होय ! कॅन्सरवर सकारात्मक मात करता येते !

लग्नानंतर वेध लागतात ते आई होण्याचे !! मातृत्व म्हणजे स्त्री जन्माची सार्थकता ! माहेरी असलेल्या जबाबदारीमुळे माझे लग्न त्या मानाने जरा उशिरा झालेले. म्हणजे मी तिशीत होते. म्हणूनही आता बाळ हवेहवेसे वाटत होते. एकत्र घरात सुखात असताना मला  मातृत्वाची सुखद चाहूल लागली आणि सुखस्वप्नात दंग असलेले मी अचानक हादरले. कारण  मला स्तनात गाठ जाणवली. ती न दुखणारी होती म्हणून आम्ही काळजीत होतो आणि.... दुर्दैवाने आम्हाला वाटली तशीच ती गाठ कॅन्सरची निघाली.त्यातच मी आई होणार होते... मला माझे बाळ तर हवे होते. पण बाळाच्या भवितव्याचा विचार करता, काय करू ? काय करू.. चैन पडेना. अस्वस्थ मन:स्थितीत अनेक दवाखान्याचे  उंबरठे झिजविले... सगळ्यांचा सल्ला आता गर्भावस्था नको... असा होता. पण मी मात्र ठाम होते. अखेर डॉ. हेडगेवार हॉस्पिटल गाठले. या हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोग तज्ञ, फिजिशियन व सर्जन एका छताखाली आहेत..डॉक्टर, सासर –माहेर आणि माझी प्रबळ इच्छाशक्ती या बळावर कॅन्सरवर सकारात्मक मात करता येते, हे सिद्ध झालंय... होय, कॅन्सरवर सकारात्मक मात करता येते !

गडचिरोली, चंद्रपूरचे माझे माहेर. वडील सरकारी नोकरीत असल्याने बालपण सुखात गेलेले. आम्ही दोघी बहिणी लाडक्या. माझे लग्न झाले. मी घरातलं पहिलं बाळ असल्याने अधिकच लाडकी. आईविना बहिणी आम्ही. त्यात मला आमच्या गावापासून बरेच लांब दिलेले. माझी आजी अमरावती जिल्ह्यात राहते. त्यामुळे लग्नानंतर विदर्भातील हे स्थळ सुचविले गेले.  मी चांदूर रेल्वे तालुक्यातील मांजरखेड कसबा या लहान गावात आले. एकत्र घर, शेती, यांचा व्यवसाय यामुळे व्याप खूप. मी संसारात रमले. आई होण्याचे स्वप्न पाहू लागले. तशी सुखद चाहूल मला लागली. आम्ही सगळे आनंदात होतो. पण सुख नेहमी हुलकावणी देते तसे झाले. मला स्तनात गाठ जाणवली आणि ती दुखत नव्हती. मी जरा घाबरले कारण माहेरी कॅन्सरची हिस्ट्री आहे. तरीही बळ एकवटले. तपासणी केली आणि आम्ही व घरचे सगळेच हादरलो कारण मला झालेली गाठ दुर्दैवाने खरेच कॅन्सरची होती. मग सुरु झाला एक जीवघेणा उपचार प्रवास.

मनात अनेक आठवणीनी गर्दी केली. मला आठवले, वडील कोर्टात नोकरीला होते.तेव्हा त्यांच्या आईला, म्हणजे माझ्या आजीला कॅन्सर असल्याने लहान वयात त्यांच्यावर जबाबदारी आली, कर्ज, तडजोड त्यांना करावी लागली. तर लग्नानंतर काही वर्षात पुन्हा माझ्या आईला ब्रेस्ट कॅन्सर झाला. शुगर होतीच. त्यात तिचा एक पाय आणि एक हात अधू झाला. आईचा हा त्रास होता. पण  संसारात आणि आम्हा मुलींमध्ये तिचे मन गुंतले होते. यामुळे तिची विल पॉवर जबरदस्त होती. तिने त्या दुखण्यावर मात केली.  बाबांना व आम्हा बहिणींना घरात तिला मदत करावी लागत होती. आता आई या जगात नव्हती. बाबांना माझ्या विवाहाची काळजी वाटत होती. पण घरची जबाबदारी पाहता त्यामानाने माझे लग्न तीशीमध्ये झाले. पुढचा वैवाहिक जीवनाचा विचार करता तसा थोडा उशीरच झाला होता. मी पूनम अशोक डोईफोडे आता सौ. पुनम समीर गुल्हाने झाले होते. माझे पती समीर खूप सुस्वभावी आणि साथ देणारे आहेत. एकत्र कुटुंबात, सासरी मी सुखात आहे. आमचे गाव लहान असले तरी सासरची माणसे भली आहेत. वागण्याचे, बोलण्याचे स्वातंत्र्य आहे. घर मोठे आहे. यांच्या बिझिनेसमध्येही मी मदत करीत होते. घरातच राहिले पाहिजे, ही सक्ती नाही. मला आता आई होण्याचे वेध लागले. ती ओढ स्वस्थ बसू देईना.

