दातांचे आरोग्य

सुंदर दात हे सौंदर्याबरोबरच चांगल्या आरोग्याची लक्षण आहे. दातांचा वापर आपण अन्य चर्वण करण्यासाठी करतो या क्रियेत कठीण अन्न फोडून व चावून बारीक केले जाते ज्यामुळे ते गिळण्यास व पचण्यास सोपे होते. मानवी शरीरात वयस्क व्यक्तीला एकूण 32 दात असतात.ज्यामध्ये आठ पटाशीचे दात,चार सुळे दात, आठ उपदाढा व12 दाढा यांचा समावेश असतो. आपले शारिरीक आरोग्य योग्य ठेवण्यासाठी दातांची योग्य निगा राखणे फार आवश्यक आहे.

वेगवेगळ्या वयोगटांनुसार दातांची काळजी कशी घ्यावी व दातांच्या कुठल्या समस्या या वयात होऊ शकतात याची आज आपण सविस्तर माहिती घेऊया:

बालवयः लहान बाळ जेव्हा सहा ते सात महिन्यांचे होते त्या वेळेला त्याला दुधाचे दात येणे सुरू होतात आणि दुधाचे दात अतिशय नाजूक असतात बऱ्याचदा सात-आठ महिन्याचे बाळ बॉटल ने दूध घेते किंवा दूध पिता पिता रात्री झोपून जाते,दुधात असणारी शर्करा बाळाच्या दातांच्या संपर्कात येऊन दातांवर कीड लागण्याची शक्यता असते,तसेच कुठलाही जमिनीवर पडलेला खाद्यपदार्थ किंवा वस्तू तोंडात घातल्याने सुद्धा जंतू संसर्ग होऊन दाताला कीड लागण्याची शक्यता असते.बरेचदा लहान मुलांना गोड पदार्थ दिले जातात ते गोड पदार्थ चिकट आणि जास्त वेळ तोंडात ठेवल्याने सुद्धा दात किडू शकतात. लहान बाळांचे दात किडल्यावर सर्वात प्रथम वरच्या दातांवर हिरड्यांलगत पांढरा डाग दिसण्यास सुरुवात होते, हे डाग जंतुसंसर्ग झाल्यावर लगेच दिसून येत नाहीत त्यामुळे आपण ज्या वेळेला तज्ञांचा सल्ला घेतो त्यावेळी दात बऱ्याच जास्त प्रमाणात किडला असण्याची सुद्धा शक्यता असते. लहान मुलांचे दात अतिशय नाजूक असतात आणि ते जर किडले तर पुढे त्यांच्या आहारावर आणि त्यांच्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो,म्हणून लहान मुलांना जेव्हा दात येतात तेव्हा सुरुवातीपासूनच त्यांची काळजी घ्या.

किशोर वय: 14 वर्षावरील मुलांमधील बदललेल्या खाण्याच्या सवयी, जीवनशैली जंकफुडचे तसेच गोड पदार्थ उदा.कार्बोनेटेड ड्रिंक्स यांचा आहारात अधिक समावेश असल्याने दात किडण्याचे प्रमाण वाढले आहे.तसेच या वयातल्या मुलांमध्ये दात वाकडे येणे,अपघातात दातांना इजा इत्यादी समस्या सुद्धा असतात. या वयात जर उपचार केले तर यांची हाड थोडी लवचिक असल्यामुळे आपण लवकरच दातांना योग्य तो आकारात पुन्हा आणू शकतो.

किशोरवयीनु मुले तसेच तरूणांमध्ये गुटका,तंबाखू,पानसुपारी,मद्य इत्यादीचे व्यसन असण्याची सुद्धा शक्यता असते या पदार्थातील असलेल्या घातक घटकांमुळे दातांना लवकरच कीड लागून दात दुखणे,किडणे, हिरड्यांचा आजार,मुखदुर्गंध,अल्सर व तोंडाचा कर्करोग अशा समस्या दिसतात.

वृद्ध वयात वयोमानानुसार दातांचा क्षय होऊन दात पडणे,दात दुखणे,हिरड्यांचे आजार दिसतात.या वयात मधुमेह,उच्च रक्तदाब,हॄदयाचे आजार,कर्करोग इत्यादी आजारांचे प्रमाण अधिक असल्याने रोगप्र्तिकारक शक्ती कमी असते त्यामुळे दाताला कीड लागणं,रक्त पातळ करण्याच्या् औषधांमुळे हिरड्ययामध्ये रक्तस्त्राव,हाडांप्रमाणेच दातदेखील ठिसूळ होणे ई.अधिक दिसून येतात.वृद्ध वयामध्ये इतर आजारांमुळे देखील दातांकडे दुर्लक्ष केले जाते.

