न्युरोसायकियाट्रीस्टची डायरी

आकाशला होणारे भास , सतत दिसणाऱ्या व भीती दाखवणाऱ्या प्रतिमा यामुळे तो स्वतः आणि पालकही घाबरले . मात्र समुपदेशन व औषधांनी सगळे सुरळीत झाले .
एका १४ वर्षाच्या मुलाला ( काल्पनिक नाव आकाश ), आकाशला शहरातील एका सुप्रसिद्ध बालरोग तज्ञांनी माझ्याकडे उपचारासाठी पाठविले. गेल्या काही दिवसांपासून आकाश नॉर्मल वागत नव्हता. स्वतःशीच काही असंबद्ध बोलत होता , पुटपुटत होता. त्याचे ते बोलणे ,तो काय म्हणतो, काय करतो आणि असे का करतो, हे पालकांनाही समजत नव्हते. पालक काय सांगत आहेत, याचेही आकलन त्याला होत नव्हते. साहजिकच पालक घाबरले.

आकाशला तो असे का वागतो, याविषयी काही विचारले असता तो प्रश्न टाळत होता, दुर्लक्ष करीत होता. परंतु जेव्हा हे लक्षण वाढले आणि तो वारंवार तेच करू लागला तेव्हा त्याचे अभ्यासातील लक्ष उडाले. त्याची एकाग्रता कमी झाली. मित्रांसोबत खेळणारा आकाश हळूहळू खेळेनासा झाला. उदास आणि निराश राहू लागला. आई-वडिलांनी तो असं का वागतो, याची वारंवार चौकशी केल्यावर त्याने सांगितले की त्याला त्याच्या जवळच्या प्रियजनांचा मृत्यू दिसतो, लोक त्यांना स्मशानभूमीत घेऊन जात आहेत असे भास होतात ... आई-वडील, आजी-आजोबा, बहिणी, काका इ. या प्रकाराने तो घाबरला होता.
स्वप्नात सुरुवातीला त्याला शेजाऱ्याचा मृतदेह दिसला आणि त्या नंतर हे चक्र सुरु झाले. पुढे आप्तजनांचे मृत्यू दिसू लागले. आधी त्याने इतर काही कामात, छंदात मन रमविण्याचा प्रयत्न केला. पण कोणत्याही मृत व्यक्तीला स्मशानभूमीत नेताना पाहिले की त्याचे मन पुन्हा आप्तजनांच्या मृत्यूचा भीतीदायक भासांकडे वळे आणि वरचेवर हे भास, ही लक्षणे अधिकाधिक काळ टिकू लागली. हळुहळू रस्त्यावर, घरी, शाळेत अथवा नातेवाईकाच्या घरी असे सर्वत्र भास होऊ लागले. तो अगदी खेळताना, टीव्ही किंवा मोबाईल पाहतानाही अस्वस्थ राहू लागला. "मला जे दिसते ते खरे नाही, असे काही होणार नाही. "असे तो स्वतःशी म्हणत राही पण त्यातून स्वतःची सुटका करून घेणे त्याला अशक्य होऊ लागले. तो मिसळेनासा झाला. सगळ्यांपासून तो दूरदूर राहू लागला, बोलताना हळू बोलू लागला, त्याचा आत्मविश्वास कमी झाला. त्याचे बोलणेही पालक, शिक्षकांना असंबद्ध वाटू लागले. परिस्थिती चिंताजनक झाली.

अशा अवस्थेत आकाश माझ्याकडे आला. त्याच्या लक्षणांचा व इतर सर्व बाबींचा यथायोग्य विचार करून, त्याच्या या अवस्थेचे निदान हे ऑब्सेसिव्ह कॉम्प्लेसिव्ह डिसऑर्डर असल्याचे आमच्या लक्षात आले. आकाशने या सर्वातून मुक्त होण्याची त्याची इच्छा आहे व त्यासाठी उपचारांमध्ये संपूर्ण सहकार्य करण्याची तयारी बोलून दाखवली. ऑब्सेसिव्ह कॉम्प्लेसिव्ह डिसऑर्डर हा एक असा विकार आहे, ज्यामध्ये सतत नको ते विचार रुग्णाच्या मनात येतात. प्रतिमा आवेगामुळे त्याला अस्वस्थता जाणवते. त्याला त्रास होतो किंवा मनात विनाकारण चिंता निर्माण होते. मनाच्या या अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी वैद्यकीय उपचार व तज्ञांकडून समुपदेशन या दोन्ही मार्गांचा वापर करता येतो. आकाशचे कौन्सेलिंग सुरु झाले. हळू हळू त्याचे वर्तन नॉर्मल होत असल्याचे जाणवले. त्याला होणारे भास, स्वप्न कमी झाले. त्याच्या कुटुंबियांना देखील समाधान वाटू लागले. पण उपचार काही दिवस घेणे आवश्यक असते. मध्येच उपचार सोडून देणे अधिक घातक असते. आकाशच्या उपचाराचा संभाव्य कोर्स आणि रोगनिदान , आजाराचे स्वरूप , उपचार पद्धती आणि उपचारांबद्दल पालकांना समजावून सांगताना त्यांचेही समुपदेशन करण्यात आले . .

