समानता आणि समतोल

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने स्त्रियांचं किंवा स्त्रीत्वाचं कौतुक करणारे, गुणवर्णन करणारे अनेक संदेश सोशल मीडियाद्वारे पाठवले जातात. ते वाचून स्त्रियांनाही बरं वाटतं, पुन्हा वर्षभर सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडायला लागणारं बळ त्या कौतुकाने मिळालंय असं वाटून जातं. पण ते संदेश जो विचार मांडतात तो खरंच समाज मनात रुजतो? आणि रुजला तरी प्रत्यक्षात उतरतो का? हे प्रश्नच राहतात.

वैदिक काळात असा कुठलाही 'महिला दिन' वगैरे साजरा केल्याचे पुरावे नाहीत पण त्या काळी स्त्रीला समाजात किती महत्त्वाचं स्थान होतं याचे मात्र अनेक पुरावे मिळतील. गार्गी, मैत्रेयी यांच्यासारख्या विदुषिंनी, ऋग्वेदातील ऋचा रचल्याचे दाखले आहेत. त्यांना 'ब्रह्मवादीनी' म्हणून समाजात अत्यंत महत्त्वाचे स्थान होते. रामायणात कौशल्या आणि तारा यांचा उल्लेख 'मंत्रविदू' असा केला आहे, त्याचबरोबर त्या युद्धशास्त्र निपुणही होत्या असेही दाखले आहेत. महाभारतात द्रौपदीचा 'पंडिता' असा उल्लेख केला आहे. ती युधिष्ठिर आणि पितामह भीष्म यांच्याबरोबर नीतीशास्त्रावर चर्चा करीत असे. त्याकाळी स्त्रीला स्वयंवराच्या माध्यमातून, आपल्या स्वतःच्या अटींवर जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य दिले जात होते. असा तो काळ आणि स्त्रीला 'जाया ईदंअस्तं' म्हणजेच घराची स्वामिनी मानणारी आपली संस्कृती आजच्या पेक्षा जास्त पुरोगामी आणि विचारांनी आधुनिक होती, असेच म्हणावे लागेल नाही का?

पुढच्या काळात भारतावर झालेली आक्रमणे आणि त्यातून निर्माण झालेली स्त्रियांच्या असुरक्षिततेची स्थिती त्यामुळे धोक्यात आलेलं स्त्री-स्वातंत्र्य अजूनही तिला मिळालं नाही असंच म्हणावं लागेल. आज आपण स्वतःला आधुनिक मानलं आणि स्त्री स्वतंत्र्याच्या भ्रामक कल्पना मध्ये रमलो तरीही, स्त्रीकडे एक भोग वस्तू म्हणून बघण्याची समाजाची मानसिकता नाकारता येणारच नाही ना !

एकीकडे स्त्रीला देवत्व प्रदान करणारा, तिच्या आई बहिण पत्नी अशा अनेक रूपांचं उदात्तीकरण करणारा समाज तिला माणूस म्हणून सन्मान देऊ शकत नाही असंच दुर्दैवाने म्हणावं लागतं. खरंतर स्वातंत्र्य किंवा आधुनिकतेच्या नावाखाली स्त्रियांकडून होणारं स्वैर वर्तनही नाकारता येत नाही. प्रसार माध्यमातून होणारे स्त्री देहाचे प्रदर्शन तिची प्रतिमा एक भोगवस्तू म्हणूनच मांडते हे वास्तवही नाकारता येत नाही. ग्लॅमरच्या क्षेत्रात पडद्यामागे स्त्रीची विटंबना होते आणि त्याची जाणीव अनेकदा स्त्रियांना फार उशीर झाल्यावर होते. आणि मग तथाकथित आधुनिकता फक्त त्यांच्या पेहरावातच उरते. कारण तोवर त्यांनी स्त्री म्हणून स्वतःचा सन्मान गमावलेला असतो.

स्त्री पुरुष समानतेचा उच्चार अनेकदा केला जातो, पण ही समानता कोणत्या बाबतीत आणि कशी हे मात्र स्पष्टपणे कोणी मांडत नाही. राहणीमान, वागणं, बोलणं पुरुषांप्रमाणे असणं म्हणजे समानता अशीही भ्रामक समजूत बघायला मिळते. तेव्हा मनात येतं आपण प्रमाण मानून कुणाचं अनुकरण तेंव्हाच करतो जेंव्हा आपण स्वतःला त्याच्या तुलनेत कमकुवत समजतो. मग पुरुषांचे अनुकरण करण्याच्या या मानसिकतेला काय म्हणावं? खरंतर निसर्गाने स्त्री आणि पुरुष यांना शारीरिक दृष्ट्या,

मानसिक दृष्ट्या तसेच प्रतिभा, गुण आणि कौशल्यांच्या पातळीवर भिन्नता प्रदान केली आहे. आणि ती समतोल राखण्याच्या दृष्टीने अपरिहार्य आहे हे स्पष्टपणे समजल्या वाचून समानता नेमकी कशात आणि कशी असावी हे कसे स्पष्ट होईल. म्हणूनच जागतिक महिला दिन साजरा करत असताना त्या दृष्टीने विचार मंथन होणे गरजेचे आहे असे वाटते.

आणि त्याही पुढे जाऊन 'स्त्री-पुरुष समानतेच्या आधी 'स्त्री - स्त्री' समानता घडवून आणणं जास्त उपयुक्त ठरेल असं वाटतं. एकीकडे उच्चशिक्षित, उच्चपदस्थ आणि आपल्या प्रतिभेच्या जोरावर सर्वच क्षेत्रात भरारी घेणारी स्त्री हे चित्र अत्यंत आशादायी, तर दुसरीकडे आजही परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट सोडणारी स्त्री, कौटुंबिक अत्याचाराची बळी ठरणारी स्त्री आणि समाजात असुरक्षित असणारी स्त्री हे मन व्यथित करणारं चित्र. खरंतर ही दरी सांधली जाणं खूप गरजेचे आहे असं वाटतं. कारण तसं झालं तरच स्त्रि आणि पुरुष ही दोन्ही पारडी समान तोलामोलाची होतील. योग्य तो समतोल साधला जाईल आणि तेंव्हाच खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा करता येईल. नाही का?

संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे साजरा केला जाणारा जागतिक महिला दिन परिवर्तनात्मक तंत्रज्ञान आणि डिजिटल शिक्षणाच्या विकासासाठी नेतृत्व करणाऱ्या महिला आणि मुलींचा सन्मान आणि प्रशंसा करतो. जागतिक महिला दिन २०२३ डिजिटल लिंगभेदामुळे वाढत्या आर्थिक आणि सामाजिक विषमतेवर कसा परिणाम होतो याचे परीक्षण करेल. ऑनलाइन वातावरणात महिला आणि मुलींच्या हक्कांचे रक्षण करणे, डिजिटल प्लॅटफॉर्मवर लिंग-आधारित हिंसाचाराचा सामना करणे याकडेही या कार्यक्रमाचे लक्ष वेधले जाईल.