरे वाटले की पुन्हा त्रास सुरु होतो. पुन्हा अनेक दिवस झाले मला गिळण्यासाठी त्रास होतो आहे .

“मी त्या रुग्ण स्त्रीकडे पाहताच नजरेत भरली तिच्या गळ्यावर बाहेरच्या बाजूने असलेली भली मोठी सुज ! तिच्या मानेपासून खालच्या जबडयापर्यंत सुज गेलेली होती .अर्थातच तिला मानेची खालवर हालचाल करणे अशक्य झाले होते त्यांना . ती सुज गाठ स्वरुपाची होती. तिला तपासल्यावर ती Nodular Goitre म्हणजे थायराईड ग्रंथीची झालेली मोठी वाढ होती ! मी त्यांना या ग्रंथीबद्दल व त्यावर कराव्या लागणाऱ्या शस्त्रक्रियेबद्दल सविस्तर सांगितले. तेव्हा ती ढळढळ रडावयास लागली. मी त्यांची समजूत घातली की, शस्त्रक्रिया मोठी आणि जोखमीची असली तरी आपण १०० टक्के प्रयत्न करू. त्यावर त्या म्हणाल्या, मला शस्त्रक्रियेची चिंता नाही. चिंता आहे ती शस्त्रक्रियेसाठी आवश्यक पैशाची. माझ्याकडे काहीही पैसेच नाहीत. हातावरचे पोट आमचे. ही शस्त्रक्रिया योजने मधून कमीत कमी दरात करण्याविषयी दिलासा दिला, तेव्हा तीला मोठा धीर आला. या शस्त्रक्रियेसाठी आवश्यक विविध तपासणी, चाचणी यासाठी त्यांना बरेचदा यावे लागले. रुग्ण बाहेरगावाहून येत असल्याने पैसे खर्च होताच होता. हळूहळू सर्व तपासण्याही करून घेतल्या.नंतर त्यांची समजूत घातल्याने त्यांना धीर आला. शस्त्रक्रीयेसाठी लागणारी सर्व तयारी मी करून घेतली. त्या रुग्णाला भरती होण्यास सांगितले. त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाइकही होते. त्या आप्तांपैकी एक महिला म्हणाली, डॉक्टर साहेब, या पूर्वी तुम्ही माझे यशस्वी ऑपरेशन केले आहे. यामुळे माझ्या नातेवाईकांना तुमच्याकडे मोठ्या विश्वासाने पाठविले होते.

शस्त्रक्रियेचा दिवस उजाडला ! सगळे इंस्ट्रुमेंट्स, अनास्थेसिसस्ट, सगळा स्टाफ सज्ज झालो. शस्त्रक्रियेची सगळी तयारी नीट झाली आहे, हे तपासून शस्त्रक्रियेला सुरुवात झाली . ती गाठ विस्तृत असल्याने त्याची attachements काढायला मला बराच वेळ लागला. पण कमीत कमी रक्तस्त्रावामध्ये ती शस्त्रक्रिया व्यवस्थित पार पडली. ओटी नोटस टाकून, औषधे लिहिली. ऑपरेशन थीएटरच्या बाहेर येताच नातेवाइकांशी चर्चा झाली. त्यांनाही धीर दिला. त्यांच्या शंकाचे निरसन झाले. मी देखील समाधानाने घरी गेलो. मोठी शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने मलाही मनाला असीम समाधान मिळाले. सर्व टेन्शन दूर झाले. दुसऱ्या दिवशी पुन्हा हॉस्पिटलला गेलो. ऑपरेशन नंतर राउंड घ्यायला गेलो तेव्हा त्या महिला रुग्णाच्या डोळ्यात पाणी तरळत होते. ते आनंदाश्रू होते. ती म्हणाली, सर, गेले ५-६ वर्षात एक रात्रही मी शांतपणे झोपू शकली नाही. पैश्यांची अडचण मोठी असल्याने मी कुणालाही बोलू शकत नव्हती. सर, माणसाला सगळी सोंगे आणता येतात, पैशाचे नाही ... काल कितीतरी दिवसात मी रात्री शांत झोपले. तेही तुमच्यामुळे ! माझ्यासाठी तुम्ही देव आहात सर.

“त्या महिला रुग्णाचे ते बोलणे ऐकून मी स्तब्ध झालो . निःशब्द झालो.. एका पिडीतेचे ते शब्द ऐकून माझेही डोळे पाणावले ! एका पीडीतेला आणि आर्थिक दुर्बल स्त्रीला दुःखमुक्त केले आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाला दिलासा दिला.... आपण डॉक्टर आहोत आणि म्हणूनच हे करू शकलो, हेही तितकेच खरे. पाचव्या दिवशी त्या महिला रुग्ण आनंदाने आणि वेदनामुक्त होवून घरी गेल्या. अनेक पेशंट्सला माझ्याकडे मोठ्या विश्वासाने पाठवतात. कृतज्ञतेपोटी कधीही सहज भेटायला येतात... मी एक माणूस आणि डॉक्टर म्हणून यशस्वी असल्याची दुसरी मोठी पावती कोणती?

 

डॉ. रवी गणेशकर
कान, नाक, घसा व कॅन्सर तज्ञ