मी अमरावतीला उपचार घेतले. डॉ. सावरकर यांच्या प्रयत्नांना यश आले. मला पाहता पाहता ३ महिने झाले. तब्येत छान होती. बेड रेस्ट नव्हती. जमेल ती कामे, विश्रांती असे सुरु होते. माझे सुखी संसाराचे स्वप्न सकारात होते. मी, माझे पती, घरचे, माहेरचे सगळे सुखावले. पण मध्येच ही गाठ उद्भवली आणि आम्ही सगळे काळजीत पडलो. कारण गाठ कॅन्सरची तर नाही ना ? माझ्या माहेरी हा आजार होताच. यामुळे मनात भय आणि अस्वस्थता होती. 

दुर्दैवाने तपासणी अंती माझी भीती खरी ठरली. गाठ कॅन्सरची निघाली. पण मी ठरवले की आपण घाबरायचे नाही. अनेकांनी माझ्या प्रकृतीचा आणि होणाऱ्या बाळाचा, आरोग्याचा विचार करता मी गर्भपात करावा, असे सुचविले. पण मी विचारांती ते न करण्याचे ठरविले कारण मला बाळ हवे होते. मला आई होण्याची तीव्र ओढ होती. अनेक उपचारानंतर मला दिवस राहिले होते. आता गर्भपात केल्यास नंतर पुढे मला ३ -४ वर्षे बाळंतपण हा विचारच करणे अशक्य होते. त्यामुळे मी ठाम होते. मी गर्भपात करणार नाही... शिवाय मी लहानपणापासून हा आजार बघत मोठे झाले होते. माहेरी माझ्या आजीला कॅन्सर होता. बाबांनी सगळे निभावले. मग बाबांचा संसार सुरु झाला आणि त्यानंतर माझ्या आईलादेखील कॅन्सर निघाला. तेव्हा आम्ही दोघी बहिणी लहान. यामुळेही असेल पण बाबा आणि आईने हार मानली नाही. ते दोघे हिमतीचे होते, सकारात्मक विचारांचे होते ! मी देखील अशीच हिमतीने आणि सकारात्मकतेने वागणार होते. आईचा आदर्श माझ्यासमोर होताच... माझ्या घरचेही माझ्या पाठीशी ठाम उभे राहिले, हे विशेष. मात्र बी. पी.वाढले होते. तरीही डॉक्टरांनी मला धीर दिला, की योग्य उपचाराने हा आजार बरा होऊ शकतो. उपचारा बरोबरच सकारात्मक विचार महत्वाचे !!

उपचारांचा विचार करता मला जवळ, अमरावतीमध्ये उपचार घेणे सोयीचे वाटत होते. प्रकृती, दगदग, पैसा, जाण्या येण्याची सोय.. सगळे पाहता डॉ. हेडगेवार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्येच उपचार घेण्याचे नक्की केले. तेथे विविध प्रकारचे अनेक तज्ञ डॉक्टर आहेत. सर्जन आणि कॅन्सर तज्ञ डॉ. यशोधन बोधनकर यांना दाखवले. बायोप्सी झाली. पाचव्या महिन्यात सर्जरी झाली. पुढे बोधनकर सरांनी मोठ्या विश्वासाने मला नागपूरला, नागपूर कॅन्सर हॉस्पिटलचे प्रख्यात कॅन्सर तज्ञ डॉ. आनंद पाठक यांच्याकडे केमो घेण्याचा सल्ला दिला. २१ दिवसांची ही सायकल. ४ वेळा केमो घेतली. आधीच गर्भारपणामुळे उलटी, मळमळ असते. आता तर हा जीवघेणा आजार. माझे नख काळे पडले होते. केस गेले होते. मळमळ होतीच.शौचाचा त्रास, उष्णता... या सगळ्यात हैमात्र माझे पती समीर ठाम होते. धीर देत होते. आर्थिक, शारीरिक, मानसिक सर्व दृष्टीने सासरचे पाठीशी होते. सासूबाई, जाऊबाई, दीर... सगळे दिलासा देत होते, मदत करीत होते.

