मधुमेह आणि दैनंदिनी

तणाव हा आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे आणि सहनशक्तीच्या बाहेर असणाऱ्या परिस्थितीतून मानसिक आणि शारीरिक थकवा येतो आणि आपली प्रतिकार शक्ती कमकुवत होते. परिणामी शरीरात अनेक व्याधींचा शिरकाव होतो. म्हणूनच मानसिक स्वास्थ्य बिघडले की शरीर सुदृढ राहू शकत नाही. वैद्यकीय भाषेतील स्ट्रेस म्हणजेच टेन्शनमुळे जीवनातील अनिश्चितता वाढलेली आहे.

सुसंस्कार आणि आरोग्य संतुलन राखण्यास मन ही एकच प्रेरक शक्ती आहे आणि मनाला दुर्बल न होऊ देण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने जाणीवपूर्वक प्रयत्न केला पाहिजे. शरीर क्रिया, चयापचय नियमित होण्यासाठी, सगळी इंद्रिय कार्यक्षम राहण्यासाठी मन:स्वास्थ्य सुदृढ असावे. आपल्या मेंदूमध्ये हायपोथँलॅमस तसेच पिट्युटरी ग्रंथी अनेक प्रकारची संप्रेरकें बनवून त्यामार्फत रासायनिक संदेश शरीरातल्या दुसऱ्या ग्रंथीकडे पोहोचवतात. ज्यावेळी तणावपूर्ण परिस्थितीला आपण सामोरे जातो, त्यावेळी ही ग्रंथी तत्काळ कार्यरत होऊन रासायनिक संदेश किडनीच्या वरती असलेल्या अँड्रीनल ग्रंथीला पोहोचवतात. यामुळे ग्रंथी उत्तेजित होऊन त्यातून अँड्रीनालीन आणि नॉन अँड्रीनालीन असे रसायन तयार होते आणि आपल्या रक्तात सोडले जाते. या दोन्ही रसायनांमुळे शरीरातील लक्षावधी मज्जातंतू शरीराला सावध करतात. आपल्या शरीरात होत असलेल्या अनेक रासायनिक प्रक्रियांमुळेच आपण स्वतःला त्या क्षणी सावरू शकतो. हे होत असताना आपल्या शरीरात नक्की कोणते बदल घडतात ?

१)    आपल्या हृदयाचे ठोके वाढतात.
२)    रक्तदाब वाढतो.
३)    श्वासोश्वास वाढून जास्तीत जास्त प्राणवायू पेशींना पोहोचवण्याची प्रक्रिया वाढते.
४)    अँड्रीनल ग्रंथी- काँर्टीसाँल नावाचा पदार्थ तयार करते. त्यामुळे रक्तातील साखर व कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते.
५)    रक्तात गाठी तयार होणारी प्रक्रिया किंवा चिकटपणा वाढतो.
६)    रक्तबिंबिका (platelets )रक्तवाहिन्यांच्या आतील बाजूस चिकटून रक्ताच्या मार्गावर अडथळा निर्माण होऊ शकतो.

    अशाप्रकारे रासायनिक पदार्थांची पातळी वाढल्याने हृदयाचे स्नायू आकुंचित होण्याची शक्यता वाढते.कोलेस्ट्रॉलची पातळी खूप काळ प्रमाणापेक्षा जास्त राहिल्यास रक्तवाहिन्या कडक होण्याची प्रक्रिया वेगाने वाढते.यालाच वैद्यकीय भाषेत व्यक्त अथेरोस्लेरोसीस म्हणतात. अनेक संशोधनानंतर असे लक्षात येते की,तणावपूर्ण वातावरणात वावरणाऱ्या किंवा तणाव नीट न हाताळणाऱ्या व दीर्घ काळासाठी तणावग्रस्त व्यक्तींमध्ये हृदयविकाराची शक्यता जास्त असते.

आधुनिक युगात होत असलेल्या प्रगतीमुळे एका जागी काम करण्याची जीवनपद्धती प्रचलित झाली आहे.श्रम विरहीत जीवनामुळे ,तसेच फास्ट फूडमुळेही मधुमेहासारख्या आजारात वाढ होते आहे. मानसिक त्रास असल्यास मधुमेहाचा धोका वाढतो. अचानक मनावर ताण आल्यास उपाशीपोटी साखर कमी होते तर जेवणानंतर ती एकदम वाढलेली आढळते. कधीतरी गोड खाण्याची तीव्र इच्छा होते. पण कुटुंबियांनी रागावल्याने चोरून गोड खाणे वाढते. मधुमेहींना सारखे रागावल्याने मधुमेह नियंत्रित होण्यापेक्षा कौटुंबिक तणाव मात्र निर्माण होतात.

