संपादकीय

चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा व नववर्षारंभ. या निमित्ताने आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा. हा पावन दिवस भारतीय संस्कृतीचे महान उपासक व प्रखर राष्ट्रवादी चिंतक ,आद्य सरसंघचालक पूजनीय डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचा जन्मदिवस असून त्यांच्या स्मृतीस वंदन करून हा बाविसावा अंक आज आपल्यापुढे सादर करीत आहोत.


“पुराणमित्येव न साधु, सर्व न चापि नवमित्यवद्यम् |

सन्तः परिक्ष्यान्यतरद्भजन्ते मुढः परप्रत्ययनेयबुद्धिः||”


अर्थात सर्वच जुन्या गोष्टी चांगल्या नसतात किंवा नवीन आहे म्हणून वाईट पण नसतात. सज्जन लोक विचारपूर्वक त्यापैकी जे चांगलं असेल त्याची निवड करतात. मूर्ख मात्र दुसऱ्याच्या सांगण्याप्रमाणे चांगलं -वाईट ठरवतात.

दैनंदिन जीवनात कित्येक वेळेस बदललेली कुटुंब पद्धती,बदललेले समाजजीवन,शिक्षण पद्धती,स्त्रियांचे घरात व घराबाहेरचे बदललेले स्थान, खाण्यापिण्याच्या सवयी,संपन्नतेच्या व सुखाच्या बदललेल्या व्याख्या या सगळ्यात नवीन गोष्टींचा अंगीकार करत असतानाच,जुनं काही सुटत तर नाही ना?असा संभ्रम निर्माण होतो. या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी आपली सद्सद्विवेक बुध्दी जागृत ठेवणे महत्वाचे असते. तसेच बदलांना न घाबरता त्यात काय चांगलं आहे ,त्याचा स्वीकार करणे आवश्यक आहे. आपल्या वाडवडीलांनी,पूर्वजांनी आपल्या मनावर बिंबवलेले सुसंस्कार, चांगल्या आहाराच्या सवयी,आचार विचार पुढच्या पिढीला देणे हे आपले आद्य कर्तव्य समजले पाहिजे. सध्याच्या काळात”साधी राहणी व उच्च विचारसरणी”या उक्तीचा जणू सगळ्यांना विसरच पडला आहे. उच्च शिक्षण घेणे,उच्च पदावर नोकरी मिळवणे,भरपूर पैसा कमावणे व जमेल तिथे त्याचे उचित प्रदर्शन करणे यालाच सुखी आयुष्य म्हणून जगणे सुरू आहे. राष्ट्रभक्ती,निसर्ग प्रेम, सामाजिक कार्य,भूतदया,एकमेकांना मदत करणे,कुटुंबाने एकत्र येऊन सणवार साजरे करणे,सुखदुःखात एकमेकांची साथ देणे या गोष्टी हळूहळू लोप पावत चालल्या आहेत की काय असेच वाटते.

कुठलाही बडेजाव न करता , शिवाय कष्ट करून,काटकसरीने साधे जीवन जगलेली मागची पिढी व प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर टाकून लाईक कमेंट मिळवण्यातच धन्यता मानणारी आजची पिढी यातील दुवा म्हणून आपल्यावर खूपच मोठी जबाबदारी आहे , असे माझे मत आहे. मनुष्याच्या सोयीसाठी निर्माण झालेले हे इंटरनेट व सोशल मिडियाचे विश्व गोष्टीतल्या पुंगीवाल्यासारखे आपल्या भावी पिढीला कधी कुठल्या दरीत ढकलणार आहे सांगता येत नाही. बाकी सारासार विचार करण्यास वाचक समर्थ आहेतच.

निरामयच्या या अंकात आरोग्य विषयक लेख तर आहेतच या व्यतिरिक्त इतर काही विषयांनाही आपण हात घातला आहे. सर्वसामान्यपणे जगभरातल्या 60 % लोकांमध्ये आढळणारा ऍनिमिया म्हणजेच पंडू रोग किंवा रक्तक्षय या आजाराविषयी वेगवेगळ्या तज्ञांनी त्याची लक्षणे, कारणे, उपचार तसेच निदान पद्धती यांवर योग्य ते मार्गदर्शन केले आहे.

