सर्जिकल डिसीज अँड ॲनिमिया

प्रिय वाचकांनो, लेखाचे शिर्षक वाचून तुमच्या लक्षात आलंच असेल की, आपण काय चर्चा करणार आहोत म्हणून ! तशा सर्जन या प्राण्याबद्दल समाजात बऱ्यापैकी कुतूहल आणि कौतुक असतं आदर असतो, म्हणून मी हे विशेषण मुद्दाम वापरलेलं नाही. कारण तो आता समाजातून लोप पावत चाललेला विषय आहे. असो, तो आजचा मुद्दा नव्हे ! आज आपण सर्जरीचे आजार आणि ॲनिमिया ही त्याची लक्षणे पाहणार आहोत.म्हणजेच असे ज्यामध्ये ज्यात ही लक्षणं आहेत,

  • शरीर पांढरे पडणे,
  • शारीरिक दुर्बलता,थकवा जाणवणे,
  • छातीत धडधडणे
  • भूक मंदावणे
  • अल्प परिश्रमाने धाप लागणे
  • त्वचा, नखे निस्तेज होणे,नखे रुक्ष होणे.
  • नखे चपटी दिसू लागतात. पण त्या आजारांना सर्जरी हाच उपाय असतो,अशा आजारांबद्दल आपण चर्चा करणार आहोत.

कडाडणाऱ्या विजेचा कानठळ्या बसवणारा मर्मभेदक आवाज ऐकल्यानंतर घोड्यांच्या कळपातील अनेक घोडे जसे वाट फुटेल तसे तिकडे इतस्ततः धावू लागतात, तसे अनेक प्रश्न तुमच्या डोळ्यांसमोर आले असावेत. परंतु या सगळ्यांची काही एक गरज नाही.आयुष्य वाटतं, तितकं अवघड नसतं तर त्यापेक्षाही सोपं असतं.

काल-परवाचीच गोष्ट पहा.आम्ही काही मित्रांनी पक्षी निरीक्षणाला जायचं,असं ठरवलं. मी माझ्या एका मित्राला फोन केला आणि सांगितलं परंतु त्याचं आढेवेढे घेणं सुरू होतं. व्यवसायने तो बॉटनीचा लेक्चरर आहे आणि उत्तम फोटोग्राफर ! म्हणून मग त्याला आमचा विशेष आग्रह होता.परंतु रुसलेली बायको जशी अनेक बहाणेदेते आणि मग सिद्ध करते, की तुम्ही जन्मोजन्मांतरीचे गुन्हेगार आहात..... तुमचा मूर्खपणा हा हिमालयासारखा उत्तुंग आहे....आणि तुमचे प्लॅन्स हे मेसवरच्या सोयाबीनच्या भाजीसारखे पोचट असतात.... मग उपकार केल्यासारखं ती अखेर हो म्हणते!~ अगदी तसंच या मित्राने केलं. पक्षी निरीक्षणाचा दिवस उजाडला. आम्ही सगळे कुंभारीच्या तलावाजवळ पोहोचलो होतो.सूर्याने हळूच डोकावून पाहायला सुरुवात केली होती. त्याची कोवळी किरणं आकाशामध्ये वेगळी छटा देत होती. पानांवरील दवबिंदू ओसरायला लागली होती. कळ्यांचे फुलांमध्ये रूपांतर होण्यास सुरुवात झाली होती त.लावाच्या पाण्यामध्ये हलके हलके तरंग पक्षाच्या हालचालींनी निर्माण होत होते.... अशा निसर्गरम्य वातावरणात आम्ही पक्षी निरीक्षणाला सुरुवात केली होती. तलावाला पूर्ण फेरि मारताना कुठेतरी नाश्ता करायचा आमचा प्लॅन होता. पक्षी निरीक्षणाचा पहिला नियम म्हणजे शांत राहणे आणि निसर्गाला समर्पित करणे हा आहे ! कारण निसर्गामध्ये अनेक गोष्टी सामावून घेण्याची शक्ती असते. आपलं दुःख,आपल्या वेदना,आपले नैराश्य हे सगळं निसर्ग आपल्यामध्ये सामावून घेतो. पक्षांच्या निरनिराळ्या बाबींमध्ये आम्ही गुंग झालो होतो. चालत चालत १/४ तलावाला वेढा आम्ही घातला होता. जवळपास दीड किलोमीटर अंतर असेल परंतु ह्या सगळ्यात माझा बॉटनिस्ट मित्र मात्र पार थकला होता. त्याला सकाळच्या वातावरणात घाम येत होता आणि तो काही बोलेना.