या काळात देखील मी पूर्ण बेड रेस्ट घेत नव्हते.. अर्थात डॉक्टरांच्या सल्यानुसार मी वागत होते. माझी इच्छा शक्ती, कोणते औषधे चालतात, कोणते नाही, ही काळजी घेत होते सगळे.मला उलटी नव्हत, हे सुचिन्ह होते. जिद्द, सहनशीलता.. सगळ्यांची परीक्षा होती. मुळात मी बी. एस. सी., सायन्स पदवी होल्डर आहे. आणि प्रकृतीने धडधाकट आहे. त्यामुळे या आजारावर मात करणे शक्य होत होते. सुदृढ प्रकृती, उपचार, कुटुंब, देव आणि दैव यांची मला साथ होती. सगळी कामे मी जमेल तशी करीत होते.... कॅन्सर सर्जन, फिजिशियन, स्त्री रोग तज्ञ सगळे काळजी घेत होते. सर्व तपासणी, सोनोग्राफी सुरु होत्याच. पुढे  पाचव्या महिन्यात माझी कॅन्सर सर्जरी झाली. पुढे साडे पाच महिन्यांपासून केमो सुरु झाले. सातव्या महिन्यात संपले.

चला, नि :श्वास सोडला सुखाचा... शुगर होती... आठवा महिना सुरु होता. ठरवलं की,आता हा महिना काळजीचा आणि आरामाचा. बाळ अपुऱ्या दिवसांचे जन्मले तर अशक्त होईल, ही भीती होती. पण रोजच्या प्रमाणे दिवस उजाडला. माझी सगळी कामे झाली आणि माझ्या पोटात अचानक दुखू लागलं, कळा येत होत्या. ब्लीडींग व डिस्चार्ज सुरु झाला. डॉ. हेडगेवार हॉस्पिटलमध्ये स्त्री रोग तज्ञ डॉ. पल्लवी शेटे यांचे उपचार सुरु होते. मी तडक दवाखाना गाठला. शुगर, बीपी, कॅन्सर आणि आठवा महिना.. अपुरे दिवस... बाळ कमी वजनाचे होते. पण सुदैवाने जन्मल्याबरोबर बाळ रडले. धोका थोडा कमी झाला. हॉस्पिटलचे बालरोग तज्ञ डॉ. निनाद चौधरी यांनी बाळाची काळजी घेतली.केमोमुळे बाळाला श्वास निट घेता येईल की नाही,किंवा काय त्रास होईल यामुळे थोडे दिवस बाळाला भरती करण्यात आले. पण अखेर मी जिंकले !! मी आई झाले होते. शिवाय माझी कॅन्सरशी झुंज यशस्वी ठरली होती... मी आणि आता माझे बाळ आम्ही दोघेही सुखरूप होतो... माझे काही बरे वाईट झाले तर... ही भीती मनाला कुरतडत होतीच.. पण तसे काही झाले नाही. मी ही लढाई अखेर जिंकले...

माझे फॉलो अप सुरु होते, अजून आहे. बाळाला वरचे दुध आहे. माझा बाळ हा त्याच्या पाच ताईचा एकटा भाऊ. तो व मी दोघेही छान मजेत आहोत. संसार, घर, प्रकृती, बाळ सांभाळून मी माझा केक करण्याचा बिझिनेस, यांचा व्यवसाय सांभाळते आहे. घरची छोटी छोटी कामे करते. दुचाकी गाडी चालवते. आम्ही आनंदात आहोत. दोन्ही आजोबा, आजी, काकू यांच्या हाती बाळ सुरक्षित आहे... याचीसाठी केला होता अट्टाहास... आता वाटतं, सारे गोड झालेय.... म्हणूनच, मला सांगावेसे वाटते, हिम्मत हरू देऊ नका. सकारात्मक विचाराने अगदी कॅन्सर सारख्या दुर्धर आजारांवर यशस्वी मात करता येते....

 

सौ. पूनम समीर गुल्हाने (डोईफोडे)

मांजरखेड कसबा

शब्दांकन - सौ अनिता कुलकर्णी