दातांच्या आजारांचे लक्षणे: दात दुखणे, तोंड उघडताना दात घासताना दातात कळ येणे ,हिरड्यांमध्ये सुज येणे,श्वासामध्ये दुर्गंधी होणे,जंतू संसर्ग अधिक असेल तर ताप येणे,डोकेदुखी इत्यादी लक्षणे दिसून येतात.

दातांच्या आजारांचे निदान कसे केले जाते:

दंतचिकित्सक त्यांच्याकडील असलेल्या उपकरणांच्या साह्याने पूर्ण दाताचे निरीक्षण करतात व कुठला दात किडलेल्या आहे ते पाहतात त्याचबरोबर दाताची कीड किती खोलपर्यंत आहे हे बघण्यासाठी दाताचा पोर्टेबल एक्स रे सुद्धा केला जातो,रूट कॅनॉल ची गरज असेल तर त्या वेळेला सुद्धा प्रत्यक्ष दाताकडे बघून दात कुठपर्यंत किडला आहे आणि काय करण्याची गरज आहे हे ठरवले जाते.

लहान मुलांमध्ये देखील ओपीजी म्हणजे सर्व दातांचा एक्स-रे एकदमच घेतल्या जातो त्यामध्ये दुधाचे दात बाळाचे पक्के दात सगळेच बघता येतात त्याबरोबर किती दातांना त्रास आहे व किती दातांना सिमेंटिंगची किंवा रूट कॅनाॅलची आवश्यकता आहे हे ठरवले जाते.

दाताच्या उपचार पद्धती:

फक्त हिरड्यांवर सूज असेल आणि दातांचे आरोग्य चांगले असेल तर तोंडावाटे गोळ्या देता येतात.दात किडला असेल पण कीड जास्त नाही व वरच्यावर साफ झाली तर अँटिबायोटिक आणि पेन किलर देऊन उपचार केला जातो. कीड जास्त असेल तर एक्स-रे काढून कीड किती खोल आहे यानुसार सिमेंटिंग किंवा रूट कॅनलचा पर्याय देण्यात येतो, दात अधिकच किडला असेल तर दात काढून ही टाकू शकतो. वृद्ध लोकांमध्ये दातांचा योग्य माप घेऊन त्यांच्यासाठी कवळी सुद्धा तयार करून घेता येते आधुनिक उपचार पद्धतींचा वापर करून तुटलेला दात,अपघातात पडलेला दात इत्यादींना आपण परत बसून घेऊ शकतो.वृद्धांमध्ये कवळी किंवा परमनंट टिथ लावून घेतल्याने त्यांना जेवणात त्रास होणार नाही व आरोग्यावर वाईट परिणाम होणार नाही.

दातांची कशी निगा घ्यावी:

बाळाला दात येतात त्या वेळेला दरवेळी दूध पिल्यानंतर मऊसूत कपड्याने दात स्वच्छ पुसून घ्यावेत,बाळ थोडे मोठे झाले की सॉफ्ट ब्रशने कुठली टूथपेस्ट न वापरता केवळ ब्रशच्या सहाय्याने दात साफ करावेत,बाळ दोन वर्षाचे झाले की अगदी गव्हाच्या आकारा एवढं थोडसं पेस्ट घेऊन सकाळी व रात्री असे दोन वेळा दात स्वच्छ करावे व त्यानंतर वयोमानानुसार प्रत्येकाने दररोज दोन वेळा दात स्वच्छ करणे आवश्यक असते.दातांच्या स्वच्छतेबरोबरच आपल्या आहाराकडे लक्ष देणे देखील आवश्यक आहे कॅंडीज,कार्बोनेटेड ड्रिंक्स,ज्यूस लॉलीपॉप ई. चिकटणाऱ्या गोष्टी आणि गोड वस्तूंमुळे दात लवकर किडण्याचा संभाव असतो,त्यांच्या वापर टाळावा.तसेच तोंडाने दातांनी कठीण पदार्थ तोडणे.बाटलीचे झाकण उघडणे अशी काम करू नये त्यामुळे दाताला इजा होऊ शकते.बऱ्याच मुलांना रात्री दात वाजवण्याची सवय असते त्यावर लगेच उपचार करून घ्यावा.वृद्ध व लहान बालकांच्या दातांची तपासणी नियमितपणे करण्यात यावी.स्त्री आणि पुरुषांनी स्वतःला तंबाखू गुटखा अशा घातक व्यसनांपासून दूर ठेवावे आपल्या आहारात अति गोड पदार्थांचा वापर टाळावा व केल्यास पटकन चूळ भरावी व ब्रश करावे. दातांचे आरोग्य योग्य राखले तरच आपले आरोग्य चांगले राहील हे लक्षात ठेवून दातांच्या कुठल्याही समस्यांकडे दुर्लक्ष करू नये व योग्य वेळी योग्य सल्ला घेऊन आपल्या दातांची सौंदर्य व आरोग्य टिकवून ठेवावे

डॉ. सौमित्र देशपांडे
दंतरोगतज्ज्ञ