कवी नलेश पाटील (१९५४-२०१६)

खरं तर निसर्गाचं प्रेम व्यक्त करणाऱ्या असंख्य कवितांनी मराठी कवितेचं दालन समृद्ध आहेच पण नलेश पाटील यांच्या नजरेतून निसर्ग अतिशय निराळ्या पद्धतीने आणि आगळ्या शब्दांत आपल्याला दिसतो. मुख्य म्हणजे आशा आगळ्या वाटेवरची कविता असूनही तिनी सहजतेचा, सुगमतेचा रस्ता कधीच सोडला नाही. त्यांनी जे लिहिलं ते प्रत्येकाला सहज समजणारं आणि भावणारं आणि तरीही त्याला नलेश पाटील यांचा संस्कार आहे हे जाणवणारं होतं.

'घन आभळीचा तडकवा । मातीस मिळावा शिडकावा,
झाडांवरती पुन्हा नव्याने । रंग हिरवा फडकावा...

असं भन्नाट काहीतरी तेही इतक्या सहज साध्या शब्दांत ते लिहून जातात.त्यांच्या कवितांतून ग्रामजीवनातले कित्येक संदर्भ मिळतात. मला नेहमी असं वाटतं की त्यांच्या कवितांमधून निसर्गाच्या अस्सल रंगांची मुक्त उधळण होते.

जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्स मधून शिक्षण घेतलेले नलेश पाटील हे उत्तम चित्रकारही होते, आणि म्हणूनच की काय

हिरव्या गार गवताला । सूर्याने आपले अंग घासले
पिवळे पिवळे ऊन फासले । तुम्हाला उगाचच ते वाळलेले भासले

असं काही अनपेक्षित, रंगीत त्यांच्या कवितांमध्ये सापडतं. 'सकारात्मकता' हा सुद्धा त्यांच्या कवितांमधला एक विशेष पैलू. त्यांची दुष्काळावरची कवितासुद्धा कधी निराशाजनक वाटत नाही. जे रंग सर्वसामान्याना जाणवणारही नाहीत ते त्यांच्या रसिकतेच्या कक्षेत आणण्याचं श्रेय नलेश पाटलांना द्यावं लागेल. सौंदर्याने ओथंबलेली, सहज स्फुरलेली आणि स्वाभाविक उमटलेली अशी ऋग्वेदातली ऋचा आणि त्यातलं निसर्गादेवतेचं स्तवन आणि नलेश पाटलांची निसर्गाकविता यांच्यात एक आंतरीक धागा जुळलाय अशी शंका कायम येत राहते आणि या सहजतेमुळेच त्यांची कविता कधी समजावून द्यावी किंवा घ्यावी लागत नाही,ती अगदी सहज ओठांवर येते.रानातल्या रानफुलांनी बहरलेल्या वाटेवरून एखादी लहानशी सोनूली बागडत निघवी तशी त्यांची कविता आपल्या मनाच्या वाटेवरून हलक्या पावलांनी रेंगाळत जाते. निसर्ग हे तिचं प्राणतत्व आहे. तिचं स्वतःचं सौंदर्य आहे,लय आहे, छंद आहे .कविता संपली तरी त्यांच्या कवितेतलं हिरव्या कुपीतलं अत्तर आपलं मन सुगंधीत करून जातं.

कविता


    पाऊस आला गं आला गं । पाऊस आला गं आला गं
    ऋतु हिरवा मोर झाला गं । 
    किती दिसांनी कंठ ओला झाला गं झाला गं

    फुल मातीचे फुलले । पाणी झऱ्याचे बोलले
    किती दिसांनी तलाव निळा झाला गं झाला गं

    टिम्ब पाण्याचे झेलीत । पान फुटले वेलीत
    किती दिसांनी ओढा मंजूळ झाला गं झाला गं
    
    ढग मातीत मिसळे । पाणी सूर्याला विसळे
    किती दिसांनी धनुष्य रंगीत झाला गं झाला गं

    थेंब घुंगरू घुंगरू । पान डमरू डमरू
    किती दिसांनी तरु तुंबरू झाला गं झाला गं

    बंध लाटांचे तुटले । पंख पाण्याला फुटले
    किती दिसांनी समुद्र पक्षी झाला गं झाला गं

    झगा वाऱ्याचा ढगळ । झुले नदीचा ओघळ
    किती दिसांनी डोंगर खुळा झाला गं झाला गं

    पाऊस आला गं आला गं
    ऋतू हिरवा मोर झाला गं