पौगंडावस्थेतील मुलांचे मानसिक स्वास्थ्य 

किशोरावस्था’ म्हणजे आयुष्यातील एक अशी नाजूक अवस्था जिथे मुलं प्रथमच नवं-नवीन भावना, विचार, अपेक्षा आणि आंतरबाह्य शारीरिक घडामोडींना सामोरे जातात. या वयोगटात शरीरातील नैसर्गिक  बदल सुरु होतात आणि मग लैंगिक अवयव विकसित होण्यास चालना मिळते.

१० ते १९ वर्षे वयोगट म्हणजे बालपण ते प्रौढ असा स्थित्यंतराचा काळ, खरे तर हा  मुलांच्या जीवनातील अतिशय सुंदर व  रचनात्मक काळ  आहे. याच काळात त्यांची शारीरिक, बौद्धिक, मानसिक, भावनिक वाढ पूर्ण होते. ती निकोप नसल्यास अनेकदा समस्या निर्माण होतात. पालक देखील या काळात मुलांबद्दल काळजीत असतात.

मानसिक आजार या संकल्पनेबद्दल बरेच पूर्वग्रह मनात असल्यामुळे याबद्दल खरंतर मोकळे-पणाने बोलले जात नाही, त्याचमुळे आपण जेव्हा किशोरवयीन मुलांमधील मानसिक आरोग्य याबद्दल बोलतो तेव्हा हे लक्षात घेणे अतिशय उल्लेखनीय आहे की त्यांच्यामध्ये आणि इतर वयातील व्यक्तींमध्ये काय फरक असतो? किशोरवयीन काळात मुलांमध्ये भीती वाटणे, भविष्याबद्दल असुरक्षितता वाटणे मित्रांमध्ये तुलना, स्पर्धा, ताणतणाव तसेच नवनवीन गोष्टींबद्दलचे आकर्षण त्यामुळे निर्माण होणारी व्यसनाधीनता इत्यादी दिसून येतात. या काळात जर मानसिक आजार निर्माण झाले व त्यांच्याकडे योग्य तऱ्हेने लक्ष दिले गेले नाही तर भविष्यामध्ये ते बरे होण्याचा संभव कमी असतो व त्या व्यक्तीच्या एक सामान्य जीवन जगण्याला सुद्धा मर्यादा येऊ शकतात.

जागतिक आरोग्य संघटनेच्या नुसार, सात पैकी एक किशोरवयीन मुल मानसिक आजाराला बळी पडते व आत्महत्या हे १५ ते २९ वर्ष वयोगटातील व्यक्तींच्या मृत्यूचे चौथे मुख्य कारण आहे, हे वर्तमान परिस्थितीचे गांभीर्य दर्शवते.

मानसिक समस्या  उद्भवण्याची कारणे काय आहेत, हे पाहूया.

१.    शांत झोप नसणे, सदोष झोपेची पद्धत, आहार संबंधी विकार व चुकीच्या सवयी.
२.    प्रतिकूल परिस्थितीत ओळख निर्माण करण्याचा ताण.
३.    घरी व मित्रांसोबत दूर्लक्षित केल्याजाणे. 
४.    घरगुती हिंसाचार, अति-शिस्तप्रिय पालक आणि सामाजिक व आर्थिक समस्या
५.    सामाजिक व आर्थिक भेदभाव, दुर्लक्ष, योग्य आधाराची कमतरता.
६.    जुनाट आजार असलेले किशोरवयीन मुलं (ऑटिझम, स्वत्व  न ओळखणे, मेंदूचे आजार)
७.    कुटुंबात मानसिक आजार असणारी व्यक्ती असणे.
8.    पालकांच्या प्रसुतीपूर्व व प्रसूतीनंतर  आरोग्य समस्या.

पौगंडावस्थेतील सामान्य मानसिक आरोग्य समस्या

१.    नैराश्य व चिंता - मागील काही वर्षांमध्ये याचे प्रमाण वाढत असून या आजारांमध्ये होणारे सततचे मूड स्विंग्स दिसून येतात यामुळे शाळा/कॉलेजमध्ये गैरहजर राहणे, अभ्यासावर व कार्यक्षमतेवर सुद्धा परिणाम दिसून येतो. तसेच सामाजिक आरोग्यही धोक्यात येते व आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या मुख्य कारणांपैकी हे एक आहे.

२.    ईटिंग डिसऑर्डर : सदोष खानपान शरीराचे वजन, आकार, बाह्य सौंदर्य यांच्याबद्दल अतिसंवेदनशील असणे .

३.    वर्तणूकीचे विकार : इतरांच्या बोलण्याकडे लक्ष न देणे, अति आक्रमकता,  आत्मघातकी वर्तन ,परिणामांची पर्वा न करता विध्वंसक वर्तन करणे , तोडफोड करणे

४.    मानसिक विकार : जसे की भ्रम, भास, असंबंध  बोलणे, अयोग्य वर्तन. यामुळे शिक्षण आणि दैनंदिन सामान्य जीवनावर विपरीत परिणाम

५.    आत्महत्या : प्रमुख कारणे
    - मद्य व ईतर मादक किंवा  हानिकारक   पदार्थांचा गैरवापर
    - Abusive environment
    - अनियंत्रित भावना, मानसिक संतुलन ढळणे.
    वरील प्रमाणे काही विकार
    -  योग्य ती वैद्यकीय मदत घेण्यास संकोच

किशोरावस्थेतील मानसिक आरोग्य जपण्यासाठी काय करावे- दैनंदिन जीवनासाठी चांगल्या सवयी जसे की योग्य आहार व व्यायाम-कठीण पेचप्रसंग किंवा अडचणी सोडवण्यासाठी योग्य क्षमता निर्माण करणे-घर ,शाळा,आजूबाजूच्या परिसर तसेच समाजात मुलांसाठी एक सुरक्षित,विश्वासार्ह व प्रोत्साहन देणारे वातावरण निर्माण करणे.

हेल्थ एज्युकेशन म्हणजेच स्वास्थ शिक्षण. मुलांमध्ये रिस्क टेकिंग बिहेवियर म्हणजेच धोकादायक वर्तन निर्माण होऊ नये यासाठी योग्य,सुरक्षित पर्यायांची निर्मिती करणे.-मानसिक विकारांचे लवकर निदान व योग्य उपचार.-वरील समस्यांबद्दल समाजात जनजागृती निर्माण करणे व मानसिक आजारासाठी योग्य वैद्यकीय मदत घेण्यास संकोच न करणे - केवळ बुद्ध्यांकावरच (Intelligance Quitient) लक्ष केंद्रित न करता भावनिक गुणांक (Emmotional Quotient),सामाजिक गुणांक(Social Quotient), आध्यात्मिक गुणांक(spiritual quotient)या सगळ्यांचा योग्य तऱ्हेने विकास करणे.

 

डॉ. अक्षय चांदूरकर
मानसोपचारतज्ञ
डॉ. हेडगेवार हॉस्पीटल, अमरावती