शरीरासाठी व्हिटॅमिन डी महत्वाचेच !!

व्हिटॅमिन डी हे एक संप्रेरक (harmone) असून ते  शरीरातील दात, मज्जातंतू आणि स्नायू यांना बळकटी आणण्यासाठी आवश्यक असते. आतड्यातून कॅल्शियम शोषून घेऊन ते हाडात आणि दातात जमा करण्यात त्याची मोलाची भूमिका असते.  व्हिटॅमिन डी मानवी शरीरात दोन स्वरूपात असते . D2 आणि D3. व्हिटॅमिन D2 हे मानवनिर्मित, वनस्पती-आधारित सप्लिमेंट्समधून मिळते, तर व्हिटॅमिन D3 ही आपली त्वचा सूर्यप्रकाश वापरून संश्लेषित करते आणि आपण काही प्राण्यांच्या अन्न स्रोतांमधून देखील मिळवू शकतो. शरीराला व्हिटॅमिन डी चा प्रत्यक्ष उपयोग करून घेता येत नाही तर त्यासाठी त्याच्या क्रियाशील घटकाची आवश्यकता असते.

कॉलिकॅल्सिफेरॉल किंवा व्हिटॅमिन डी चे आपल्या यकृतात २५ हायड्रॉक्सी कॉलिकॅल्सिफेरॉल ह्या घटकात रूपांतर होते. त्यानंतर मूत्रपिंड त्याचे रूपांतर १,२५ डाय हायड्रॉक्सी कॉलिकॅल्सिफेरॉलमध्ये करते. १,२५ डाय हायड्रॉक्सी कॉलिकॅल्सिफेरॉल हा क्रियाशील घटक असून त्याचा शरीराला उपयोग करून घेता येतो. असे रूपांतर करण्यात काही कारणाने अडथळा निर्माण झाल्यासही हाडांच्या मजबुतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो  शरीराला व्हिटॅमिन डी ची गरज का? शरीराचे सामान्य कार्य, योग्य वाढ आणि विकास राखण्यासाठी आपल्या शरीराला व्हिटॅमिन डी ची आवश्यकता असते.  व्हिटॅमिन डी फॉस्फरस आणि कॅल्शियम चे नियमन करण्यास मदत करते, ही दोन्ही खनिजे हाडे आणि दातांच्या निरोगी वाढीस चालना देण्यासाठी मोठी भूमिका बजावतात. ज्याच्या कमतरतेमुळे, मुडदूस (rickets) होऊ शकते. म्हणूनच आपल्या शरीराला दररोज व्हिटॅमिन डी योग्य प्रमाणात मिळावे हे सुनिश्चित करणे महत्वाचे आहे

व्हिटॅमिन डी ची कमतरता:
    व्हिटॅमिन डी ची कमतरता प्रामुख्याने अपुरा सूर्यप्रकाश आणि आहाराच्या कारणांमुळे उद्भवते. शरीरातील २० ते ५० mg/ml ही पातळी योग्य मानली जाते. म्हणूनच, जेव्हा  पातळी या आरोग्यदायी श्रेणीपेक्षा कमी होते तेव्हा या जीवनसत्वाची कमतरता उद्भवते.

व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचे निदान:
    व्हिटॅमिन डीच्या कमतरतेसाठी सर्वात सामान्य चाचणी म्हणजे 25-हायड्रॉक्सी व्हिटॅमिन डी ची  रक्त चाचणी.  बहुतेक लोकांमध्ये व्हिटॅमिन डीच्या कमतरतेची लक्षणे दिसत नाहीत. तथापि, व्हिटॅमिन डीची तीव्र कमतरता असलेल्या लोकांना हाडांमध्ये वेदना आणि कमकुवतपणा आणि वारंवार संसर्ग होऊ शकतो. निदानाची पुष्टी करण्यासाठी कधीकधी एक्स-रे केले जातात.

