महिलांना विकास धारेत समाविष्ट करून घेण्यासाठी प्रेरित करा

महिला दिन जगभरात साजरा होतो तो त्यांच्या प्रश्नांना वाचा फुटावी, एक व्यासपीठ मिळावे म्हणून. २०२४ सालच्या महिला दिनाची संकल्पना आहे, "Inspire Inclusion".\

स्त्री आणि पुरुष निसर्गाने एकमेकांसाठी पूरक बनवलेले असल्यामुळे स्त्रीला कमी लेखून  चालणारच नाही. निसर्गचक्र सातत्याने सुरु राहण्यासाठी पुरुष, स्त्री या दोहोंची  गरज असते. स्त्रिया या समाजाच्या शिल्पकार आहेत. आपल्या भारतीय संस्कृतीत प्राचीन काळी महिलांना सर्वाधिकार प्राप्त होतेच आणि त्यांना समाजात मानाचं स्थान होतं. इतिहासात डोकावल्यास कितीतरी महान स्त्रियांनी विविध क्षेत्रे सुवर्ण वलयांकित केलेली दिसतात. मात्र हे जरी सत्य असले तरीदेखील  मध्ययुगीन काळात अनेक कारणांनी स्त्रीला कमी दर्जाचे लेखले जाऊ लागले. भारतातल्या स्त्रीला तर शिक्षणापासूनही वंचित ठेवण्यात आले. “चूल, मूल आणि घर” हेच तिचे क्षेत्र आणि ही लक्ष्मणरेषा काहीही विचार न करता आखून दिली गेली. अशीच असमानतेची परिस्थिती बहुतेक इतर राष्ट्रातदेखील होती. पण हळूहळू स्त्रियांची घुसमट कमी होत गेली, त्या सजग झाल्या आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायविरुद्ध आवाज उठवू लागल्या.

भारतीय स्त्रीचा विचार करता सामाजिक, कौटुंबिक दबावाखाली व अज्ञानामुळे त्यांनी तोच मार्ग, जगण्याची पद्धत स्वीकारलीही. मात्र अज्ञानाच्या दलदलीत फसलेल्या दिन नारींची “ज्ञानज्योत” बनून सावित्रीबाई फुलेंनी स्त्री प्रगतीसाठी स्वतः अनेक सामाजिक संकटांशी सामना केला आणि स्त्रियांना ज्ञान,संस्कृतीचे दर्शन दिले. त्यांच्या पंखांना ज्ञानाची भरारी देऊन लिहिण्या-वाचण्यास सक्षम केले आणि स्वावलंबी बनवले. आज भारतीय स्त्रीयांनी सर्वच क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे.

क्लारा झेटकिन या जर्मन महिलेने, जर्मनीत सामाजिक महिला चळवळ सुरू करीत फार मोठे कार्य महिलांच्या योगदानासाठी केले. यासाठी तिथे “नॅशनल वुमन्स डे“ साजरा होऊ लागला. पुढे वेगवेगळ्या तारखांना वेगवेगळ्या देशात महिला दिन साजरे होऊ लागले. मात्र जगभरात सर्व महिलांच्या समस्या, त्यांचे प्रश्न एकत्रित आणि एकाच व्यासपीठावरून चर्चिल्या जावेत, म्हणून झेटकीन यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय महिला दिन ८ मार्च या तारखेला साजरा करण्यास सुरुवात झाली.

