अवकाळी आलेले तारुण्य

गेल्या अनेक वर्षापासून समुपदेशन क्षेत्रामध्ये काम करत असल्या मुळे अनेक प्रकारच्या केसेस पाहायला मिळतात, त्यापैकीच एका केस मुळे सध्याच्या काळात प्रकर्षाने जाणवलेली एक समस्या पुढे आली त्याबाबत सर्वसाधारण माहिती असणं गरजेच आहे जेणे करून पालकांना त्यांच्या पाल्यात ती समस्या जाणवली तर उत्तम प्रकारे हाताळता येईल. ती समस्या म्हणजे वेळेच्या आधी आलेली यौवनावस्था म्हणजेच Precocious puberty, यामधे बालवयातच मुलांमध्ये तारुण्याची लक्षणें दिसायला लागतात.

ही समस्या उद्भवण्याची अनेक कारणे असून अशा अवेळी झालेल्या शारीरिक व मानसिक बदलांमुळे मुलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. म्हणूनच हि समस्या काय व ती समंजसपणे कशी हाताळावी हे समजून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.

अवकाळी तारुण्य म्हणजे काय?
    ज्याला early / Precocious pubarty असेही म्हटले जाते,. सामान्यतः 8 ते 13 वयोगटातील मुलींमध्ये आणि 9 ते११ वयोगटातील मुलांमध्ये तारुण्याचे बदल दिसू लागतात.
    ज्या मुली वयाच्या 8 व्या वर्षापूर्वी आणि जी मुले वयाच्या 9 व्या वर्षापूर्वी तारुण्याची लक्षणे दर्शवतात त्यांना हि समस्या आहे असे मानले जाते.अंदाजे 5,000 पैकी 1 मुलांवर याचा परिणाम होतो.
    अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, पौगंडवस्थेत होणारे बदल आता पूर्वी पेक्षा लवकर होत आहेत. मुलींची पहिली मासिक पाळी येण्याचे सरासरी वय अंदाजे सारखेच असले तरी प्रारंभिक चिन्हे - जसे स्तनाचा विकास - मागच्या दशकांच्या तुलनेत लवकर होत आहे.

अकाली यौवनाचे दोन प्रकार आहेत:
सेंट्रल प्रिकॉशियस प्युबर्टी:
यामध्ये होणारे बदल सामान्य यौवन सारखेच असतात परंतु ते अपेक्षेपेक्षा लवकर दिसून येतात, पिट्यूटरी ग्रंथी गोनाडोट्रोपिन नावाचे संप्रेरक तयार करण्यास सुरवात करते. या संप्रेरकांमुळे अंडकोष किंवा अंडाशय इतर हार्मोन्स तयार करतात. टेस्टोस्टेरॉन किंवा इस्ट्रोजेन, या लैंगिक संप्रेरकांमुळे मुलींमध्ये स्तनाची वाढ मुलांमध्ये testis म्हणजेच अंडकोषाचा आकार वाढणे ई.तारुण्यकाळातील बदल होतात.

पेरिफेरल प्रिकॉशियस प्युबर्टी:
याला प्रिकॉशियस स्यूडोप्युबर्टी असेही म्हणतात. यात इस्ट्रोजेन आणि टेस्टोस्टेरॉन हे संप्रेरक लक्षणे ट्रिगर करतात. परंतु मेंदू आणि पिट्यूटरी ग्रंथी यात गुंतलेली नसतात ही सहसा अंडाशय, अंडकोष किंवा अधिवृक्क ग्रंथीं (adrenal glands) यांच्या अजाराशी संबंधित समस्या असते.

अकाली यौवनाची कारणे

१.    ट्यूमर आणि इतर गाठ, मेंदूला झालेली दुखापत (शस्त्रक्रियेमुळे किंवा डोक्याला मार लागल्याने), ज्यामुळे हार्मोनल संतुलनावर परिणाम होतो,अनुवांशिक परिस्थिती, हायपोथायरॉईडिस्म अधिवृक्क ग्रंथी, अंडाशय किंवा वृषणात ट्यूमर,इस्ट्रोजेन किंवा टेस्टोस्टेरॉन असलेल्या उत्पादनांचे अतिरेकी सेवन.
२.    लिंग- मुलांपेक्षा मुलींमध्ये सेंट्रल प्रिकॉशियस प्युबर्टी होण्याची शक्यता 10 पट जास्त असते.
३.    जेनेटिक्स-एखाद्या अनुवांशिक समस्येमुळे उद्भवल्यास, मुलाचे पालक किंवा भावंड देखील या समस्येने प्रभावित असू शकतात.
४.    लठ्ठपणा- अनेक अभ्यासांनी तरुण मुला-मुलींमधील लठ्ठपणा आणि अकाली यौवनाचा वाढता धोका यांच्यातील संबंध दर्शविला आहे.

प्रिकोशियस प्यूबर्टीची लक्षणे:
मुली - स्तनाचा आकार वाढणे, वजनात वाढ, उंची वाढणे, मासिक पाळी लवकर येणे ई.
मुले - चेहऱ्यावर केस दिसू लागतात , लिंग आणि अंडकोष वाढू लागतात आवाजात बदल उत्स्फूर्त इरेक्शन किंवा स्खलन असू शकते.
मुली आणि मुले - वेगवान उंची वाढ, चेहऱ्यावर, पाठीवर मुरमाचे फोड (पिंपल्स) येणे. प्रौढांसारखा शरीराचा गंधअंडरआर्म आणि जननेद्रियांच्या आजूबाजूला केस यायला सुरुवात होते.