व्हिटॅमिन डीच्या कमतरतेची चिन्हे आणि लक्षणे
१)    थकवा
२)    हाडांचा कमकुवतपणा(ऑस्टियोपोरोसिस): हाडे ठिसूळ किंवा विरळ झाल्याने  तुटण्याची शक्यता असते.
३)    ऑस्टियोमॅलेशिया:  लहान वयात व्हिटॅमिन डी ची कमतरता असलेल्या मुलांमध्ये सामान्यतः  हाडे मऊ होतात, ज्यामुळे संरचनात्मक विकृती निर्माण होतात.
४)    स्नायू दुखणे, शरीरात वेदना किंवा अस्वस्थता
५)    नैराश्य, चिंता, थकवा, चक्कर येणे किंवा मळमळणे
६)    केस गळणे
७)    वारंवार जंतू संक्रमण आणि आजार
८)    मुलांमध्ये दम्याची लक्षणे
९)    हृदयरोग-संबंधित मृत्यू
१०)    जखमा लवकर न भरणे, अशक्तपणा
११)    लठ्ठपणा
१२)    मूड स्विंग आणि उदासीनता

व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे होणारे आजार
१) अस्थिरोग: लहान बालकांमध्ये मुडदूस तर मोठ्यांमध्ये हाडांचा कमकुवतपणा किंवा ऑस्टिओपोरोसिस, ऑस्टिओमलेशिया हे आजार दिसून येतात.
२) टाइप १ आणि टाइप २ मधुमेह : दीर्घकालीन व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे कधीकधी टाइप १  आणि टाइप २ मधुमेह होऊ शकतो. शरीर इन्सुलिन तयार करू शकत नाही किंवा व्हिटॅमिन डी च्या अपुऱ्या पातळीमुळे शरीर संप्रेरकांबद्दल (हॉर्मोन्स)असंवेदनशील बनते.
३) हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग: दीर्घ कालावधीसाठी व्हिटॅमिन डी ची कमतरता असेल तर उच्च रक्तदाब,हृदयरोग विकसित होऊ शकतात.
४) मेंदू व मज्जासंथेचे विकार: स्मृतिभंश, पार्किन्सन्स, मल्टिपल स्क्लेरोसिस, अल्झायमर ई.आजार व्हिटॅमिन डी कमतरतेमुळे होण्याचे प्रमाण अधिक आहे.
५) कर्करोग: व्हिटॅमिन डी ची कमतरता प्रोस्टेट, कोलन आणि स्तनाचा कर्करोग यासारख्या रोगांशी जोडली गेली आहे.
६) रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे: व्हिटॅमिन डी ची पुरेशी पातळी नसल्यामुळे  रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन वारंवार जंतुसंसर्ग होणे,जखमा लवकर न भरणे ई. अडचणी येऊ शकतात.

व्हिटॅमिन डी ची कमतराता होऊ नये म्हणून काय करावे?
१) आहार: पुरेसे व्हिटॅमिन डी मिळण्यासाठी काय खावे-
मशरूम- मशरूममध्ये व्हिटॅमिन डी चांगल्या प्रमाणात असते. मशरूम अतिनील किरणांच्या संपर्कात आल्यावर व्हिटॅमिन डी तयार करतात. कमी तेलात शिजवल्यास वजन कमी होण्यास मदत होते. 
सी फूड- काही माशांमध्ये व्हिटॅमिन डी भरपूर असते. अहवालानुसार, सॅल्मन, ट्यूना आणि मॅकेरल सारख्या माशांमध्ये व्हिटॅमिन डी चांगले असते.
संत्रा- संत्रा फळ किंवा रसाच्या रूपात घेता येतो. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासोबतच, ते शरीराला काही प्रमाणात व्हिटॅमिन डी देऊ शकते.
दूध व दुग्धजन्य पदार्थ- दुधात अनेक प्रकारचे पोषक घटक असतात. यामध्ये कॅल्शियमसोबतच व्हिटॅमिन डीचे प्रमाणही चांगले असते. विशेषत: गाईच्या दुधाबद्दल बोलायचे तर ते आरोग्यासाठी चांगले असते आणि त्यात व्हिटॅमिन डीचे प्रमाण चांगले असते. यासोबतच ते पचायला सोपे असते.
दही- दह्यामध्ये कॅल्शियमसोबतच जीवनसत्त्वेही चांगल्या प्रमाणात असतात. दह्याने हाडे मजबूत होतात आणि पोटही तंदुरुस्त राहते. पनीर, चीझ, बटर ई. मधेही व्हिटॅमिन डी असते

