ऍनिमिया निर्मूलन कार्यक्रम २०२३

ऍनिमिया आजारावर संवेदना आरोग्य केंद्र टिमटाळामध्ये २०२३ च्या फेब्रुवारीत ऍनिमिया निर्मूलन उपक्रम हाती घेण्यात आला. गावातील लोकांना याची अजिबात माहिती नसताना आणि या आजाराची लक्षणे दृष्य किंवा तीव्र नसल्याने या उपक्रमासंबंधी ग्रामीण भागात काम करणे तितके सोपे नव्हते. हा कार्यक्रम उपक्रम कसा करायचा याचे टप्पे पाडण्यात आले. संवेदना आरोग्य केंद्र टिमटाळा या प्रकल्पाचे प्रकल्प संयोजक डॉ. नितीन पारखी यांनी आपल्या स्टाफला या आजारासंबंधी सविस्तर माहिती देऊन प्रशिक्षित केले. आणि केलेल्या नियोजनानुसार एकेका टप्प्याला सुरुवात झाली. आजाराचे स्वरूप, लक्षणे व गंभीर परिणाम इत्यादी माहिती असणारेलघु चित्रपट गावातील लोकांना दाखविण्यात आले. गावात सुरुवातीला याप्रकारे जनजागृती करण्यात आली. यासोबतच डॉक्टर पंजाबराव देशमुख नर्सिंग इन्स्टिट्यूट च्या विद्यार्थ्यांनी गावातील चौकात याविषयीचे पथनाट्य सादर केले. मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात यश आले. त्यानंतर डॉक्टर हेडगेवार हॉस्पिटल अमरावती येथील मेडिकल सुपरीटेंडेंट डॉ. श्री इंगोले सर यांच्या मार्गदर्शनाखाली गावकऱ्यांसाठी रुग्णालयात दिनांक १६ फेब्रुवारी रोजी एक ऍनिमिया मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला. यावेळी सरांनी उपस्थितांना या आजारासंबंधी अधिक माहिती दिली. यानंतर सर्वेक्षण कऱण्यासाठी वैयक्तिक माहितीसह लक्षणानुसार प्रश्नवली तयार करून माहितीचे संकलन करण्यात आले. त्यानंतर डॉक्टर पंजाबराव देशमुख नर्सिंग इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून गावामध्ये वय वर्ष अठराच्या पुढील प्रत्येकाचे सर्वेक्षण करण्याला सुरुवात झाली. सर्वेक्षण पूर्ण झाल्यावर संवेदना रुग्णालयाची परिचारिका आणि चमू प्रत्येक घरी जाऊन सी.बी.सी. तपासणीकरिता रक्ताचे सॅम्पल घ्यायला गेली. संवेदना रुग्णालयाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन ९९ जणांची (पुरुष 39, महिला 60) रु.30 या नमामात्र शुल्काने सी.बी.सी. तपासणी करण्यात आली. रिपोर्ट्स डॉक्टरांना दाखवून त्यातील अनेमिक रुग्ण वेगळे काढण्यात आले.

ऍनिमिया नाही - 43 पुरुष - 25 महिला - 18
सौम्य ऍनिमिया - 49 पुरुष - 13 महिला - 36
मध्यम ऍनिमिया - 5 पुरुष - 1 महिला - 4
गंभीर ऍनिमिया - 2 पुरुष - 0 महिला - 2

ज्या लोकांना ऍनिमिया निघाला त्या लोकांना वैयक्तिक भेटून त्यांच्या रिपोर्टची कल्पना दिली औषधोपचाराचे मार्गदर्शन व औषधी वितरित केली. याच कार्यक्रमांमध्ये आहारतज्ञांचे मार्गदर्शन आयोजित केले गेले. औषध व आहाराच्या माध्यमातून आपण आपले आरोग्य ठणठणीत ठेवू शकतो हा विश्वास लोकांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. सहज उपलब्ध होऊ शकणाऱ्या खाद्यपदार्थांच्या माध्यमातून आपल्याला किती ऍनिमिया नियंत्रित करता येतो. याची विस्तृत माहिती आहार तज्ञांनी दिली. ऍनिमियाचे निदान झालेल्या रुग्णांची तज्ञ डॉक्टरांनी तपासणी केली. डॉक्टर हेडगेवार हॉस्पिटलच्या डॉ. कश्मिरा कडू मॅडम यांच्याकडे मध्यम व गंभीर ऍनिमिया असरणाऱ्या सातही रुग्णांना संवेदना रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेतून नेण्यात आले. त्यांची तपासणी करून या सात रुग्णांवर तज्ञांच्या मार्गदर्शनात पुढील उपचार सध्या सुरू आहे. त्यामध्ये त्यांच्या आणखी वेगळ्या तपासण्या केल्या गेल्या असून त्या आधारे त्यांचे उपचार डॉक्टर हेडगेवार हॉस्पिटलमध्ये ऍनिमिया निर्मूलन उपक्रमाखाली मोफत सुरू आहे.या संपूर्ण ऍनिमिया निर्मूलन उपक्रमाद्वारे दिल्या जाणाऱ्या सेवेकरीता केवळ ३०/- रुपये नोंदणी शुल्क आकारण्यात आले. यामध्ये सी.बी.सी. तपासणी, रुग्णांना दीड महिन्याचे औषध आणि पुन्हा एक सी.बीसी. तपासणी करून अपेक्षित निकाल प्राप्त करण्यात येणार आहे. सर्वांचे हिमोग्लोबीन योग्य प्रमाणात आणणे आणि नागरिकांना योग्य व सकस आहार सेवन करण्याची सवय लावणे असे उद्दिष्ट याद्वारे प्राप्त करायचे आहे....