संपादकीय

जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले !
तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा !!

राष्ट्रसंत तुकाराम महाराजांच्या या अभंगातून खऱ्या माणुसकीचे दर्शन होते एखाद्याचे दुःख समजून त्याचे निवारण करण्यासाठी माणसाकडे संवेदनशील मन असणे आवश्यक आहे.
वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतल्यावर पहिली गोष्ट जी आम्हाला शिकविण्यात आली ती म्हणजे रुग्णाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सहानुभूतीपूर्ण न ठेवता संवेदनशील पूर्ण असावा कारण एखाद्याला सहानुभूती देणे, दिलगिरी व्यक्त करणे फार सोपे असते परंतु त्याच्या अंतरंगात शिरून त्यांच्या मनातील भावना समजून घेणे फार अवघड आहे. रुग्णाला त्याच्या वेदनेपासून दूर करून सर्वदृष्टीने बरे करण्यासाठी संवेदनशीलतेची गरज असते.

आपल्या आजूबाजूला बरेच लोक दुःखाने, वेदनेने ग्रासलेले असतात या वेदना शारीरिक, मानसिक याचबरोबर सामाजिकही असू शकतात अशावेळी त्यांचे दुःख हे आपलेच आहे असे समजून त्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी व सावरण्यासाठी आपण तत्पर असावे.

सावरणे म्हणजेच वेदनेतून बरे होणे ही काही सहज सोपी गोष्ट नाही कुठल्याही मानसिक आघातातून, आजारातून किंवा अपघातातून सावरण्यासाठी औषधांबरोबरच मनाचा संयम, धैर्य व सहनशीलतेची गरज असते व बरोबर गरज असते असते ती संवेदनशील मित्र परिवाराची, नाहीतर कधीही न भरणारी जखम घेऊन जगणे हा किती मोठा अभिशाप आहे ते त्या अश्वत्थामालाच माहित.
संवेदनेचा हाच धागा घेऊन या वेळच्या निरामयच्या अंकाची माळ ओवण्याचा प्रयत्न करीत आहोत.

14 नोव्हेंबर हा बालदिन म्हणून साजरा होतो बालकांचे संगोपन, त्यांचा आहार, आजार व उपचार याविषयी आपण नेहमीच वाचत असतो परंतु या अंकात बालकांचे यौन शोषण व त्यावर प्रतिबंध करण्यासाठी 2012 यावर्षी पारित करण्यात आलेल्या पॉक्सो ऍक्ट विषयी माहिती पर लेख अॅड. अंजना बोकारे मॅडम यांनी लिहिला आहे. भारतीय शास्त्रीय संगीताची अविट गोडी केवळ मनाला तृप्तच करत नाही तर ती कित्येक आजारांवर उपचार म्हणूनही वापरता येते त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया 'Healing with Music' या श्री. आशिष साबळे यांनी लिहिलेल्या लेखामध्ये, डॉ राजेश इंगोले सर हे स्वतः पॅथॉलॉजिस्ट असून आपल्या डॉ. हेडगेवार हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय अधीक्षक या पदावर नव्यानेच रुजू झाले आहेत. ' वैद्यकीय चाचण्या महत्त्वाचीच ' हा अगदी सहज सोप्या भाषेत माहीती देणारा त्यांचा लेख समाविष्ट केला आहे.

'ओंजळ निरामय आरोग्य सुमनांची' या कवितेद्वारे निरामय आयुष्य जगण्याची गुरुकिल्ली सांगितली आहे डॉ. शुभांगी नागोराव कल्पना इंगोले मॅडमने.

सरते शेवटी विशेष उल्लेख करावासा वाटतो तो म्हणजे प्रज्वल रामदास घाटोळ व कुशल दोडे यांनी दाखवलेल्या साहस आणि समय सूचकतेचा ! भाराणी आयसीयू डॉक्टर हेडगेवार रुग्णालयच्या बाजूला असणाऱ्या गादी कारखान्याला लागलेली आग पसरून रुग्णांच्या व स्टाफच्या जीविताला धोका निर्माण झाला होता तसेच बरीच वित्तहानी होण्याचाही संभव होता. परंतु अतिशय सहसाने न डगमगता आग विझवण्याच्या कार्यात त्यांनी मोलाचा वाटा उचलला त्यांचा अंगावर काटा आणणारा स्व अनुभव देखील या अंकात देत आहोत.

आपल्या वेळातला वेळ काढून निरामयसाठी लेख देणाऱ्या सर्व डॉक्टरांचे तसेच डॉ. हेडगेवार रुग्णालयासाठी अगदी संवेदनशील मनाने दान करणाऱ्या दानदात्यांचे आभार मानून आपल्या हॉस्पिटलची उत्तमोत्तम प्रगती होत राहो, हीच सदिच्छा

 

डॉ. प्रज्ञा बनसोड