तुझ्या कृपेने श्रीहरी, पांगळाही चढे गिरी

टिमटाला - यवतमाळ रस्त्यावर अमरावती पासून २२ किमीवर असलेले छोटेसे गाव. डॉ. हेडगेवार हॉस्पिटल चा संवेदना हा प्रकल्प या गावात गेल्या ७ वर्षांपासून , व स्थायी स्वरूपात ३ वर्षांपासून चालतो. या गावात दिनेश जगताप राहतात. वय वर्षे ३५, त्यांच्या जन्मापासूनच  त्यांच्या पाठीच्या कण्यात व आतील मज्जासंस्थेमध्ये दोष होता. लहन असताना त्याचे काही ऑपरेशन देखील झाले होते पण ते व्यवस्थित झाले नाही. परिणामी त्यांच्या  दोन्ही पायांमधील ताकद हळू हळू कमी होत गेली आणि गेल्या ३-४ वर्षात उभे राहण्याची शक्ती पायातून निघून गेली. संवेदना प्रकल्पातील डॉ. नितीन पारखी यांच्या सल्ल्याने दिनेश जगताप यांनी डॉ. हेडगेवार हॉस्पिटल येथील न्यूरोसर्जन डॉ अभिजित बेले यांना दाखवले. डॉ बेले सरांनी व्यवस्थित तपासणी केल्यावर सांगितले की MRI बघून काही गोष्टींची खात्री होईल, पण दिनेश जगताप यांचे ऑपरेशन करायला हवे. लघवी व शौचावर नियंत्रण ठेवणाऱ्या मज्जातंतूंवर परिणाम झाला तर हे नियंत्रण गमावून बसावे लागेल, व आत्तापर्यंत जसा हा आजार ( meningomyelocele ) वाढत जाऊन त्यांच्या पायांमधील ताकद निघून गेली तसाच इथून पुढेही तो वाढेल व पायांतील ताकद अजून कमी होणे आणि नियंत्रण कमी-कमी होत जाणे असे गंभीर परिणाम समोर येतील. ऑपरेशन जटील आहे हे खरे, पण ऑपरेशन हा एकच पर्याय पुढील सन्माननीय जीवनाची शक्यता जिवंत ठेऊ शकतो.

दिनेश जगताप यांचे आई-वडील हयात नाहीत. एक सख्खा भाऊ आहे, जो त्यांना विचारत नाही. पाय बरे असताना ते संत गाडगेबाबा विश्वविद्यालयात लिपिकाची नौकरी करत असत. एका दूरच्या चुलत्याचे काही सहकार्य, काही विचारपूस त्यांना मिळत आली आहे, परंतु त्यांचीच  परिस्थिती बेताची असल्याने त्यांच्या सहकार्याला मर्यादा आहेत. आता गेल्या वर्षभरापासून नौकरी सुटली, पाय अगदी अधू झाले व सरकारकडून मिळणाऱ्या केवळ १२०० रुपयांच्या दिव्यांग- सहयोगाचा आधार राहिला. कोणीतरी शेजाऱ्याने किंवा कधी चुलत्याने जेवायला काही तरी द्यावे व त्यावर यांनी भागवावे इतकी निराश करणारी परिस्थिती. हातांच्या आधाराने समोर सरकावे लागू लागले. 

टिमटाळ्याचेच रहिवासी असणारे संवेदना प्रकल्पाचे प्रबंधक अनिकेत कराळे, आणि डॉ हेडगेवार हॉस्पिटलचे डॉक्टर्स यांच्या मनात मात्र दिनेश जगताप यांची मदत करण्याचा निश्चय पक्का होता. ऑपरेशन, औषधे, हॉस्पिटलमध्ये भरती राहणे इत्यादींचा  खर्च कमीतकमी ऐंशी ते नव्वद हजारांपर्यंत अपेक्षित होता. संस्थेच्या फंडमध्ये पैसे शिल्लक नव्हते व एकाच रुग्णामागे खूप मोठी रक्कम खर्च करणे म्हणजे इतर अनेक रुग्णांनी मदतीला मुकण्यासारखे झाले असते. 