आजच्या काळातल्या बदललेल्या शिक्षण पद्धती,एक किंवा दोन अपत्य असल्यामुळे पालकांच्या मुलांकडून असणाऱ्या अपेक्षा, त्यांच्या भवितव्यासाठी अगदी लहान वयापासूनच त्यांच्यावर टाकले जाणारे दडपण या सर्वांवर आधारित न्यूरो सायकलची डायरी या सदरात एक वेगळीच गोष्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे.

21 व्या शतकात स्त्रियांचे समाजातील स्थान बदलले आहे. यात पारंपारिक, पारिवारिक याबरोबरच नोकरीच्या ठिकाणी सुद्धा जबाबदारी आलेली आहे. हे सगळं सांभाळत असताना स्त्री पुरुष समानता हवी की समतोल साधायचा हा प्रश्नच आहे, त्याविषयी लेख लिहिलाय शिक्षिका सौ.स्वाती पोतदार मॅडम यांनी. डॉक्टर कसा असावा,रुग्ण व डॉक्टर संबंध, सुसंवाद , यांच्यातील नाते कसे असावे ,हे देखील ज्येष्ठ नागरिक

व शिक्षिका शेळके मॅडम यांनी लेखात उलगडले आहे. अलिकडच्या काळात डॉक्टर आणि रुग्णांमधील तणावपूर्ण वातावरण व प्रसंगी मारहाणीचे प्रकरण आपल्याला दिसून येतात. त्याला कसा आळा घालता येईल या संदर्भात शेळके मॅडम यांचा हा लेख महत्वाचा वाटतो. रुग्णसेवेचे व्रत पाळत असताना अगदी गरजू पण आरोग्य सेवेपासून आजही वंचित असलेल्या घटकांसाठी डॉ. हेडगेवार हॉस्पिटलतर्फे मोबाईल डिस्पेन्सरी चालवण्यात येते. याचा गरजू रुग्णांना खूप फायदा होतो. पण डॉक्टर म्हणूनही आपण काही चांगलं काम करत आहोत, समाजाचं देणे देत आहोत याचे समाधान डॉक्टरांना होते. असाच अनुभव सांगितला आहे डॉ. सिमरन आडवाणी यांनी मोबाईल डिस्पेन्सरीमध्ये गेल्या दोन वर्षापासून त्या रुग्ण सेवा देत आहेत.

सर्वांच्या चेहऱ्यावरचं हसू आणखीच सुंदर बनवणाऱ्या व दातांचे आरोग्य कसे टिकवावे व त्यांची लहान वयापासूनच योग्य काळजी कशी घ्यावी या विषयावर दंतरोग तज्ज्ञ , डॉक्टर सौमित्र देशपांडे यांचा लेखही या अंकात समाविष्ट आहे. डॉक्टर हेडगेवार रुग्णालय भाराणी आयसीयू येथे नवीन डायलिसिस युनिट सुरू झाल्यापासून डायलेसिस युनिटचा फायदा किडनीच्या आजारांनी त्रस्त अशा अनेक रुग्णांना होत आहे त्यातीलच एका रुग्णाने स्वतःचा अनुभव आणि डायलिसिस युनिटबद्दल आणि तिथे कार्यरत कर्मचारी वर्गाबद्दल त्यांचे मत व्यक्त केले आहे. तेही या अंकात देत आहोत.

21 मार्च हा दिवस नॅशनल ऍनिमिया डे म्हणून साजरा होतो. रक्तक्षय या आजाराबद्दल जनमानसात जनजागृती व्हावी या निमित्ताने हा दिवस पाळला जातो. टिमटाळा येथील संवेदना केंद्रावर याच अनुषंगाने आजूबाजूच्या गावातील सामान्य लोकांची आरोग्य तपासणी व रक्त तपासणी करण्यात आली. त्यातच आलेल्या तपासणीच्या रिपोर्टनुसार गरजू व्यक्तींना औषधोपचार सुरू करण्यात आले. औषध -गोळ्या कशा घ्याव्यात, आहारातून हिमोग्लोबिन कसं वाढवता येईल या सर्वांवर मार्गदर्शन देखील करण्यात आले आहे. त्याचा ऍनिमिया रिपोर्ट सुद्धा आपल्यापुढे सादर करत आहोत. अशा विविध विषयांना घेऊन तयार झालेला अंक आपल्यापुढे देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. वाचकांनी आपला अभिप्राय जरूर कळवावा. त्यातूनच आम्हाला ऊर्जा मिळते.

धन्यवाद!

डॉ. प्रज्ञा बनसोड
संपादक