संपादकीय

"मोगरा फुलला, मोगरा फुलला
फुले वेचिता बहरू, कळीयासी आला!
मनाचिये गुंती, गुंफियेला शेला 
बाप रखुमादेवीवरु विठ्ठले अर्पिला..."


ज्ञानेश्वर माउलींच्या या ओळीतून मनाच्या विविध भावभावनांचा सुंदर शेला गुंफून तो देवाच्या चरणी अर्पण केला आहे. मनातील भावनांचा गुंता सोडवण्यासाठी जणू देवाला साकडेच घातले आहे. मानवी मन हे खरंच एक न उलगडणारे कोडे आहे.या संपूर्ण विश्वाची व्याप्ती जशी अफाट आणि  अमर्याद आहे, तशीच एका मानवी मनाचीसुद्धा! त्यामुळेच की काय अनेक संतमहात्म्यांनी मनाला उद्देशून उपदेश केले आहेत. आपल्या प्रचंड  बुद्धीमत्तेच्या आणि प्रतिभेच्या जोरावर मानवाने अनेक शोध लावले, भौतिक आणि शारीरिक सुविधा निर्माण केल्या, सुखे निर्माण केली. परंतु त्याला  स्वतःच्या मनाचा, भावभावनांचा गुंता सोडवणे शक्य होईलच असे नाही.

आपले मन सर्व काही आहे. आपण जो विचार करतो तसेच बनतो. परंतु तरी मनात येणाऱ्या तर्कवितर्कांवर, विचारांवर, विकारांवर नियंत्रण ठेवणे सोपे नाही. आजकालच्या धावपळ आणि स्पर्धेच्या युगात शारीरिक स्वास्थ्याबरोबरच मानसिक स्वास्थदेखील सांभाळणे कठीण झाले आहे. त्यामुळे नैराश्य, चिंता, तणाव, आत्महत्या करण्याची प्रवृत्ती हे सगळे विकार, बळावत चाललेले आहेत. स्वतःच्या विचारांमध्ये सकारात्मकता, आशावाद निर्माण करण्यासाठी स्वजागरूकता आणि सजगता यांची खूप गरज आहे. “मानसिक आरोग्य “ हीच संकल्पना ठेवून या वेळेचा, अश्विन शुद्ध प्रतिपदेचा अंक मन:पूर्वक सादर करीत आहोत. १० ऑक्टोबर जागतिक मानसिक स्वास्थ्य दिवस म्हणूनही त्याचे औचित्य आहे.

“Mental Health is a universal human right “, हीच यावेळची मानसिक स्वास्थ्य दिनाची थीम आहे. या अनुषंगाने : स्वजागरूकता, जाणिवेपासून नेणिवेर्यंतचा प्रवास” हा लेख मानसशास्त्रज्ञ प्रा.वनिता राऊत यांनी लिहिलेला आहे. मनात सकारात्मकतेच्या जोरावर कठीणातल्या कठीण आजारावरही नियंत्रण मिळवता येते. अशीच रोमहर्षक आपबिती आहे, कॅन्सर रुग्ण सौ.पूनम समीर गुल्हाने-डोईफोडे यांची. “होय, सकारात्मकतेने कॅन्सरवर मात करता येते!” या लेखात.

मानसिक आरोग्याच्या महत्त्वाच्या पैलूंपैकी एक म्हणजे सामाजिक आरोग्य. आजारी, दुर्लक्षित आणि दुर्बल अशा समाजातील व्यक्तींना योग्य मार्गदर्शनाने उपचार, आर्थिक मदत आणि आधार देणे, हे समाजाचा आपणही एक सुजाण नागरिक म्हणून आपले कर्तव्यच आहे. अशा या प्रयत्नांना परमेश्वरही यश देतो. अशीच यशोगाथा आपल्या शब्दात मांडली आहे, डॉ. मानसी कविमंडन यांनी. “तुझ्या कृपेने श्रीहरी, पांगळाही चढे गिरी” हा त्यांचा  लेख प्रेरणादायी आहे. मानसिक आरोग्य बिघडवण्यात वेगवेगळ्या मादक पदार्थांचा, व्यसनांचा मोठा वाटा आहे. “व्यसनाधीनतेची कारणे आणि ते थांबवण्याचे उपाय “ यावर “व्यसनमुक्ती “ हा लेख लिहिला आहे डॉ. अक्षय चांदूरकर या मानसोपचार तज्ञांनी.