साधारण गेल्या वर्षीच्या नव्हेंबर महिन्यापासून सिंगापूर येथे स्थायिक असणारे बिपीन कर्णिक व त्यांची लेक पायल कर्णिक हे दोघे संवेदना प्रकल्पाला नियमित मदत पाठवत आले होते. डॉ हेडगेवार हॉस्पिटलच्या एका डॉक्टरांशी अगदी अल्प परिचय होण्याचे निमित्त झाले आणि या कामाबद्दल विश्वास व आत्मीयता वाटल्याने त्यांनी हे सहाय्य देण्यास सुरुवात केली होती. त्यांच्या मार्फत अजून काही इच्छुक दान दाते भेटू शकतील का, दिनेश जगताप यांच्यासाठी कोणी समोर येऊ शकेल का हे चाचपून पाहावे असा विचार झाला. वडील आणि मुलीला दिनेश जगताप यांच्या संपूर्ण परिस्थितीची कल्पना दिली. रक्कम मोठी होती. तिघा-चौघांकडून मदत घेऊन, संस्थेने काही घालून निकड पूर्ण करावी असा आमचा विचार होता. पण मर्यादा आपल्याच कल्पनांना असतात, चांगुलपणालाही नाही, संवेदनेलाही नाही!! कर्णिक कुटुंबीयांनी ठरवले की दिनेश जगताप यांच्या ऑपरेशनचा खर्च आपणच उचलायचा!! झाले, इकडे मेसेज करणे अजून चालूच आहे तोवर त्यांनी बँकेत ९८ हजार रुपये ट्रान्सफर देखील केले!!! ऑपरेशनचा मार्ग मोकळा झाला. संवेदना आणि हॉस्पिटलच्या संपूर्ण टीमला आनंद तर झालाच पण सगळे लगेच कामाला लागले! बेले सरांना कळवण्यात आले - त्यांनी हे जटील आणि गुंतागुंतीचे ऑपरेशन करण्याची तयारी म्हणून पहिल्यांदा mri करण्यास सांगितले. mri साठी गावातून नेणे आणणे सर्व आपल्या ऍम्ब्युलन्स ने केले गेले. अनिकेत कराळे मोठ्या भावाप्रमाणे सतत सोबत होते. सुस्वभावी चुलते व एक दूरचा भाचा असे घरचे लोक डॉक्टरांशी बोलायला सुद्धा आले. भराभर सूत्र हलले, टेस्ट्स झाल्या, ऑपरेशनची तारीख ठरली. ऑपरेशन मध्ये गुंतागुंत होण्याची शक्यता तर असतेच, पण हॉस्पिटल स्टाफ आणि सर्व डॉक्टर्सची एकत्र सकारात्मकता एवढी होती की जगताप यांची हिम्मत द्विगुणित झाली. २५जुलै रोजी ऑपरेशन सकाळी ११ वाजता सुरु झाले. ७ तास चालले. डॉ बेले आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या सर्व टीमने आपले पूर्ण कसब पणाला लावले. पेशंटला ऑपरेशन नंतर icu मध्ये ठेवण्यात आले. प्रकृती स्थिर राहिल्याने लवकरच वॉर्ड मध्ये हलवण्यात आले. चौथ्या दिवशी काही प्रतिकूल परिस्थिती उद्भवली खरी पण डॉ बेले सरांचे अगदी बारीक लक्ष असल्याने वेळेतच त्यावर उपाय केले गेले. पूर्वीच गेलेली ताकद वापस येणे ही दुर्मिळ किंवा जवळजवळ अशक्य गोष्ट आहे, पण सरांच्या व पेशंटच्या लक्षात आले कि डाव्या पायातली त्यांची ताकद जाणवण्याएवढी सुधारली होती!! लघवी व शौचाचे नियंत्रण सांभाळणाऱ्या यंत्रणेला यशस्वीपणे वाचवले गेले होते!! ऑपरेशन पूर्णपणे यशस्वी झाले होते. ऑपरेशन नंतर १९ दिवसांनी दिनेश जगताप घरी गेले. 

ऑपरेशनच्या आधी हातावर सरकणारा दिनेश आज वॉकरच्या साहाय्याने एका पायावर बऱ्यापैकी भर देऊन चालू शकत आहे. त्यांच्या चेहऱ्यावर वेगळेच समाधान आहे. हॉस्पिटल आणि दूर देशातले ओळख-पाळख नसणारे दान दाते याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला त्यांच्याकडे शब्द नाहीत. कर्णिक कुटुंबीय दिनेशची प्रगती पाहून अनन्यसाधारण सात्विक आनंदाचा अनुभव घेत आहेत. त्यांना दिनेशला भेटण्याची, अमरावतीला येऊन डॉ  हॉस्पिटलला भेट देण्याची खूप उत्सुकता लागून राहिली आहे. कष्टाने आणि प्रामाणिकपणे अनेक जण खूप पैसे कमावतात, ते ज्याने-त्याने स्वतःवर खर्च करावे हे गैर तर नाही. पण आपली मदत कोणाचे तरी आयुष्य सावरू शकते या समाधानाला अन्य कशाची उपमा देणार? तो आनंद अमर्याद आहे! स्वास्थ्य, सेवा , सहयोग या त्रिसूत्रीवर काम करण्यासाठी कटिबद्ध असणाऱ्या डॉ हेडगेवार हॉस्पिटलच्या प्रवासात अशा यशोगाथा येतात आणि एका तेजस्वी परंपरेचा वारसा पुनःपुन्हा अधोरेखित करतात!! 

 

डॉ- मानसी कविमंडन 

फिजिशियन, डॉ हेडगेवार हॉस्पिटल, अमरावती