कंठाशी गाठ

डॉ. हेडगेवार हॉस्पिटलमध्ये आजोबा घशाचा त्रास होतो म्हणून माझ्याकडे तपासायला आले तेव्हा त्या आजोबांची अवस्था अतिशय वाईट होती. त्यांना गळ्याचा गाठीमुळे श्वास घ्यायलाही त्रास होत होता. यामुळे रात्री नीट झोप येत नव्हती. अन्न व पाणी गिळण्यास त्रास होत होता. झोप आणि जेवण व्यवस्थित नसल्याने मग वजन कमी होणे, हृदय गती वाढणे, चिंता, अस्वस्थता, उष्णता, हात थरथरणे असे त्रास सुरु झाले. आजोबा दवाखान्यात आले तेव्हा त्यांच्या घशाला सूज होती. आवाज भारी होणे, डोकेदुखी, मळमळ, उलटी, गिळण्यात समस्या येणे, मान व गळा यात वेदना होणे, थकवा, अशक्तपणा.. हे पाहून थायरॉइडची समस्या आहे, असे लक्षात आले.

थायरॉईड ही एक ग्रंथी असून तिचा आकार एका फुलपाखरासारखा असतो आणि ती मानेच्या खालच्या भागात स्थित असते. तिचं मुख्य कार्य म्हणजे शरीराच्या चयापचय क्रियेचं नियंत्रण ठेवणे (जगण्यासाठी आवश्यक कार्यं पेशी ज्या गतीनं करतात तो दर). चयापचय नियंत्रणात ठेवण्यासाठी, थायरॉईड ग्रंथी संप्रेरकांचं उत्सर्जन करते, जे शरीरातील पेशींना किती ऊर्जा वापरायची ते सांगतात. योग्यप्रकारे काम करणारी थायरॉईड शरीराची चयापचय क्रिया समाधानकारक गतीनं चालू ठेवण्यासाठी आवश्यक प्रमाणात संप्रेरकांचं उत्पादन करते. संप्रेरक हे जसजसे वापरले जातात तशी त्यांची भरपाई थायरॉईड ही करत असते. रक्तातील थायरॉईड संप्रेरकांचं प्रमाण हे पोषग्रंथिव्दारे (पिट्युटरी ग्रंथी) नियंत्रित केले जाते. मेंदूच्या खालच्या भागात कवटीच्या मध्यभागी स्थित असलेल्या ह्या पिट्युटरी ग्रंथीला जेव्हा अतिप्रमाणातील किंवा कमी प्रमाणातील थायरॉईड संप्रेरकांची जाणीव होते, तेव्हा ती आपला संप्रेरक (टीएसएच) कमी किंवा जास्त करते आणि तो थायरॉईडला पाठवून तिचे कार्य नियंत्रित करते.

काही कारणामुळे जर थायरॉईड ग्रंथीवर सूज आली तर आपण त्याला गॉयटर किंवा गालगुंड असे म्हटले जाते.ग्रंथीचा आकार वाढत जाऊन त्याच्या परिणामस्वरुप ग्रंथीच्या आजूबाजूच्या अवयवांवर (श्र्वासनलिका, अन्ननलिका, नर्व्हज ई.) दबाव पडल्यामुळे वरील लक्षणें दिसुन येतात. आजोबांच्या बाबतीत त्यांच्या पिट्यूटरी ग्रंथी मध्ये गाठ (पिट्यूटरी अडेनोमा) असल्याचे निदान 20 वर्ष आधीच झाले होते व त्यासाठी त्यांचे ऑपरेशन देखिल झाले होते. या ट्यूमरमुळे TSH या संप्रेरकांचा अतिरिक्त स्राव झाल्यामुळे थायरॉईड ग्रंथीचा आकार वाढत जाऊन वरील परिस्थीती निर्माण झाली होती.

पिट्यूटरी ग्रंथी ही छोट्या आकाराची ग्रंथी असते जी आपल्या मेंदूच्या तळाशी स्थित असते. हीला Master gland असेही संबोधले जाते. ह्या ग्रंथींमधून अनेक प्रकारचे संप्रेरके उत्सर्जित केले जातात जे इतर ग्रंथींना कंट्रोल करतात जसे की थायरॉईड हॉर्मोन, ग्रोथ हॉर्मोन, ह्याशिवाय असे अनेक हॉर्मोन ज्यांची आपल्या शरीराला गरज असते ते ह्याच ग्रंथींमधून उत्सर्जित केले जातात. अगदी अपवादात्मक केसेस मध्ये ह्या ग्रंथींमध्ये ट्यूमर होतात ज्याला वैद्यकीय भाषेत अडेनोमा असे म्हणतात. ह्या ट्यूमर मुळे संप्रेरकांचा कमी किंवा अधिक स्त्रावामुळे ईतर ग्रंथींचे कार्य देखिल अनियंत्रित होते व त्यामुळे बराच त्रास  सहन करावा लागू शकतो. आजोबांच्या बाबतीत याचा परीणाम थायरॉईड ग्रंथी वर होऊन तिच्या आकारात वाढ झाली होती.

आजोबांना थायरॉईडच्या गाठीसाठी ऑपरेशन करण्याचा सल्ला पूर्वीही अन्य डॉक्टरांनी दिला होता.मात्र, आर्थिक चणचण, शस्त्रक्रियेची भीती व मानसिक तयारी नसल्यामुळे त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. परिणामी आठ -दहा वर्षांनंतर आजोबांची ती गाठ जवळपास १३ सेंटीमिटर एवढी मोठी झाल्याचे लक्षात आले. त्यांचा खालचा जबडा ते छातीपर्यंत आजोबांची गाठ वाढली होती. आता परिस्थिती अशी गंभीर आली की, ऑपरेशन करणे अधिक गुंतागुंतीचे झाले होते. मग त्यातून अनेक समस्या निर्माण झाल्या.अखेर आजोबा माझ्याकडे आले. मी देखील तपासणी अंती त्यांना ऑपरेशनचाच सल्ला दिला. ऑपरेशन ची रिस्क आणि गुंतागुंत समजावून दिल्यानंतर आजोबांवर तब्बल सहा, सात तासांची शस्त्रक्रिया झाली आणि ते या त्रासातून मुक्त झाले. गाठीच्या पथोलॉजी रिपोर्ट नुसार आजोबांची गाठ म्हणजे थायरॉइड गॉईटर होती. अशा शस्त्रक्रियेनंतर नियमित व्यायाम, औषधे आणि तपासणी रुग्णांनी मात्र अवश्य करावी.

 

डॉ. रवी गणेशकर