सेवांकुर - मेळघाट डायरी

“ग्रामवर्षा – एक प्रवास सेवेचा,”

या उद्देशाने आम्ही सेवांकुर टीम दि. १५ व १६ ऑगस्ट असे दोन दिवस मोठ्या उत्साहाने मेळघाट दर्शनासाठी निघालो. आदिवासी बांधव, महिलांसोबत भेटण्यासाठी निघालो. आदिवासीची दिनचर्या, जीवनशैली, त्यांचे खानपान, कलाकृती, बांबू आर्ट हे सगळे ऐकले होते. आदिवासी आणि मेळघाट म्हणजे आमची आदिम संस्कृती. ते जवळून पाहण्याची प्रचंड उत्सुकता मनात होती. आणि खरच हा प्रवास, मेळघाट, आमचे आदिवासींनी मनाला मोहून टाकले, अविस्मरणीय असे हे क्षण आहेत.

अमरावतीच्या डॉ. हेडगेवार हॉस्पिटलची ही संकल्पना. म्हणून सर्वप्रथम आम्ही सर्व वैद्यकीय विभागाचे विद्यार्थी हॉस्पिटलमध्ये एकत्र जमलो आणि १५ ऑगस्टला, सकाळी १० वाजता हा उत्कंठावर्धक प्रवास सुरु झाला.

परतवाडा येथे महाविद्यालयात स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्राचे आराध्य दैवत, छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या विविध शस्त्राची प्रदर्शनी आयोजित केली होती. मन यामुळे भारावले होते. “स्वराज्य सेवा प्रतिष्ठान “ ही प्रदर्शनी म्हणजे शिवकालीन वारसा जपणारे साहित्य, शस्त्र व छाताचीत्र प्रदर्शनी होती. “ इतिहासाचे मूक साक्षीदार, विदर्भाचे शस्त्रागार ! तलवारीचे प्रकार, भलं, चीलनम, चिलखत, परशु शस्त्र प्रदर्शनीत होते. मन नकळत इतिहासात डोकावले.

रणांगणात कैक तलवारी उसळल्या, भिडल्या, लढल्या आणि विजयी ठरल्या. परंतु भारतभूमीच्या काळजावर स्वतंत्रतेचा नकाशा कोरण्याचे सामर्थ्य बाळगणारी तलवार म्हणजे धोप होय.! मराठ्यांची शास्त्र म्हणजे केवळ रक्तपात नव्हे. याच शस्त्रांनी पराक्रम, नैतिकता, स्वाभिमान आणि स्वराज्याची निर्मिती केली आहे. छत्रपती शिवरायांची जगदम्बा भवानी तलवार या प्रदर्शनीत पहावयास मिळाली आणि आम्ही महाराजांसमोर जणू नतमस्तक झालो. विजय सरांनी आम्हाला त्यांच्या गोड आवाजात काही कविता ऐकवल्या.

यानंतर आम्ही सेवांकुर टीम धारणीकडे जाण्यास निघालो. मध्येच आम्ही थांबून घटांग येथे गरम-गरम चहा घेतला. घटांग मध्ये असतानाच पाऊस सुरु झाला.पावसात गरम मुग वाडे गरम चहा. थंडगार हवा आणि पाऊस. मेळघाटातील ही मजा सांगण्यापेक्षा ती अनुभवण्यात मज्जा आहे!

घटांग वरून पुढे निघालो. समोर सेमाडोह येथे थांबलो. इथूनच मेळघाट व्याघ्र प्रकल्प चालू होतो.

ओठावर हसू, गालावर खळी
नाजुकशा वेलीवर उमललेली कळी..

नदीतून खळखळ वाहतं पाणी व दाट हिरव्या झाडांमधून वाहणारा धबधबा हे निसर्गरम्य वातावरण आम्हाला सेमाडोहला अनुभवता आले.जाटू बाबांच्या मंदिरात दर्शनासाठी गेलो. बाबांबद्दल पूर्ण माहिती सांगितल्या गेल्याने त्यांचे महत्व, आदिवासी त्यांना का मानतात, हे समजले. ते त्यांचे आराध्य संत आहेत. धर्मांतर थांबविण्यासाठी ते प्रयत्नरत होते आणि त्यामुळेच त्यांची हत्या करण्यात आल्याचे दु:खद वास्तव समजले.

सायंकाळी आम्ही ७ वाजता धारणी येथे पोहोचलो. त्यानंतर आम्ही सर्व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेकरिता मैदानावर गेलो. तेथे लहान मुले आमच्यासाठी शाखा लावण्यासाठी थांबली होती. मग आम्ही गेलो तेव्हा शाखा भरली.

“ हरिगोविंद छात्रालय, धारणी“ हे आदिवासी मुलांसाठी सुरु करण्यात आले. आम्ही सगळ्यांनी छात्रावासात प्रवेश केला. तेथे मुलांचे हनुमान चालीसाचे पठन सुरु होते. आदिवासी म्हणजे परिसरातील खेड्यापाड्यातून आलेले विद्यार्थी होते. त्यांना घरच्यासारखे संस्कार, शिस्त असते. त्यांच्या खोलीला आदिवासी नृत्याचे नाव दिले होते. एकूण ३४ विद्यार्थी या छात्रावासात शिकत आहेत.बोरीगावातून आत ग्रम ज्ञानपीठ कोटा येथे आमच्या राहण्याची व उत्तम जेवणाची सोय निरुपमाताई देशपांडे यांनी केली होती. रात्री आम्ही सर्वांचे जेवण आटोपल्यावर सर्व एकत्र बसून गप्पा, गोष्टी केल्या. मुलांची आणि मुलींची गाण्याची स्पर्धा सुरु होती. आम्ही सर्व गप्पा गोष्टी मारीत असताना रात्रीला जुगनू किंवा रातकिडा,त्यांचे डोळे चमकदार दिसत होते.

दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता उठून, योग, प्राणायाम, मैदानी खेळ खेळलो. त्यानंतर आम्ही सोबत नदी पाण्याकरिता गेलो.मेळघाटातील सर्वात मोठी नदी म्हणजे सिपना ! सिपना नदीचे पत्र पाण्याने भरून होते. येथे अंघोळ केली. मुलांनी, आजूबाजूला हिरवंगार शेत, दाट झाडी आणि डोंगरदर्यातून खडखड वाहत पाणी...यानंतर आम्ही लवादा येथे संपूर्ण बांबू केंद्र पाहण्यासाठी निघालो.

संपूर्ण बांबू केंन्द्रात विश्वकर्माचे छोटेसे मंदिर होते. तेथे एक अपंग व्यक्ती बांबूपासून राखी, टेबल, आकाशकंदील हाताने बनवीत होते. त्यांच्या बाजूला एक महिला रंगकाम करीत होती. बांबू वस्तूला कीड लागू नये, उधळी लागू नये म्हणून गरम पाण्यात बांबूला उकळतात. नंतर त्याला जिलेबीचा रंग दिला जातो. लवाद येथील संपूर्ण बांबू केंद्र हे स्व. सुनीलजी देशपांडे व निरुपमा ताई यांच्यामुळे आदिवासी कारागिरांना व स्त्रियांना, महिलांना रोजगार मिळवून दिला.

आमची सेवांकुर टीम ही ४ गावात विभागली होती. त्यांच्य्सोबत काही कार्यकर्ते, मार्गदर्शक होते. बोरी, लवादा, चित्री आणि कोटा असे ४ गावात १० लोकांना पाठवण्यात आले. त्या गावात जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेणे किंवा आरोग्य विषयक माहिती देणे, हे आमचे काम होते. तेव्हा राखीचा सण जवळ आल्याने तिथल्या प्रत्येक गावात महिला ही राखी बनवताना दिसत होती. आम्ही बोरी या गावात गेलो. सर्वप्रथम अंगणवाडीत गेलो. तेथे मुलांना व्यवस्थित आहार दिल्या जातो. सोबतच लसीकरण केल्या जाते. गरोदर महिलांसाठी लसीकरण सुविधा अंगणवाडीत उपलब्ध आहे. पूर्वी प्रसूती महिला घरीच करीत असत, पण आता मात्र त्यांनी आरोग्य माहिती देऊन सजग केले जात आहे. आज गावातील महिला सरकारी दवाखान्यात जाऊन प्रसूती करतात म्हणून त्यांचा मृत्यू दर कमी झाला आहे. पूर्वी घरी बाळंतपण होत होतें तेव्हा हा मृत्यू दर जास्त होता.

हरिसाल या गावात सरकारी रुग्णालय आहे तर तेथेच सर्व महिला आरोग्य सुविधांचा लाभ घेतात. मेळघाट हा जंगल विभाग असून येथे लोक शेती करतात. शेतामध्ये काम करीत असताना त्यांच्यावर अस्वल किंवा वाघ, बिबट्या हल्ला केल्याने त्यांचा जागीच मृत्यू होतो.हे वास्तव आता बदलत असल्याचे सुखद चित्र आहे आणि अर्थातच याचे श्रेय सुनिलदादा आणि निरुपमा ताईना आहे. आज दादा हयात नाहीत.

सुनिलदादा आणि निरुपमा ताई यांनी हे कार्य मेळघाट मध्येच का उभं केलं, या मागची प्रेरणा काय ? कारण काय, हे जाणून घेणे महत्वाचे वाटले. मेळघाट मध्ये हे आदिवासी उपेक्षित होते. त्यांचा मुख्य व्यवसाय शेती आणि पशुपालन. भाषा कोरकू. दाराला आंब्याची पाने लावून साजरा केला जाणारा जिवती हा त्यांचा मुख्य सण. उदरनिर्वाह करताना ते परंपरा जपत होते. पण काळ बदलला. त्यांना आत्मनिर्भर आणि निर्भय बनविण्यासाठी या दोघांनी त्यांना आधुनिक काळ प्रवाहात आणले. आरोग्य सुविधा, शिक्षण यासाठी या दोघांनी कंबर कसली. ते तेथे गेले, राहिले. त्यांची भाषा, संस्कृती आत्मसात केली. तेव्हा त्या दोघांना आदिवासींनी आपले मानले.

ग्राम ज्ञानपीठमध्ये निरुपमाताईबरोबर चांद काम करते. ती दहावी उत्तीर्ण झाली नाही. पण तिची अभ्यासाची जिद्द, पाहून त्यांनी तिला पुढे शिकविले. संगणक ही आधुनिक काळाची गरज, तेव्हा तिला शिकविले. आज ती सर्व आर्थिक व्यवहार कौशल्याने आणि विश्वासाने सांभाळते. अशा कितीतरी जणांना सुनिलदादा आणि निरुपमाताईने घडविले, आत्मनिर्भर केले.

दु:ख काय तुला मोडेल, तूच दु:खाला मोडून टाक
फक्त तुझे डोळे इतरांच्या स्वप्नांशी जोडून टाक.

या नंतर आम्ही कोल्काज येथील जंगल सफारीकरिता निघालो. कोल्काज जंगलात मोर आणि हत्ती पहिले. नंतर अमरावतीला निघालो पण मनात लवादा घेऊन ! त्या आदिवासींच्या आठवणी आणि स्वप्न मनात घेऊन...पुन्हा एकदा तेथे जाण्याचा निर्धार करून.


शीतल अजय मोरे,
बी.एच.एम. एस. - 2