आजकाल काळजीची बाब म्हणजे तरुण पिढीमध्ये मधुमेहाचे प्रमाण वाढत असून त्यांच्यात नैराश्य निर्माण होते.तसेच लैंगिक तणाव वाढून मधुमेह आणखी बळावू शकतो .म्हणूनचमधुमेहींनी आपल्या प्रकृतीची काळजी घेणे, वरचेवर डॉक्टरांना दाखवून तपासणी करणे महत्वाचे आहे. मधुमेहीनी काही पथ्ये पाळल्यास प्रकृती स्वस्थ्य राखणे सोपे होते. 

डायबिटीसबद्दल गैरसमज: मधुमेहाबद्दल जनसामान्यांच्या बऱ्याच चुकीच्या कल्पना, गैरसमज आहेत.
१)    डायबिटीस संसर्गजन्य आहे का?
    उत्तर- डायबिटीस संसर्गजन्य नाही. तो इन्डोक्राईन ग्रंथीचा विकार असून त्यामध्ये स्वादुपिंडातील बीटा पेशींच्या आत तयार होणारया  इन्सुलिनच्या प्रमाणात असंतुलन निर्माण होते. डायबिटीस हा प्रत्येक व्यक्तीत अनुवंशिकतेने होत नाही .जवळच्या नातलगांना डायबिटीस असला तर टाईप टू प्रकारचा डायबिटीस होण्याची दाट शक्यता असते.

२)    रक्तातील साखर कशाला तपासायची?
    उत्तर - घरात किंवा नात्यात कोणालाही डायबिटीस असल्यास वयाच्या ३५  नंतर वर्षातून किमान एकदा तरी रक्त तपासणी करायला हवी. कारण मधुमेहाची बाह्य लक्षणे दिसण्याच्या पुष्कळ आधी त्याने आपला प्रभाव दाखवणे सुरू केलेले असते. खालीलपैकी कोणतेही लक्षण आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन रक्तातील साखर तपासावी.
- खूप थकवा येणे.
- खूप तहान आणि भूक लागणे.
- खूप लघवी होणे.
- विनाकारण वजन कमी होणे.
- त्वचेची तक्रार,खाज सुटणे वगैरे.
- मूत्रमार्गाचे वरचेवर इन्फेक्शन होणे.
- गर्भधारणा झाल्यावर.
- कुठल्याही शस्त्रक्रियेच्या पूर्वी.

३)    इन्सुलिन घेतल्यास मधुमेही जास्ती गोड खाऊ  शकतात का?
    उत्तर -अजिबात नाही. सर्वात नैसर्गिक पद्धत म्हणजे आहार. मधुमेहींनी कमी आहार घेणे महत्त्वाचे नसून संतुलन असणे आवश्यक आहे.कधी आहार एकदम कमी केल्यास, तसेच उपास करणे, मधुमेहींसाठी फायद्यापेक्षा तोट्याचे ठरू शकते. म्हणून कोणताही पदार्थ एकदम वर्ज्य करण्यापेक्षा जास्त साखर असलेले केक,आईस्क्रीम,मिठाई मर्यादित प्रमाणात आहारात घेणे महत्त्वाचे आहे.शरीरातील  कॅलरीजचे संतुलन आवश्यक आहे.एकदा गोळ्या किंवा इन्सुलिन घेतले की कधी आणि काही खाऊ शकतो, हा गैरसमज आहे .

४)    मधुमेहाचे निदान केवळ लघवीतील साखर तपासून होऊ शकते ?
    उत्तर – मधुमेहाचे निदान केवळ लघवीतील साखर तपासून होऊ शकते,हा गैरसमज आहे. मधुमेह असल्यास रक्तातील साखर १६०  किंवा १८० मि.ग्रॅ.पेक्षा अधिक झाल्यास लघवीच्या तपासणीमध्ये साखर निघत नाही,हे सत्य आहे. पण थोडेसे पैसे वाचवण्याकरता रक्ताची तपासणी टाळून फक्त लघवीची रुग्ण तपासणी करतात .यामुळे त्यांच्या रक्तात आवश्यकतेपेक्षा जास्त साखर असली तरी लगेच लघवीत साखर येत नाही.त्यावरून आपल्या डायबिटीस नाही,असा गैरसमज ते करून घेतात.म्हणूनच मधुमेहाच्या साखरेचे प्रमाण आणि त्याचे योग्य निदान रक्ताची तपासणी केल्यानंतरच होऊ शकते.केवळ लघवीच्या तपासणी वरून  नव्हे !

