संपादकीय

चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षाची सुरुवात. या निमित्ताने आपणा सर्व सुहृदांना मनःपूर्वक शुभेच्छा ! चैत्र महिना म्हणजे रखरखत्या उन्हात एका नव्या बहराची चाहूल. या महिन्यात येणारी नवी, कोवळी चैत्रपालवी मनाला आनंद तर देतेच पण रणरणत्या उन्हातही शितलतेचा अनुभव करून देते.    

हा दिवस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक,आद्य सरसंघचालक व भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक कार्यकर्ते पूजनीय डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचा जन्मदिवस आहे व त्यांच्या स्मृतीस वंदन करून हा अंक आज आपल्यापुढे सादर करीत आहोत.

गुढीपाडवा हा केवळ नववर्षारंभ नसून या सणाचे आपल्या भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. तो का व कसा  साजरा करावा याची अतिशय सुंदर व मुद्देसूद माहिती दिली आहे डॉ .अल्का बेडेकर यांनी. आपल्या आयुष्यात येणारे वेगवेगळे अनुभव, चढउतार पाहता कुठल्याही परिस्थितीत, विचलित न होता स्वतःचा तोल सांभाळत पुढे चालत राहणे म्हणजे तारेवरची कसरत आहे. हे करीत असताना आपले शारीरिक व मानसिक स्वास्थ्य यांचे संतुलन फार आवश्यक आहे.

आपल्या मानवी शरीरातील सर्व क्रियांचे संतुलन राखण्यात सर्वात मोठा वाटा असतो तो endorine system म्हणजेच निरनिराळ्या ग्रंथी व त्यांच्यातून स्त्रवणारे hormones म्हणजेच संप्रेरकांचा. हीच संकल्पना  घेऊन यावेळी काही सामान्यपणे आढळणाऱ्या “हार्मोनल आजारां”बाबत माहिती देत आहोत.

थायरॉईड ग्रंथीवरील सूज म्हणजेच गलगंड .याचे विविध कारणांपैकी एक म्हणजे pituitary /पियूष ग्रंथीचा ट्युमर याबद्द्ल लेख लिहिला आहे कान, नाक , घसा व गळा कॅन्सर तज्ञ डॉ. रवी गणेशकर यांनी. बदलत्या जीवनमानामुळे वाढत चाललेला PCOD/PCOS हा आजार,यात औषधोपचारा-बरोबरच आहारामध्ये बदल करणे आवश्यक असते. त्याबद्दल माहिती दिली आहे आहारतज्ञ प्रतीक्षा ठोसर यांनी.

व्हिटॅमिन डी हे जीवनसत्त्व हाडांच्या कॅल्शियम आणि फॉस्फरसचे होमिओस्टॅसिसचे नियमन करण्याव्यतिरिक्त अनेक संप्रेरकांचे उत्पादन आणि कार्य नियंत्रित करते. त्याबद्दल सविस्तर लेख लिहिला आहे डॉ.मंदार अंबेकर यांनी.

रजोनिवृत्ती ही स्त्रियांच्या आयुष्यातील अतिशय आव्हानात्मक परिस्थिती आहे. यात शारीरिक तसेच मानसिक संतुलन कसे साधावे व होत असलेले बदल कसे स्वीकारावे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले आहे स्त्रीरोग व प्रसुती शास्त्र तज्ञ डॉ. सुयोगा पानट यांनी.

४ मार्च हा दिवस "वर्ल्ड ओबेसिटी डे" म्हणून पाळला जातो. Obesity म्हणजेच लठ्ठपणा ही सध्या दिसून येत असलेली व अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना प्रभावित करणारी समस्या आहे. ही  समस्या अनेक शारिरिकच नाही तर मानसिक व सामजिक असंतुलानाचे मूळ आहे.

लठ्ठपणाचे विविध प्रकार,त्याचे होणारे परिणाम,उपचार व प्रतिबंध इ.बद्दल सविस्तर माहिती दिली आहे फिजिशियन  डॉ. भाविक चांगोले यांनी. ८ मार्च, जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने यावर्षी ठरवण्यात आलेल्या "inspire inclusion" या थिमच्या अनुषंगाने महिलांना विकास धारेत समाविष्ट करून घेण्यासाठी प्रेरित करा.... हा लेख लिहिला आहे प्रा.डॉ.शुभांगी इंगोले यांनी.

आमचे देणगीदार, हितचिंतक आणि स्नेहीजनाना एक अतिशय माहिती देताना आनंद होतो आहे, डॉ. हेडगेवार हॉस्पीटल आरोग्य सेवेचे एक तप पूर्ण करते आहे. आता पुढचे पाऊल म्हणजे नव्याने न्यु खंडेलवाल नगरात निर्माण होऊ घातलेल्या इमारतीचे भूमिपूजन , दि.३० मार्च २०२४ रोजी मान्यवरांच्या हस्ते एका छोटेखानी सोहळ्यात करण्यात आले. या सोहळ्यात उपस्थित सगळ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, त्यांच्या मनातील चैतन्याचा, उत्साहाचा परिचय देत होता. सर्वांच्या परिश्रमाने आणि शुभ-अशिषाने हे कार्य निश्चितच ठरलेल्या वेळेत सुरळीतपणे पार पडेल यात शंका नाही. संस्थेचे ध्येय आहे नागरिकांना, रुग्णांना सहज, सुलभ, दर्जेदार आरोग्य सेवा देताना ती एकाच छताखाली द्यावी! सगळ्यांना परवडेल अशा पद्धतीने सर्व अत्याधुनिक सुविधा ह्या नव्याने  साकारलेल्या भव्य सात माजली वास्तुत देण्याचा आमचा संकल्प आहे.

नवीन वर्षाची गुढी उभारत असताना स्वप्नवत असलेला हा नवीन, वैद्यकीय संकल्प ईष्ट तऱ्हेने साकारला जाऊन जनसेवेचे हे कार्य अखंड चालू राहो , हीच ईश्वरचरणी प्रार्थना!!