पिसीओडी आणि पिसीओस मध्ये आहाराचे महत्व

पीसीओडी म्हणजेच पॉलीसिस्टिक ओव्हेरियन डिसीज हि महिलांमध्ये उद्भवणारी मासिक पाळीशी संबधित स्तिथी आहे ज्यामध्ये परिपक्व स्त्रीबीजांच निर्माण वेळेवर होत नाही आणि गर्भधारणेत अडचण निर्माण होते. सामान्य भाषेत समजून घ्यायच तर ही आजकाल स्त्रियांमध्ये उद्भवणारी एक सामान्य समस्या आहे, जी मुख्यतः हार्मोनल असंतुलनामुळे होते. यामध्ये  अनियमित मासिक पाळी, दीर्घ वेदनादायक पीरियड्स, पुरळ, ओटीपोटात वेदना,वजन वाढणे, उच्च रक्तदाब, झोप न येणं, थकवा जाणवणे, डोकेदुखी, अचानक मूड बदलणे चेहऱ्यावरील केसांची वाढ आणि वंध्यत्व अशी लक्षणे दिसून येतात.

PCOD कोणाला आणि कधी होतो? 
    पीसीओडी ची समस्या हि पूर्वी 30 ते 35 वयोगटातील महिलांमध्ये दिसून येत होती. पण आता हि समस्या झपाट्याने वाढत आहे आणि 18 ते 20 वयोगटातील मुलींमध्ये सुद्धा PCOD च्या समस्येचे लक्षणं दिसून येतात. याच कारण मुख्यतः जीवनशैलीतले बदल आणि वाढत्या हार्मोनल समस्या आहे. आजच्या काळात 5 ते 10% महिलांमध्ये PCOD ची समस्या मुख्यतः स्त्रियां गर्भधारणेसाठी प्रयत्न करतात तेव्हा आढळते.पीसीओडीची समस्या सामान्य असली तरी प्रत्येक स्त्रीमध्ये त्याची कारणे वेगवेगळी असू शकतात.

१)    इन्सुलिनचे वाढते प्रमाण 
२)    जनुके - पीसीओडी अनुवंशिक आहे. अनेक वेळा महिलांना अनुवंशिकरित्या पीसीओडीची समस्या असू शकते.
३)    अस्वस्थ जीवनशैली किंवा निष्क्रिय जीवनशैली
४)    अयोग्य आहार 
५)    लठ्ठपणा (Obesity)
६)    सिगारेट आणि दारूचा अतिरेक.

PCOS काय आहे?
    पीसीओस PCOS हा मेटाबॉलिक विकार आहे जो PCOD पेक्षा अधिक गंभीर आहे. या परिस्थितीत, अंडाशय जास्त प्रमाणात पुरुषी हार्मोन एंड्रोजन रिलीज करते आणि अंडाशयात अनेक सिस्ट तयार होतात. ज्यामुळे स्त्रीबीज निर्मिती थांबते.Pcosच्या मागची अनेक कारणे असू शकतात.
१)     इन्सुलीन प्रतिकार 
२)    हार्मोनल असंतुलन 
३)    अनुवंशिक कारणे 
४)    एंड्रोजनच्या लेव्हल्स वाढणे.

वैद्यकिय उपाचाराबरोबरच या विकारात लाईफ स्टाईल मोडीफिकेशन करने म्हणजेच आहार व दिनचर्येत योग्य बदल करणे आवश्यक आहे.पीसीओडी आणि पीसीओज मध्ये आहारात करावयाचे बदल:
१) लो ग्लायसेमिक इंडेक्स कर्बोदके : रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी कमी ग्लायसेमिक  इंडेक्स असणाऱ्या कार्बोहायड्रेट्सची निवड करा. यामध्ये तुम्ही बाजारी, ज्वारी, नाचणी ( रागी ), ओट्स, गव्हाचा पास्ता, किक्नोआ यासारख्या भरड धान्यांचा समावेश करू शकता. त्यांचे पचन हळूहळू होत असून त्यांचा रक्तातील साखरेवर सौम्य प्रभाव पडतो.

२) हेल्दी फॅट : हार्मोन उत्पादनासह संपूर्ण आरोग्यासाठी फॅट्स आवश्यक आहे. यामध्ये नट्स ( बदाम व अक्रोड ), चिया सिड्स, सूर्यफुलांच्या बिया, भोपळ्याच्या बिया, फ्लेक्स सीडस्, जवस, मेथी दाणा, काळे  तीळ  अशा बियांचा समावेश अत्यंत महत्त्वाचा आहे. हे  मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स चे समृद्ध स्त्रोत आहेत.