आता मात्र माझ्यातला सर्जन जागा झाला होता. मी त्याला ग्रुपपासून दूर घेऊन आलो आणि विचारले की तुला नेमकं काय होतंय ? त्याचा चेहऱ्यावरचा अशक्तपणा मला लक्षात आला. मी त्याला अजून खोदून खोदूनविचारायला सुरुवात केली तेव्हा त्यांने सांगितले की,त्याला शौचाला त्रास होतोय. त्यामुळे त्याची चिडचिड होत होती. माझ्या लक्षात आले की त्याला मूळव्याध किंवा फिस्तुला आहे...त्यामुळे त्याला त्रास होतो आहे...तसेच रक्त जात असल्यामुळे त्याचे हिमोग्लोबिन देखील कमी झालेले आहे. त्याला अशक्तपणा आलेला आहे... परंतु या गोष्टीपासून तो अनभिज्ञ आहे.तो फॅमिली फिजिशियनकडे जात होता, औषध घेत होता. सर्जनकडे गेलाच नव्हता.

खरं सांगायचं झालं तर असे अनेक आजार असतात की ज्यांचे योग्य निदान झाले नाही, तर योग्य उपचार होत नाहीत. आपल्याला होत असलेला त्रास आणि त्या त्रासाविषयी आपण जागरूक असतो तर ही वेळ आपल्यावर येतच नाही. उदा. थकवा, शरीराचा पांढरेपणा, ही सगळी लक्षणे ॲनिमियामध्ये दिसतात.आणि आपल्याला वाटतं की, ॲनिमियामध्ये म्हणजेच हिमोग्लोबिन कमी होणे, हा आजार आहे. परंतु हे असे नसून ते एका कुठल्या तरी आजाराचे लक्षण आहे. शौचाला त्रास होणे, यासाठी आपण डॉक्टरांकडे लवकर जाण्याचे टाळतो.परंतु त्या मागच्या परिणामाची कल्पना आपल्याला नसते. असे अनेक आजार आहेत. उदा.मोठ्या आतड्यांवर सुज येणे ( Ulcerative colitis, Crohn’s disease ), अन्ननलिका व जठरावरील सूज (Esophagitis, erosive Gastritis ), जठरावरील अल्सर (Peptic Ulcer ), डायव्हर्टिकुलीस (Diverticulitis), मोठ्या आणि लहान आतड्याचा कॅन्सर (Cancer of Colon ), हुकवर्मचा प्रादुर्भाव (Hookworm Infestation), मूळव्याध (Hemorrhoids ), गुद्वारामध्ये जखम होणे (fissure in ano ) ह्या सगळ्या आजारांची लक्षणे म्हणजेच शौचाचा रंग काळा होणे किंवा शौचातून रक्त पडणे, शौचाला त्रास होणे, अशक्तपणा येऊन नंतर याची परिणती ॲनिमियामध्ये होते. त्यामुळे आपण ह्या लक्षणांकडे सहजपणे दुर्लक्ष करू शकत नाही.साध्या पण त्रासदायक मुळव्याधसारखा आजार ते कॅन्सर सारखे आजार हीच आणि अशीच लक्षणे घेऊन येतात. त्यामुळे डॉक्टरांकडे जाणे, योग्य निदान व उपचार घेणे गरजेचे आहे.... हे सगळे त्याला समजावून सांगत होतो तेव्हा आमच्या चेहऱ्यावरचे गंभीर भाव पाहून बाकी मित्र काळजीने आमच्याजवळ पोचले होते.

ह्या सगळ्या गोष्टींची सखोल चर्चा आम्ही सगळ्या पक्षी मित्रांनी केली. आता मात्र सूर्य माथ्यावर आला होता. पक्षी स्थिरावले होते आणि आमच्या सगळ्यांची मने पण !


डॉ. श्याम भगत,
M.S.