न्यूरोसायकायटीस्टची डायरी

सहा वर्षांची सोनाली तिच्या पालकांबरोबर ओपीडीला आली. पालकांनी तिच्याबद्दल मला अतिशय वेगळा प्रश्न विचारला.
संपूर्ण माहिती विचारल्यावर कळाले की कोविड महामारी सुरू झाली, त्यावेळी त्यांची मुलगी सोनाली ही केवळ साडेतीन वर्षांची होती, त्या काळात शाळा बंद असल्यामुळे ती कधीही शाळेत किंवा शिकवणीला गेली नाही. तिचे आई वडील स्वतः प्राथमिक शाळा चालवीत असल्यामुळे त्यांनी तिला घरीच शिकवायला सुरुवात केली केजी वन केजी टू व इतर आवश्यक अभ्यासक्रम ती खूप लवकर शिकू लागली असे त्यांच्या लक्षात आले, मग पुढे इयत्ता पहिली दुसरीचा अभ्यासक्रम ही तिने लवकरच आत्मसात केला. यानंतर पालकांनी तिला त्यांच्या प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसह परीक्षा देण्यास सांगितले तर अपेक्षाप्रमाणेच तिने त्यातही उत्तम गुण मिळवले. दरम्यान कोविड महामारीचे सावट कमी होऊन पुन्हा शाळा सुरू करण्यात आल्या व सोनालीचा थेट शाळेत प्रवेश व तिच्या शैक्षणिक भवितव्याचा निर्णय घेण्याची वेळ आली. त्यामुळे शालेय शिक्षणात पुढे काय करायचे? पुढे कसे जायचे शाळेत पाठवावे की होम स्कूलिंग? तिची बुद्धिमत्ता अपेक्षाप्रमाणे जास्त दिसून आल्यामुळे तिच्या वयाप्रमाणे ओपन स्कूल चा पर्याय निवडावा कि तिला वरच्या वर्गात ऍडमिशन द्यावे? असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात होते याविषयी चर्चा करण्यासाठी ते माझ्याकडे आले होते.

या इंटरेस्टिंग केस चा विचार करून याबाबतीत काय ठरवावे यासाठी पुढे जाण्यासाठी ओपीडीवर प्रथम सोनालीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन केले तिच्या उच्च बुद्धिमत्तेची पुष्टी करण्यासाठी इंटेलिजंट कोशंट म्हणजेच आयक्यू चाचणी घेण्यात आली. त्यात तिचा बुद्ध्यांक 139 होता. हा आयक्यू पाहता या गोष्टीची पुष्टी झाली की तिची बुद्धीमत्ता उत्कृष्ट दर्जाची आहे.

यानंतर शालेय शिक्षणाच्या सर्व पर्यायांवर पालकांशी साधक बाधक चर्चा करण्यात आली, ओपन स्कूलमध्ये उच्च बुद्धांक प्राप्त मुलांचा शाळेत जाण्याचा वेळ वाचेल तसेच इतर अभ्यासक्रम व अभ्यासेतर ऍक्टिव्हिटीज तिच्या वेगाने करण्यासाठी वेळ व संधी मिळेल, पण या नाण्याची दुसरी बाजू पाहता होम स्कूलिंग म्हणजेच घरी अभ्यासामुळे घरच्या जगातून बाहेर पडण्याची तिला फार संधी मिळणार नाही तसेच तिला तिच्या समवयस्क मुलांची प्रत्यक्ष संवाद साधने शक्य होणार नाही. सामान्य शाळेत खेळणे ,भांडणे ,कट्टी- बट्टी ,क्रीडा ,स्पर्धा, हरणे ,जिंकणे, काही तडजोडी, दररोजचा संवाद शिक्षकांकडून लागणारी शिस्त इत्यादी गोष्टींमुळे मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मदत होते .

मुलांच्या सर्वांगीण वाढीसाठी शैक्षणिक कौशल्य प्राप्त करणेच पर्याप्त नसून सामाजिक कौशल्ये म्हणजे सोशल स्किल देखील महत्त्वाचे आहेत .उच्च वर्गात थेट प्रवेश हा देखील एक पर्याय होता पण शाळेच्या बोर्डावर म्हणजेच सीबीएससी आयसीएससी इत्यादी यावर निर्णय घेणे तसेच तिथल्या वरिष्ठांशी चर्चा करून व परवानगी असेल तर परीक्षा देऊन पुढे जाणे चांगले होईल असे सांगितले.
सविस्तर चर्चा केल्यानंतर त्यांना अंतिम निर्णय घेण्यास सुचविले व भविष्यात काही शंका असल्यास पुढील प्रश्नांची उत्तर देण्याची तयारी दर्शवली.

