व्हिटॅमिन बी १२ व पचनसंस्था
व्हिटॅमिन बी १२ या पोषकद्रव्याचे नाव आता बऱ्यापैकी सर्वपरिचित झाले आहे. आपली नियमित वार्षिक आरोग्य तपासणी करून घेणारे लोक अगदी आवर्जून आपले बी १२ नॉर्मल आहे किंवा नाही याची डॉक्टरांकडे चौकशी करत असतात. पण अगदी मायक्रोग्रॅम च्या मोजमापात शरीराला आवश्यक असणाऱ्या या व्हिटॅमिनच्या कार्याबद्दल आणि त्याची उणीव पडल्यास उद्भवणाऱ्या त्रासांबद्दल खरे म्हणजे अजूनही कोणाला सहसा खूप माहिती नसते.
व्हिटॅमिन बी १२ हे नवीन पेशींच्या निर्माणकार्यात आवश्यक असणारे द्रव्य आहे. नवीन पेशी तर शरीरात सतत निर्माण होत असतात. काही अवयांमधील पेशींचे आयुर्मान कमी असून वरचेवर त्यांचा नाश आणि पुनर्निर्माण होत असतो. रक्तातल्या लाल व पांढऱ्या पेशी, आतड्यांमधल्या पेशी ही त्याची काही उदाहरणे आहेत. याशिवाय मज्जासंस्थेतील महत्वाचे आवरण तयार करण्यासाठी सुद्धा व्हिटॅमिन बी १२ आवश्यक असते. पचनसंस्थेशी संबंधित त्रासांचा आणि व्हिटॅमिन बी १२ चा आपण अगदी थोडक्यात आणि सोप्या भाषेत आढावा घेऊया.
व्हिटॅमिन बी १२ हे शरीरात तयार होत नाही व शाकाहारी अन्नातून खूप कमी प्रमाणात उपलब्ध होते. अन्नातून घेतलेले व्हिटॅमिन बी १२ शरीराच्या उपयोगी पडावे यासाठी त्याचे शोषण व्यवस्थित होणे आवश्यक असते. ही प्रक्रीया जठर व लहान आतडे या दोन्हींमध्ये वेगवेगळ्या टप्प्यात घडते. जठर किंवा लहान आतडीत लहान-मोठा आजार झाल्याने शरीरात व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता होऊ शकते. व्हिटॅमिन बी १२ चा परिणाम मोठ्या आतडीतील नैसर्गिक फ्लोरा किंवा जैविक वातावरणावर होतो. योग्य प्रमाणात व्हिटॅमिन बी १२ उपलब्ध असल्यास मोठ्या आतड्यातील आपले छोटे मित्रजीव आतड्यांचे कार्य व्यवस्थित सुरु ठेवण्यास मदत करत राहतात. पण बी १२ च्या कमतरतेमुळे हा समतोल ढासळला तर त्याचा परिणाम पचनसंस्थेवर होतो. पचनसंस्थेचे तंत्र बिघडले की बी १२ चे शोषण होण्यात अजून अडचण निर्माण होते व एक दुष्टचक्र सुरु होऊन जाते. यामुळे कधी पातळ संडास होणे तर कधी बद्धकोष्ठता होणे असे दोन विरुद्ध प्रकारचे त्रास उद्भवू शकतात. वारंवार पोटात दुखण्याचा त्रास होऊ शकतो व त्यामागे कारण सापडत नाही, औषधांनी त्रास कमी होत नाही. कधी कधी बी १२ च्या कमतरतेमुळे कावीळ सदृश चित्र देखील दिसते. डोळे पिवळे होणे, भूक न लागणे, थकवा जाणवणे इत्यादी लक्षणे दिसतात. बी १२ च्या कमतरतेमुळे होणाऱ्या अनेमिया किंवा रक्तक्षयामुळे यातील अनेक लक्षणे उत्पन्न झालेली असतात. आपल्या कमतरतेच्या तीव्रतेवर लक्षणांची तीव्रता अवलंबून असू शकते.
CBC, LFT या रक्ताच्या चाचण्या व प्रत्यक्ष बी १२ च्या प्रमाणाची रक्ताची चाचणी यावरून बी १२ च्या उणिवेचे निदान करता येते. निदान झाल्याबरोबर लक्षणांची तीव्रता पाहून अनेक वेळा इंजेक्शन द्वारे बी १२ सुरु केले जाते. यामागे हेतू असा असतो की जर आपल्या शोषणाच्या प्रक्रियेत अडथळा असेल तर तो टाळला जाऊन शरीराला थेट उपयोग करण्यासारखे बी १२ उपलब्ध होते. शिवाय बरे होण्याची प्रक्रिया वेगाने सुरु होते. बी १२ ने उपचार सुरु केल्यावर सर्व प्रकारची लक्षणे वेगाने कमी होऊ लागतात. अनेकांच्या मनात असलेली कावीळ किंवा इतर मोठ्या आजाराची भीती हा हा म्हणता पळून जाते आणि रुग्णाला बरे वाटू लागते.
बी कॉम्प्लेक्स परिवारातले हे एकमेव असे व्हिटॅमिन आहे जे शरीरात साठवले जाते. त्यामुळे व्यवस्थित उपचार पूर्ण केल्यास पुढील काही काळापर्यंत शरीराला त्याचा तुटवडा जाणवत नाही. बी १२ गरजेपेक्षा जास्त प्रमाणात घेतल्याने देखील त्रास होऊ शकतो त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय, महिनोन्महिने याच्या गोळ्या घेणे अयोग्य आहे. कधी कधी डॉक्टरांनाही पेचात पडणारा हा पोषकद्रव्य शरीरातील जवळजवळ सर्व अवयांच्या कार्यासाठी महत्वाचा व बहुमोल आहे, हे मात्र खरे!
डॉ. अमित कविमंडन
एम. डी. (गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजि )