स्वास्थ्य बोध

समदोषः समाग्निश्च समधातु मलः क्रियाः। 
प्रसन्नात्मेन्द्रियमनः स्वस्थइति अभिधीयते ॥

सुश्रृत संहिता, अध्याय 15, श्लोक 10

    ज्या व्यक्तीच्या शरीरात त्रिदोष म्हणजेच वात, पित्त आणि कफ समान (संतुलित) असतात, पाचक अग्नी म्हणजेच ऊर्जा व शरीराच्या सर्व उती आणि घटक, संपूर्ण भौतिक शरीर म्हणजेच सातही धातू समान म्हणजेच विकार रहित(संतुलित) असतात, तसेच सर्व उत्सर्जन कार्य (मल व लघवी उत्सर्जन) ही योग्य प्रकारे होत असतो, याचबरोबर सर्व इंद्रिये, मन प्रसन्न असतात अशीच व्यक्ती स्वस्थ व निरोगी आहे असे म्हटले जाते.

    निरोगी राहण्यासाठी शारीरिक व मानसिक स्वास्थ्य संतुलित असणे (आनंददायी व समाधानी मन) असणे आवश्यक आहे. तसेच शारीरिक स्वास्थ्य संतुलनासाठी नियमित आसन, प्राणायाम, ध्यान, मंत्रसाधना, व्यायाम, योग्य वेळेवर पोषक आहार, योगासने, शांत व पुरेशी झोप या सर्व बाबीकडे लक्ष देणे आवश्यक असते. या सर्वातूनच शरीरात चैतन्य निर्माण होते व आपण उत्साही राहतो.   

मानसिक स्वास्थ्य संतुलित ठेवण्यासाठी मन प्रसन्न व शांत असणे आवश्यक आहे. ते साधण्यासाठी ध्यानधारणा, चिंतन,सजगता, सकारात्मकता यांच्याबरोबरच आपल्या आवडीचे छंद जोपासणे, आपली बौद्धिक व आत्मिक वाढ होईल असे कर्म करणे आवश्यक असते.आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचा मनावर परिणाम होत असतो. त्यामुळे आपले नातेसंबंध जोपासणे, मनाने संवेदनशील असणे,तसेच काम, क्रोध, मद, मोह, मत्सर आणि लोभ या षडरिपूंवर नियंत्रण ठेवणे देखील आवश्यक आहे. हृदय, मन आणि बुद्धी व आत्मा आपल्या ताब्यात असणं महत्वाचं ! अशा प्रकारे शारीरिक आणि मानसिक संतुलन असणाऱ्या स्वस्थ व निरोगी व्यक्ती सफल आणि समृद्ध आयुष्य जगतात. (असे म्हणू शकतो) स्वस्थ तन आणि स्वस्थ मन म्हणजेच स्वास्थ्य.