निष्कर्ष:
बुद्धांक चाचणी ही तपासणी करत असताना मुलांचा शाब्दिक विचार तर्कशुद्ध शुद्ध विचार गणित तसेच आकलन व वाचन इत्यादी संज्ञानात्मक क्षमतांचा विचार केला जातो

परंतु या व्यतिरिक्त मुलाची भावनिक क्षमता, कल्पकता, चिकाटी, मनाचा खंबीरपणा तसेच हळवेपणा इत्यादी गोष्टी या तपासणीतून कळत नाहीत, त्यामुळे पालक व शिक्षकांनी केवळ या एकाच आधारावर मुलांचे भविष्य तसेच त्यांच्या भविष्यातील यशापयश यावर निर्णय घेऊ नये. बुद्ध्यांक चाचणीच्या परिणामांवरून मुलांकडून भविष्यात अपेक्षांचे ओझे लादले जाण्याची भीती देखील असते, तसेच जर बुद्ध्यांक कमी असला तर निराशे पोटी मुलाला योग्य ते मार्गदर्शन व प्रेरणेचा अभावामुळे नैराश्य निर्माण होण्याची स्थिती निर्माण होऊ शकते. 2.अभ्यासातील बौद्धिक क्षमता ही उत्तम असायलाच हवी परंतु याचबरोबर इतर गुणांकाचा देखील विचार करणे आवश्यक आहे ज्यामध्ये महत्त्वाचा आहे -

1.भावनिक गुणांक (इमोशनल कोशंट): इतरांच्या भावनांचा विचार करत व आदर ठेवत आपल्या भावनांना नियंत्रित करून योग्य रीतीने व्यक्त करण्यास सक्षम असणे यालाच भावनिक गुणांक असे म्हणतात. यामध्ये आपली मुले जेव्हा सांघिक कार्य करतील तेव्हा एकमेकांना समजून घेणे व येणाऱ्या आव्हानांना पूर्ण करणे, भावनिक रित्या इतरांशी जोडले जाऊन त्यांच्या भावनांचा आदर ठेवणे व कुठल्याही परिस्थितीचा दुसऱ्यांच्या दृष्टिकोनातून देखील विचार करून त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करणे या कलादेखील त्यांच्या अंगी आणणे आवश्यक आहे.

2.सामाजिक गुणांक ( सोशल कोशंट): यामध्ये व्यक्तीला समाजात वावरताना वेगवेगळे नातेसंबंध कसे निर्माण करावेत, तसेच मैत्री व सामंजस्य टिकवण्याची साठी जी क्षमता लागते ती कशी विकसित करावी हे देखील मुलांना शिकवणे आवश्यक आहे .

3.प्रतिकूलता गुणांक(ऍडव्हर्सिटी कोशंट):आयुष्यात येणाऱ्या वेगवेगळ्या बऱ्या वाईट प्रसंगांना, आव्हानांना कसे सामोरे जावे यासाठीची क्षमता मुलांमध्ये विकसित करणे फार आवश्यक आहे ,कारण आयुष्यात येणारे अपघात किंवा बरे वाईट प्रसंग हे कधीही येऊ शकतात, त्यावेळी आपला पाल्य त्याला कसा प्रतिसाद देतो व तो खंबीरपणे कसा उभा राहील यासाठी प्रतिकूलता गुणांक देखील उत्तम असणे आवश्यक आहे .

वरील सर्व बाबींचा विचार करता शालेय शिक्षण महत्त्वाचे आहेच परंतु याबरोबर मुलांच्या आयुष्यात शैक्षणिक यश हे एकच ध्येय नसून इतर क्षमता विकसित करणे देखील आवश्यक आहे, पालक म्हणून त्यांच्या शिक्षणाचा व भवितव्याचा निर्णय घेणे हा आपला नैतिक ,सामाजिक तसेच कायदेशीर हक्क आहेच, परंतु असे करताना केवळ शैक्षणिक यश हेच आयुष्याचे ध्येय आहे असे मानने चुकीचे ठरेल. साॅक्रेटिसने म्हणाल्याप्रमाणे

Education is kindling of a flame not the filling of a vessel - " शिक्षण म्हणजे केवळ भांडे भरण्यासारखं मुलाच्या मेंदूमध्ये माहिती भरणे नसून त्यांच्यामध्ये जिज्ञासेची ज्योत पेटवून वणवा निर्माण करणे आहे"

डॉ. अक्षय चांदुरकर
एम. डी. (सायकियाट्री )