समाजातील दुर्लक्षित, आजारी बालके, कुमारी माता, मानसिक रोगी यांची काळजी घेण्याऱ्या “वुमन्स फाउंडेशन” च्या अध्यक्ष गुंजनताई गोळे यांच्याशी भेट घेण्याचा योग आला. औचित्य होते सेवांकुर- “दिग्विजय दिन“ कार्यक्रमाचे. सेवांकुरच्या संस्कृती राठोड आणि साक्षी वाघ यांनी गुंजन ताईची घेतलेली मुलाखत, त्यांचा जीवनप्रवास उद्बोधक आहे. तसेच ” दिग्विजय दिना” निमित्त स्वामी विवेकानंदांच्या विचारांवर प्रकाश टाकणारे देवाशिषजी  फडणीस यांचे उद्बोधनावर आधारित लेख “Empowering Lives“ हा समाविष्ट केलेला आहे.

याचबरोबर सेवांकुरच्या विद्यार्थ्यांसाठी “ग्राम वर्ष - एक प्रवास सेवेचा“ या उपक्रमांतर्गत १५-१६ ऑगस्ट रोजी मेळघाट येथे गेलेल्या सहलीचा, शीतल मोरे व संपदा पाटील यांचा अहवाल सादर करीत आहोत.     शरीरात कुठे गाठ आली तर अशा गाठींचे निदान सहज करण्याची पद्धत FNAC याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे हॉस्पिटलच्या डॉ. सुवर्णा कुऱ्हाडे यांनी.

स्वच्छ दात हे निरोगी शरीराचा आरसा असतात. “दातांची निगा कशी राखावी“, याची माहिती मुलांना लहान वयातच करून देण्यासाठी टीमटाला संवेदना केंद्रावर “स्वच्छ दात स्पर्धा “ घेण्यात आली आणि दंत रोग तज्ञ डॉ. साक्षी शहा यांनी मुलांना मार्गदर्शन केले. ह्युमन मिल्क बँक म्हणजे  संजीवनी असते ! हे दूध कसे संकलित केले जाते, जमवले जाते आणि त्याचा उपयोग काय? यावर माहितीपर लेख लिहिला आहे बालरोग तज्ञ डॉ.  सोनाली शिरभाते यांनी.

दिवस गेल्यापासून स्वतः मातेला आणि घरच्या सगळ्यांना उत्सुकता असते, हिला मुलगा होणार की मुलगी?. त्याचे सामाजिक जीवनात उमटणारे पडसाद आणि स्त्रीभ्रूणहत्येसारखे गंभीर गुन्हे आपण जाणतोच.  यामुळे “ गर्भलिंग कसे ठरते? “ या विषयावर शास्त्रीय पद्धतीने विश्लेषण केले आहे  स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ डॉ. तनया देशमुख यांनी.

संगणक युगात AI म्हणजेच कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर सर्वच क्षेत्रात होत असताना “वैद्यकीय क्षेत्रात AI मुळे झालेली क्रांती,” या विषयावर माहितीपर लेख लिहिला आहे प्रशांत पाईकराव यांनी.

थीम एक घेऊन, पण विविध अंगांनी विचार करून हा अंक आम्ही सजवला आहे. या वेगवेगळ्या विषयांवर अभ्यासपूर्ण आणि रंजक लेख लिहिल्याबद्दल सर्व लेखक आणि डॉक्टरांचे आभार ! हा अंक नवरात्राच्या पावन दिवसात वाचकांना सादर करताना मनोमन समाधान नक्कीच होत आहे.

 

डॉ. प्रज्ञा बनसोड
संपादक