दरवर्षी वेगवेगळी संकल्पना ठेवून महिलांमध्ये सक्षमीकरण सुरू झाले. त्यांच्या कार्य आणि यशाचा गौरव होऊ लागला. २०२४ ची संकल्पना आहे, इन्स्पायर इन्कलुजन. अर्थात महिलांना प्रेरणा द्या व सर्व क्षेत्रांत सामाविष्ट करून घ्या. त्या कोणत्याही देशाच्या, जातीपंथाच्या, वर्णाच्या, पक्षाच्या, विचारधारेच्या, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक स्तरातील असल्या तरी त्यांना प्रगतीच्या, विकासधारेत आणा. त्याना  या धारेत बरोबरीने समाविष्ट करून घ्या. महिलांच्या या विविधतेला आलिंगन देऊन, महिलांना संपूर्ण समान दर्जा देऊन, त्यांना संधी द्या. त्यांच्या योग्यतेला सिद्ध करायला त्यांना मंच द्या. त्यांच्या वैविध्यतेतून एक सुंदर अशी जगनिर्मिती होऊ शकते. असे झाले तरच महिला आत्मविश्वासु, आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर,सक्षम बनतील. त्यांची स्वतंत्र आणि एकाच व्यासपीठावर विचार विनिमय करणारी वैचारिक बैठक व्हावी,  असे उल्लेखनीय योगदान त्या समाज, देश आणि या विश्वाला देखील देतील. यामुळेच पुढील पिढी अत्यंत सुस्थितीतील जीवन जगू शकतील. Inspire Inclusion या संकल्पने अंतर्गत अशी धारणा आहे, की समाजात अशी वातावरण निर्मिती व्हावी की ज्यामध्ये महिलांना हा समाज त्यांच्या हक्काचा वाटावा, आपला  वाटावा. या आपुलकीच्या भावनेमुळे त्यांच्यामध्ये एक आत्मिक ऊर्जा निर्माण होऊन त्या सक्षम बनतील आणि पर्यायने प्रत्येक घटकावर शुभ, अनुकूल परिणाम होतील आणि एक सुस्थितीतील समाज निर्माण होईल. खरंतर महिला दिन हा स्त्रीत्वाचा उत्सव आहे. तिला आत्मसन्मान प्रदान करण्याचा दिवस आहे. खरंतर हा दिवस, ही परिस्थिती नेहमीसाठीच असावी. स्त्रीचा सन्मान, गौरव, समानता, समान संधी, सुरक्षितता आणि तिला एक व्यक्ती म्हणून सदैव तिच्याकडे बघण्यातच या दिनाचे सार्थक होणार आहे. पुरुष आणि महिलांमधील सामाजिक, आर्थिक विषमता असो किंवा अन्य कोणतीही, त्या मुद्यांना वैश्विक पातळीवर उजेडात आणून समस्यांचे निराकरण करण्याबाबतचे प्रत्यक्ष कार्य व्हावे यासाठी हा दिवस फार मोठे योगदान देतो.

संविधानाने प्रत्येक व्यक्तीला समान हक्क प्रदान केला आहे. म्हणूनच स्वतः स्त्रीला आणि समाजालासुद्धा जाणीव असावी की, स्त्री ही प्रथम एक व्यक्ती आहे. केवळ जीवशास्त्रीय दृष्टिकोनातून पुरुष आणि स्त्री वेगवेगळे असून  सृजनाचे महान कार्य स्त्रीकडे आहे. ही तिची शक्ती मानावी. तीची दुर्बलता मानू नये. पुरुषांप्रमाणेच  महिला अधिक कर्तबगार  व कष्टाळू असून सुनियोजितपणे काम करतात. तरीदेखील सर्व स्तरावर (अपवाद वगळता) लिंगभेद केल्याचे दृष्टीस पडते. ती केवळ स्त्री आहे म्हणून तिला समान संधी न देणे, तिचे वर्चस्व सहन न करणे, तिला कमी लेखणे योग्य नव्हे !

स्त्री आणि पुरुष समाज रथाची  दोन चाके आहेत. महिलांना देखील पुरुषांना केवळ विरोधासाठी विरोध करायचाच नाही किंवा पुरुषांनीही असे मानू नये की, आमच्या अधिकारावर महिला अतिक्रमण करत आहेत. उलट स्त्रीला तिच्या हक्कापासून, योग्यतेपासून तिला स्वतःला सिद्ध करण्याची संधी न देता वंचित ठेवले तर महिला आणि पुरुष एका पातळीवर येऊन त्यांना समानता प्राप्त कशी होईल? समाजाची सर्वांगीण प्रगती कशी होणार?  महिलांना त्यांचे अधिकार प्राप्त होऊन लिंगभेद नष्ट कसा होणार? ती पूर्णपणे सक्षम, आत्मनिर्भर होऊन सुरक्षित असावी, यासाठी हा सर्व अट्टाहास आहे. कारण अजूनही ध्येय गाठायला रस्ता लांबच आहे !!

कुठलीही योजना आखताना, कायदे व्यवस्था करताना महिलांना सर्वार्थाने समाविष्ट करूनच, त्यांचा विचार करूनच निर्णय घेण्याची आज आवश्यकता आहे. कुणी असे म्हणू नये की, तू स्त्री आहे म्हणून असमर्थ आहेस! स्त्री म्हणजे दुर्बल, या मानसिकतेला छेद देण्यासाठी आज प्रत्येक स्त्री, प्रत्येक वर्तुळात समाविष्ट करून महिलांना समान संधी द्यायलाच हवी. त्या संधीचे निश्चितच सोने करतील. स्वतंत्र व्यक्ती म्हणून तिचा सन्मान आणि योग्यतेचा गौरव होत असेल, तिच्या क्षमतेनुसार संधी दिली, मिळाली आणि तिच्यातील उत्तम कौशल्य जाणून घेतल्यास तिच्यातील संप्रेरके (हार्मोन्स) योग्यपणे जागृत  होतात. ती मनोमन नक्कीच आनंदी होईल. आत्मविश्वासाने काम करून सक्षम असलेली महिला पूर्णपणे आपली योग्यता सिद्ध करू शकेल .ती स्वतः सक्षम होऊन आपले घरदार पुढे नेईल आणि आपल्या कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहू शकेल.

एखाद्या निर्णयात, कामात, चर्चेत, योजनेत स्त्रीचा सहभाग नसेल तर तो का नाही? याची जाणीवपूर्वक चौकशी करून तो अन्याय दूर व्हावा, यासाठी समाजाचा आग्रह असलाच पाहिजे. स्त्री किंवा पुरुष म्हणून नाही तर एक माणूस, व्यक्ती आहोत याचे भान ठेवले जाणे महत्वाचे आहे. सर्व स्तरातील महिलांना समान संधी देणे, सर्वांचा विकासात अंतर्भाव करून घेणे, प्रगतीमध्ये त्यांना समाविष्ट करून घेणे हे उचित होय. अशी व्यवस्था तयार करणे आवश्यक आहे.

असा विचार केला तर महिलांना निश्चितच समान संधी मिळेल. स्त्री मूल्य जपत, सक्षम करणे हाच उत्तम मार्ग आहे. म्हणून मी स्वतःपासून सुरुवात करते. एक सुंदर, मजबूत स्त्री शक्तीची साखळी तयार करून तिचा वैश्विक प्रगतीसाठी उपयोग व्हावा, म्हणूनच महिलानो, जाग्या व्हा. स्त्री म्हणून मागे राहू नका. समाजाने आणि तिने स्वतः  प्रयत्न करावा. इन्स्पायर इन्क्लूजन संकल्पना सोशल मीडियाच्या माध्यमातून उदा. दूरदर्शन, लघू चित्रपटाद्वारे प्रभावीपणे राबविली जावू शकते. मनुष्य जात म्हणून स्त्री पुरुषांनी, सगळ्यांनी विश्वशांतीने, आनंदाने या निसर्गात जगा,  असाच संदेश २०२४ च्या महिला दिन संकल्पनेतून निघतो आहे, नाही का?


प्रा. डॉ. शुभांगी इंगोले,
कल्पना विला, कॅम्प, अमरावती