३) उच्च फायबर असलेले पदार्थ : अनेकदा पीसीओडी मध्ये इन्सुलिनचा प्रतिकार असतो आणि  आहारात उच्च फायबरयुक्त पदार्थांचा समावेश केल्याने मदत होऊ शकते. यामध्ये भरपूर सालटे असलेली फळे, जसे सफरचंद, पेरू, डाळींब, नाशपती अशी फळे जी सालांसह खाऊ शकतो . 
    तसेच बिया आणि नट्स, हिरव्या पालेभाज्या तसेच सलाद (बीट, गाजर, काकडी) आणि अन्य भरपूर प्रमाणात हा आहार घ्या. 

४) प्रथिने: पीसीओसचे व्यवस्थापन करण्यासाठी आपल्या आहाराच्या चार्टमध्ये प्रथिने जोडणे महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. यामध्ये सर्व प्रकारच्या सगळ्या डाळी, मूग, मसूर, तूर आणि कडधान्य, राजमा, काळा चणा, काबुली चणा, बरबटी, अन्य सर्व डाळी, मोड आलेल्या व सालासहित पदार्थांचा आहारामध्ये समावेश करणे आवश्यक आहे . सोया प्रॉडक्ट्स, दूध आणि दुधाचे पदार्थ हे प्रथिनाचे चांगले स्त्रोत आहेत. हे सर्व पदार्थ केवळ स्नायुच्या आरोग्यालाच मदत करीत नाहीत तर अस्वास्थ्य पदार्थ आणि स्नॅक्सची इच्छा कमी करतात आणि रक्तातील साखर संतुलित करतात.

५) अँटी ऑक्सिडंट्स : आंबट फळे उदा किवी, स्ट्रॉबेरी, चेरी, टमाटे, आवळा, लिंबू आणि हिरव्या पालेभाजी, गाजर, डार्क चॉकलेट, बीट आणि अन्य फळे आणि भाज्यांचा आहारामध्ये मुबलक प्रमाणामध्ये  समावेश करा. यात मुबलक प्रमाणामध्ये अँटिऑक्सिडंट असतात जे PCOD संबंधित मळमळ आणि ऑक्सिडेटीव्ह स्ट्रेसचा सामना करू शकतात. ही फळे तुमच्या पेशीचे संरक्षण करण्यासाठी व तुमच्या शरीरातील नैसर्गिक डीटॉक्सिफीकेशन प्रक्रीयेला मदत करू शकतात.

हर्बल टी : ग्रीन टी, स्पिअरिस्ट टी, दालचिनी ट्री, जिंजर टी, लेमन ट्री अशा भरपूर अँटिऑक्सिडंट्स आणि अँटी एंट्रोजन असलेल्या या चहामुळे अतिरिक्त हार्मोन्स कमी करण्यास आणि इन्सुलिन संवेदनशीलता सुधारण्यास मदत होते.

हायड्रेशन : महिलांनी जवळपास आठ ते दहा ग्लास पाणी म्हणजे किमान दोन लिटर पाणी रोज प्यायला हवे. यामुळे विषारी आणि घातक पदार्थ शरीराच्या बाहेर टाकल्या जातात आणि पचन क्रिया सुधारते. पाण्यासोबत नारळ पाणी, लिंबू पाणी यांचा समावेश करावा.

पीसीओडी आणि पीसीओस मध्ये टाळण्याचे पदार्थ :

१) प्रक्रिया केलेले अन्न २) फायबर नसलेले स्नॅक्स आणि पेये ३) अत्याधिक कॅफीन (उदा. चहा आणि कॉफी) ४) मांसाहारी आहार (लाल मांस, हॉट डॉग, मटण आणि अन्य) ५) तळलेले आणि मसालेदार पदार्थ. ६) रिफाइंड तेल (उदा.सोयाबीन, पाम, सनफ्लॉवर, राईस ब्रँड  व अन्य) ७) जास्त मिठाचे पदार्थ (उदाहरणार्थ नमकीन) बदलत्या खानपान सवयींमुळे पीसीओडी आणि पीसीओएसच्या समस्या वाढत असून शरीरावर या पदार्थांचा अत्यंत वाईट परिणाम होऊ शकतो. हे पदार्थ कमी मात्रे मध्ये घेणे किंवा शक्य असल्यास टाळणे गरजेचे आहे. पिसीओस आणि पीसीओडीमध्ये आहाराचे महत्व आहेच पण सोबत थोडा व्यायाम, शांत झोप, कमी ताणतणाव आणि मेडिटेशनला महत्त्व देणे ही गरजेचे असते. योग्य आहार घेतल्यास आणि पूरक व्यायाम केल्यास तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेतल्यास पीसीओडीच्या विकारावर नियंत्रण आणता येते. परंतू, एकदा नियंत्रण आणल्या नंतर पुन्हा वाईट जीवनशैलीचा अवलंब केल्यास पीसीओडीचा विकार पुन्हा उद्भवू शकतो.

 

प्रतीक्षा ठोसर,
डाएटीशिअन