५)    रक्तातील साखर तपासण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या ?
१)    तपासणीसाठी जाताना उगीचच औषधे न घेता जाऊ नये.रोजचाच नियमित आहार आणि डॉक्टरांनी ठरवून दिलेली औषधे घेऊनच तपासणीसाठी जावे.
२)    रक्त तपासणीच्या दिवशी जाण्यापूर्वी गोड किंवा भात खाऊन जाऊ नये.
३)    रक्ताबरोबर लघवीही तपासणीसाठी द्यावी.मात्र रात्रभर मूत्राशयात साठलेली पहिली लघवी न देता त्यानंतर झालेली पहिली लाघवी तपासणीसाठी द्यावी.आदल्या दिवशी लॅबोरेटरीतून लघवी तपासणीसाठी बाटली नेवून लघवी तपासणे चुकीचे आहे.कारण रात्रीच्या जेवणानंतर पहिल्या तीन ते चार तासातरक्तातील साखर वाढलेली असते.त्या काळात तयार होणाऱ्या लघवीतही साखर येते.उपाशी पोटी घेतलेले रक्त फक्त त्यावेळचे रक्तातील साखरेचे प्रमाण दाखवते.या तफावतीमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण अनेकदा नॉर्मल किंवा कमी आढळते.पण रात्रभर साठलेल्या लघवीत मात्र साखर आढळते. या दोन गोष्टीचा मेळ न बसल्याने पुढची उपचार पद्धती करणे अवघड व संभ्रमित करणारी ठरते.म्हणूनच तपासणीसाठी जाताना आपल्या दैनंदिन आहारात आणि औषधात बदल करू नये.

रिपोर्ट नेताना रिपोर्ट समजून घ्यावा. काही शंका असल्यास पॅथॉलॉजीच्या एम.डी. डॉक्टरांशी  संपर्क साधावा. पुन्हा वेगळ्या लॅबोरेटरीतून रक्त तपासून घेण्यात आपले  रक्तच नाही तर पैसा आणि अमूल्य वेळ वाया जातो. अलीकडे रक्तातील साखर तपासणीसाठी घरी रक्त तपासता येईल,असे सुटसुटीत ग्लूकोमीटर उपलब्ध आहे. ही पद्धत सोपी असली तरी त्यालाही मर्यादा असतातच. इलेक्ट्रॉनिक पद्धतीवर हे यंत्र आधारित असल्याने ग्लुकोमीटरवर संपूर्णपणे अवलंबून राहू नये .

ग्लायकॉसिलेटेड हिमोग्लोबिन टेस्ट-
रक्त, लघवीच्या विशिष्ट चाचणीवरून रुग्णाच्या त्या दिवसाचे साखरेचे प्रमाण पाहतो. परंतु ज्यांना जुना मधुमेह आहे त्यांचे तीन महिन्यातील साखरेचे प्रमाणाची योग्य तपासणी म्हणजे ग्लायकॉसिलेटेड हिमोग्लोबिन तपासणी. या तपासणीत सोयीच्या वेळी रक्त तपासणीसाठी देता येते.ही चाचणी खर्चिक असली तरी चार ते सहा महिन्यात एकदा करून घेणे हितावह असते.

मधुमेह झाल्यामुळे कालांतराने मूत्रपिंड निकामी होण्याची शक्यता असते. त्यामुळे लघवीतील मायक्रो अल्ब्युमिन्युरीयाची (micro -albuminuria) तपासणी केल्यास प्राथमिक अवस्थेतील मूत्रपिंड विकार शोधून काढता येतो आणि वेळीच योग्य उपचाराने पुढील हानी टाळता येते. तसेच नेत्र पटल आणि हृदयावर होणाऱ्या दुष्परिणामांची सुद्धा वेळोवेळी चाचणीद्वारे तपासणी होऊ शकते.म्हणूनच योग्य वेळी तज्ञांचा सल्ला घेतल्यास आरोग्य संपन्न राहणे शक्य आहे.

 

डॉ. राजेश इंगोले
एम.डी. कन्सल्टन्ट पॅथॉलॉजिस्ट