२) सूर्यप्रकाश: सूर्याची किरणे हे व्हिटॅमिन डीचे चांगले स्त्रोत आहे.  अतिनील किरणांचे (Ultra Violet) तरंग लांबीनुसार अ, ब आणि क असे वर्गीकरण केले जाते. त्यापैकी ब प्रकारचे किरण (UVB) ज्यांची तरंगलांबी २९० ते ३२० नॅनोमीटर असते तेच फक्त व्हिटॅमिन डी मिळवून देऊ शकतात. त्यापेक्षा जास्त किंवा कमी तरंगलांबी असलेले अ आणि क प्रकारचे किरण त्यासाठी निरुपयोगी ठरतात. सकाळी ११ ते दुपारी १ ह्या वेळेत ब प्रकारच्या किरणांचे प्रमाण सर्वाधिक असते. अर्थातच हीच वेळ ड जीवनसत्त्व मिळवण्यासाठी सर्वात योग्य असते. ह्या वेळेत आठवड्यातून दोन किंवा तीन दिवस रोज १५ ते 20 मिनिटे त्वचेवर घेतलेले ऊन पुरेसे व्हिटॅमिन डी मिळवून देऊ शकते. त्यासाठी रोजच उन्हात बसणे आवश्यक नसते. सकाळच्या कोवळ्या उन्हाची तीव्रता  प्रकाश जास्त विखुरल्यामुळे कमी असते तसेच त्यावेळी त्यातील उपयोगी अतिनील ब किरणांचेही प्रमाण कमी असते. त्यामुळे सकाळचे कोवळे ऊन आवश्यक तेवढे व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी पुरेसे होत नाही. भर दुपारी आणि त्यानंतर संध्याकाळी मात्र उन्हात शरीरास अपायकारक अतिनील अ किरणाचे (UVA) प्रमाण जास्त असते त्यामुळे तसे ऊन त्यावेळी त्वचेवर जास्त वेळ घेणे हितावह नसते.

व्हिटॅमिन डी चे अति प्रमाणात सेवन घातक असून त्याचे suppliments वैद्यकिय सल्ल्यानेच घ्यावीत.

व्हिटॅमिन डी अति झाल्यास दिसणारी लक्षणे:
१)    डोकेदुखी, मळमळ आणि चक्कर येणे
२)    सतत तहान लागणे
३)    तीव्र बद्धकोष्ठता
४)    अशक्तपणा
५)    मेंदूचे कार्यावर परीणाम होऊन अस्वस्थता,गोंधळ, चिडचिड निर्माण होणे 
६)    उच्च रक्तदाब
७)    वारंवार लघवीला होणे,व जास्त प्रमाणात लघवी होणे.
८)    भूक मंदावणे

वरीलपैकी कोणतेही लक्षण आढळल्यास त्वरित सल्ला घेणे आवश्यक आहे.थोडक्यात काय तर, व्हिटॅमिन डी हा  आवश्यक पोषक घटक आहे जो हाडे आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतो. हाडांना निरोगी आणि मजबूत ठेवण्यासाठी पुरेसे कॅल्शियम आवश्यक आहे आणि   शरीराला कॅल्शियम शोषण्यास मदत करण्यासाठी व्हिटॅमिन डी आवश्यक आहे. म्हणूनच सर्व आरोग्य तज्ज्ञ ते कमी पडू देऊ नका , असा सल्ला  देतात.  काही त्रास असल्यास त्वरित उपचार घ्या आणि मार्ग काढा. कोणतेही दुखणे अंगावर काढणे योग्य नाही.

 

डॉ.मंदार आंबेकर