आकाशचे औषधोपचार आणि समुपदेशन सत्र सुरू झाले. १ महिन्यात हळुहळू त्याच्यात सुधारणा होऊ लागली . आजाराची पुनरावृत्ती कमी होणे, चिंता कमी होणे आणि दिवसेंदिवस त्याला होणारे भास ३० ते ४० टक्के कमी झाले. त्याचे वागणे आता जाणवण्याइतके नॉर्मल होऊ लागले होते. पण पालकांना याची जाणिव करुन दिली की , या आजारात सुधारणा होण्यास वेळ लागू शकतो आणि आपण संयम बाळगला पाहिजे. सुदैवाने पालकांनी मी सुचविलेले इतर उपाय व औषधोपचार सुरू ठेवण्याचे मान्य केले.

दोन महिन्यांच्या उपचारानंतर आकाशला ६० ते ७० टक्के आराम दिसून येत होता, तो शाळेत जाऊ लागला आणि कॉलनीत त्याच्या मित्रांसोबत खेळू लागला. त्याने सांगितले की भीतीदायक काही प्रतिमा अजूनही त्याला काही वेळा दिसतात परंतु त्याला आता त्याचा त्रास होत नाही आणि तो आता त्याकडे दुर्लक्ष करण्यास सक्षम आहे. यामुळे पालकांना वाटले की सुधारणा जवळजवळ पूर्ण १०० टक्के झाली आहे. अशा वेळी पालकांना उपचार पूर्ण आले असे वाटते आणि त्यांची घाई सुरु होते. ते विचारतात की उपचार आता थांबवता येतील का? रुग्ण आणि पालक यांच्या संपूर्ण सहकार्याच्या दृष्टीने हा उपचारांमधला सर्वात कठीण टप्पा आहे ! रूग्णाला पुन्हा भविष्यात असा त्रास होऊ नये यासाठी उपचार थोड्या दीर्घ कालावधीसाठी घ्यावे लागतात. या लक्षणांची पुनरावृत्ती सहसा होत नाही. १०० टक्के सुधारणा झाल्यानंतर काही महिने उपचार सुरू ठेवण्याची गरज असल्याचे मी स्पष्ट केले, तेव्हा पालकांची नाखुषी स्पष्ट होती, परंतु तरी नाखुशीने का होईना त्यांनी उपचार सुरु ठेवण्यास सहमती दर्शवली.
६ महिन्यांच्या उपचारानंतर आकाशने ओपीडीमध्ये पुन्हा पाऊल टाकले, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर प्रसन्न हास्य होते. पहिल्यांदाच, तो माझ्या चेंबरमध्ये समुपदेशनासाठी एकटा, स्वतंत्र बसला होता. मी काही डोज व औषध कमी करू लागलो. पुढे उपचारांती त्याच्या प्रकृतीत. मानसिकतेत पूर्ण सुधारणा झाल्या.

आकाश आता १० वी मध्ये शिकतो आहे. त्याची बोर्डाची परीक्षा आहे. समुपदेशन करून आणखी काही महिन्यांनी त्याची औषधे पूर्णपणे बंद होतील. त्याला वाटणारे भय, भास, त्याला दिसणाऱ्या आकृती, त्याचे स्वतःशीच चालणारे संभाषण हे सगळे थांबेल. तो पूर्वीसारखा आनंदी आणि नॉर्मल मुलगा असेल, विद्यार्थी असेल. इतर सामान्य मुलांसारखे त्यालाही आता आपले भविष्य घडवता येईल. स्वप्नांच्या उंच भराऱ्या घेता येतील.

 

डॉ.अक्षय चांदुरकर