सिकल सेल: प्रतिबंध हाच उपाय

श्याम हा ५ वर्षाचा मुलगा. जन्मानंतर तो ६ महिन्यांचा झाल्यावार अचानक तो वरचेवर चिडचिड करू लागला. अनेकदा आजारी पडायचा., एक दोनदा तर त्याचे रक्तही कमी झाले होते. अनेक डॉक्टरांना दाखवल्यानंतर डॉक्टरांनी त्याला सिकलसेल हा रक्ताचा आजार आहे व त्याला आयुष्यभर हा आजार राहील, असे सांगितले होते. पहिले मुल असे आजारी म्हटल्यावर साहजिकच त्यांना आता दुसरे मूल पाहिजे, असे वाटत होते. होते. परंतु त्यालाही असाच आजार झाला तर....... आणि माझ्या मुलालाच हा आजार का झाला ? ह्याचे कोडे त्यांना सुटत नव्हते. सिकल सेल हा आजार का होतो ? आपण ह्यापासून येणा-या पिढीचा कसा बचाव करू शकू? या बद्दल आपण ह्या लेखात जाणून घेऊ या.

आपल्या सर्वाना कधी ना कधी पडल्याने लागले असेल व त्यातून रक्तसुद्धा निघाले असेल. तेव्हा जे रक्त निघते तेव्हा रक्ताचा रंग लाल असतो व तो रक्तातील लाल रक्त पेशीमुळे मिळतो. नैसर्गिकरित्या लाल रक्त पेशी चकतीच्या आकाराच्या अथवा दंडाकृती असतात. मात्र सिकल सेल या आजारात त्या विळ्याच्या अथवा चंद्रकोरीच्या आकाराच्या होतात. त्यामुळे त्याचे जीवनमान कमी होते व रुग्णाला रक्त द्यावे लागते. तसेच सेल ह्या रुग्णात यासोबत पेशी एकमेकात अडकल्यामूळे रक्त वाहतूकीत अडथळा निर्माण होतो व रुग्णाला विविध दुखणे जडतात व त्यामुळे इतर त्रास होतो.

 अ. निरोगी लाल रक्तपेशी ब. सिकलसेल लाल रक्तपेशी :

 सिकल सेल हे आजार सर्वच देशात, सर्व जाती धर्माच्या लोकांत, गरीब श्रीमंत, शिक्षित अशिक्षित असे कोणालाही हा आजार होऊ शकतो. हा आजार एक जागतिक समस्या असून आपण निरोग़ी दिसणा-या १०० व्यक्तींची तपासणी केली तर त्यातील ५ व्यक्ती या आजाराच्या वाहक असू शकतात. इतके असूनही आजही या आजाराबद्दल लोकांमध्ये अनेक प्रकारचे गैरसमज आढळतात. त्यामुळे बरेच लोक या आजारासाठी आपली तपासणी करत नाहीत अथवा आजार असल्यास इतरांना सांगत नाहीत. त्यामुळे पिढ्यानपिढ्या हा आजार चालत राहतो.

 या आजारांमध्ये दोन प्रकारचे लोक आढळतात:

वाहक: रुग्णाला अनेकदा या आजारामूळे कोणताही त्रास होत नाही. ते बाह्यरीत्या इतर निरोगी माणसासारखे दिसतात. इतकेच नाही तर त्यांच्या रक्तातील हिमोग़्लोबीनचे प्रमाणसुद्धा व्यवस्थित असते. वाहक व्यक्ती आपला आजार आपल्या पुढील पिढीला देत राहतात. त्याचे निदान करण्यासाठी” हिमोग्लोबीन ईलेक्ट्रोफोरेसिस “ही तपासणी करणे गरजेचे असते. यात सिकल सेल वाहकांमध्ये हिमोग्लोबीन एसचे प्रमाण ५० टक्केच्या खाली असते.

आजारी: सिकल सेलच्या आजाराची लक्षणे बहुरूपी सारखी विविध प्रकारची असतात. हा आजार आपले लक्षण कोणत्याही वयात दाखवू शकतो. तसेच वयानुसार अथवा एकाच घरातील दोन व्यक्तीमध्येसुद्धा याची लक्षणे वेगवेगळी असू शकतात. त्यामुळे या आजाराचे निदान होण्यास अनेकदा उशीर होतो. तसेच कधीकधी त्रास कमी असल्यास लोकांना आपल्याला हा आजार आहे, यावर विश्वासच बसत नाही.

 सिकल सेल आजाराची लक्षणे:

हा आजार दुर्धर व जन्मभरासाठी राहत असल्याने या आजारापासून बचाव करणे, हे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येकांने लग्नाआधी, लग्न झाले असल्यास बाळ होण्याआधी आपली तपासणी करणे अत्यंत गरजेचे असते. तसेच घरामध्ये कोणालाही हा आजार असेल तर घरातील इतर व्यक्तीनीही आपली तपासणी करणे गरजेचे असते. बरेचदा तपासणी करण्यासाठी सांगीतले असता बरेच लोक सांगतात, “ आमच्या घरात कोणालाही असा आजार नाही., आम्ही त्या जातीमध्ये मोडत नाही अथवा माझे रक्त कमी नाही ई.... “ परंतु आधी सांगितल्याप्रमाणे वाहक व्यक्तीला कोणताही त्रास नसल्याने तपासणी केल्यावर अथवा घरात या आजाराने ग्रस्त बाळ जन्माला आल्यावरच आपल्या घरात हा आजार आहे, हे अनेकांना माहीत होते.

सिकलसेल / थॅलेसेमिया कसा होतो

 पती व पत्नी हे दोघही सिकलसेल / थॅलेसेमिया या आजारचे वाहक/ रूग़्ण असल्यास हा आजार त्यांच्या मुलांना होतो. दोघांपैकी एकही निरोगी (तपासणीमध्ये वाहक नसल्यास) असल्यास बाळाला हा आजार होत नाही. त्यामुळे लग्नाआधी तपासणी झाल्यास व दोघे वाहक असल्यास दोन वाहक व्यक्तींनी लग्न करू नये. तसेच लग्न झाल्यावर समजल्यास डॉक्टरांच्या मार्गदर्शनात गरोदरपणाच्या पहिल्या तीन महिन्यात (१०-१२ आठवड्यात) गर्भ वार अथवा १६ ते १८ आठवड्यात गर्भजल चाचणी करून होणा-या बाळाला हे आजार आहे की नाही, याचे निदान करणे शक्य आहे.

 गर्भारपणातील तपासणी:

उपरोक्त पद्धतीचा अवलंब केल्याने सायप्रस नावाच्या देशात एकही थॅलेसेमियाग्रस्त बाळ जन्माला येत नाही. तसेच भारत सरकारनेसुद्धा आता हिमोग्लोबीनोपॅथी नियंत्रण कार्यक्रम सुरु केला आहे. या कार्यक्रमाचा उद्देश भारताला सिकलसेल / थॅलेसेमिया मुक्त करणे हाच आहे. चला, आपण सर्व संकल्प करू की आम्ही स्वत:ची, घरातील इतर व्यक्तीची या आजारासाठी तपासणी करू व या आजारापासून आपल्या पुढील पिढीला वाचवू !

 

डॉ. नरेश बा तायडे,

एम. बी. बी. एस. डी. सीएच, डी. एन. बी.

( जनुकिय व दुर्मिळ आजार तज्ञ. )