Iron deficiency anaemia

ऍनिमिया म्हणजे पंडुरोग किंवा रक्तक्षय ह्या नावानी ओळखला जातो. ऍनिमिया या विकारामध्ये रक्तातील लाल पेशींची संख्या कमी होणे म्हणजेच RBC ची संख्या कमी होणे हे दिसून येते. रक्तातील हिमोग्लो बिनचे प्रमाणत पासून ऍनिमियाचे निदान केले जाते. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, ऍनिमियाची व्याख्या, 5 वर्षांखालील मुलांमध्ये आणि गर्भवती महिलांमध्ये हिमोग्लोबिन पातळी <11.0g/dl, गैर-गर्भवती महिलांमध्ये <12.0 g/dl आणि पुरुषांमध्ये <13.0 g/dL अशी केली जाते.

Iron deficiency anaemia
रक्तात लोहाचे प्रमाण कमी झाल्यास याप्रकारचा ऍनिमिया आजार होतो. ‘लोह’ हे एक शरीरातील खनिज आहे. हे खनिज हिमोग्लोबिनच्या निर्मितीसाठी अत्यावश्यक आहे. हे खनिज शरीरातील लाल रक्तपेशींना शरीराच्या सर्वभागात ऑक्सिजन पुरवण्यासाठी मदत करतात. हिमोग्लोबिन हे लोह आणि प्रथिने यापासून बनलेले असते.

लोहतत्त्व कमतरतेची कारणे
1) आहारामध्ये लोहयुक्त खाद्यपदार्थाची कमतरता. समाजातील सधन वर्गामध्ये बदलती जीवनशैली. वाढते junk food चेप्रमाण, पौष्टिक व सात्त्विक आहाराचा अभाव, जेवणाच्या अनियमित वेळा इत्यादी कारणांमुळे याचेप्रमाण अधिक दिसून येते. गरीब वर्गामध्ये पौष्टिक आहाराचा अभाव, निरक्षरता इत्यादी कारणे आहेत.
2) गरोदरपणात शरिरात लोहाचे पुरेसा साठा नसल्यास किंवा पुरेसे लोह मिळत नसल्यास.
3) चहा, कॉफी, शीत पेयांसारख्या उत्तेजक पेयांचे अधिक सेवन केल्यामुळे शरीरात लोह शोषण (iron absorption) कमी होते.
4) पोटामध्ये होणारे जंत (hookworninfestation, giardiasis)
5) शरीरात कळतनकळत होणारा रक्तस्राव उदा. मूळव्याध, जठरामध्ये व्रण, स्त्रियांमध्ये मासिकपाळीत होणारा अतिरिक्त रक्तस्राव इत्यादी.
6) यकृत/मूत्रपिंड या अवयवांच्या दीर्घ आजाराने पीडित व्यक्तींमध्ये दिसणारा ऍनिमिया. (secondary to chronic illness)

लोहाच्या कमतरतेची लक्षणे:
थकवा जाणवणे, शारीरिक कमजोरी, चक्कर येणे, त्वचा पांढरी-निस्तेज होणे, धाप लागणे, डोकेदुखी, चेहरा-पाय-शारीरावर सुज येणे, जलद किंवा अनियमित हृदयाचा ठोका, नखं निस्तेज, कमकुवत होणं, pica - म्हणजेच अयोग्य प्रकारे खाणे, उदा. माती, बर्फ, खडू, पेन्सिल, वॉलपेन्ट इत्यादी. मुख्यत्वे लहान मुलांमध्ये अभ्यासात लक्ष न लागणे, रोगप्रतिकारशक्ती कमी होणे, वारंवार आजारी पडणे, शारीरिक व बौद्धिक वाढ नीट न होणे.
ऍनिमियाचे निदानात डॉक्टरांच्या सल्ल्याने काही आवश्यक रक्त तपासण्या करण्यात येतात.

लोहाची कमतरता कशी टाळायची
• सात्त्विक, पौष्टिक, लोह व जीवनसत्त्व युक्त पदार्थांचा नियमित आहारात समावेश असावा. उदा. हिरव्या पालेभाज्या, मेथी, पालक, बिट, अंडी, लालमांस, गूळ, मनुका, खजूर इत्यादीचा आहारात समावेश.
शक्य असल्यास लोखंडाच्या भांड्यात/कढईत भाजी करावी किंवा लोखंडाच्या तव्यावर चपाती किंवा भाकरी बनविणे त्यातून शरीराला लोह मिळते. गर्भवती स्त्रिया व लहान मुलांच्या आहाराकडे विशेष लक्ष पुरवणे, आहाराच्या सुनियोजित वेळा पाळणे आदी गोष्टी महत्त्वाच्या आहेत.
• घरातील प्रत्येक व्यक्तीने वर्षातून दोन वेळा म्हणजेच प्रत्येकी 6 महिन्यांनी जंताचे औषध घेणे. (regular deworming)
• ऍनिमियाला कारणीभूत असलेल्या व्याधींवर वेळीच उपचार करणे.
• गर्भवती व स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी नियमित लोहाच्या व फोलिक अॅसिडच्या गोळ्या घेणे.
• पहिले सहा महिने बाळाला फक्त आईचेच दूध पाजणे. (exclusive breast feeding)
• लहान मुलांना गरजेप्रमाणे लोह व जीवन सत्त्वाचे औषध देणे.

ऍनिमियाचा उपचार
ऍनिमियाचा उपचार ऍनिमियाच्या कारणावर, तीव्रतेवर अवलंबून असतो. सौम्य ते मध्यम ऍनिमियासाठी डॉक्टर लोह आणि फॉलिक अॅसिडच्या गोळ्यांचा सल्ला देतील. तोंडावाटे लोह सहन होत नाही किंवा गंभीर ऍनिमियामध्ये डॉक्टर लोहाचे इंजेक्शनचा सल्ला देतील. गंभीर ऍनिमियामध्ये रक्त देखील चढवले जाते.

प्रत्येक रुग्णाच्या उपचारांकरिता वेळ-कालावधी भिन्न असू शकते, तज्ञांच्या पर्यवेक्षणानुसार योग्यरित्या उपचार केल्यास लोहाची कमतरता निराकरण करण्यासाठी 3 ते 6 महिन्यांचा कालावधी लागू शकतो.

 

डॉ . कश्मिरा कडू
एम. डी . (मेडिसिन )