वरील लक्षणे केवळ शारीरिक बदल दर्शवतात,पण त्या मानाने मानसिक व भावनिक बदल होत नाहीत,या सगळ्यांचा अर्थ कळण्याएव्हडी परिपक्वता त्यांच्यात नसते,त्यामुळे या अचानक आलेल्या परिस्थिशी जुळवून घेणे खूप आव्हानात्मक ठरते, याबरोबरच अभ्यासाचा ताणही असतोच.लहान वयात मुलीचे स्तन वाढू लागतात हे काही मुलींना नकारात्मक पणे प्रभावित करु शकते,इतरांपेक्षा आपण वेगळे आहोत का ? हे फक्त माझ्याच बाबतीत का घडलं?असे एक ना अनेक प्रश्न त्यांच्या मनात उपस्थित होतात.मुलांबरोबर पालकही यामुळे गोंधळून जाऊ शकतात,अशा वेळी या आजाराचे वेळेत योग्य निदान होणे आवश्यक असते.

प्रिकॉशियस प्युबर्टी चे निदान
१.    शारीरिक तपासणी
२.    संप्रेरक पातळी तपासण्यासाठी रक्त तपासणी
३.    हाडांचे वय( bone age) पाहण्यासाठी त्यांच्या हाताचा आणि मनगटाचा एक्स-रे; वरील तपासणीत प्रिकॉशियस प्युबर्टी आहे असे दिसत असेल तर काही चाचण्या त्यामागील कारण शोधण्यासाठी केल्या जातात.
१.    गोनाडोट्रॉपिन-रिलीझिंग हार्मोन (GnRH) उत्तेजित चाचणी: डॉक्टर तुमच्या मुलाला या संप्रेरकांचा एक शॉट देतात, नंतर त्यांच्या संप्रेरक प्रतिसादाची तपासणी करण्यासाठी काही कालावधीत रक्ताचे नमुने घेतात. जर इतर हार्मोन्स वाढले तर ते सेंट्रल प्रिकॉशियस प्युबर्टीचे लक्षण आहे. इतर संप्रेरकांची पातळी सारखीच राहिल्यास, हे पेरिफेरल प्रिकॉशियस प्युबर्टीचे चे लक्षण आहे.
२.    मेंदूच्या समस्या शोधण्यासाठी एमआरआय
३.    थायरॉईड फंक्शन टेस्ट

वरील टेस्ट नंतर कारण स्पष्ट झाले की पुढे काय करायचे हे डॉक्टर ठरवतात, त्यानुसार इंडोक्रायनोलॉजिस्ट, सर्जन, न्युरोलॉजिस्ट,न्युरोसर्जन, साईकोलोजिस्ट ई.चा सल्ला घेतला जातो. बऱ्याच प्रकरणांमध्ये, जर कारण स्पष्ट नसेल तर ते तुमच्या मुलाला काही महिने पाहण्याचा (observation) सल्ला देऊ शकतात.

उपचार
१.    GnRH ॲनालॉग थेरपी. जर तुमच्या मुलाला सेंट्रल प्रिकॉशियस प्युबर्टी असेल आणि इतर कोणतीही परिस्थिती नसेल, तर डॉक्टर GnRH ॲनालॉग थेरपी सुचवू शकतात. हे एक औषध आहे जे तुमच्या मुलाला महिन्यातून एकदा इंजेक्शन मार्गे मिळते, ते सामान्य किशोरवयात येईपर्यंत लैंगिक विकास थांबवते.
२.    हिस्ट्रेलिन इम्प्लांट हे रोपण करण्यासाठी तुमच्या रुग्नाला किरकोळ शस्त्रक्रिया करावी लागेल. डॉक्टर ते implant त्यांच्या वरच्या हाताच्या आतील भागाच्या त्वचेखाली ठेवतात. यामुळे लैंगिक विकासास विलंब होतो.हे implant एक वर्ष टिकते.

अवकाळी यौवनमुळे होणाऱ्या गुंतागुंतीच्या अवस्था
मुलांसाठी शारीरिक आणि भावनिक समस्या निर्माण करू शकते.त्यात पुढील बाबीचा समाविष्ट होतो :
१.    कमी उंची- अवकाळी यौवन असलेली मुले बहुतेक वेळा त्यांच्या वयानुसार उंच असतात, परंतु संप्रेरकांच्या होणाऱ्या बदलांमुळे bone maturity लवकर येते व उंची अपेक्षेप्रमाणे वाढत नाही.
२.    वर्तन समस्या अवकाळी यौवन आणि वर्तन समस्या यांच्यात संबंध असल्याची काही निरिक्षणे दर्शवतात, सामान्यपणे यौवन हा सर्वांसाठीच गोंधळात टाकणारा काळ असू शकतो. 
    लवकर यौवन असलेल्या लहान मुलांसाठी तर हे सर्व अधिक तणावपूर्ण असू शकते.यातूनच चिडचिड, नैराश्य, उदासीनता, हट्टीपणा, हेकेखोरपणा, अभ्यासाकडे दुर्लक्ष ई.समस्या दिसून येतात.
    तुमचे मूल भावनिकदृष्ट्या संघर्ष करत असल्याची चिन्हे दिसू शकतात जसे की त्यांच्या शाळेच्या ग्रेड मध्ये घसरण, शाळेतील इतर समस्या,ज्या गोष्टींचा ते सहसा आनंद घेतात त्यात रस कमी होणे, एकाकीपणा वाढणे ई.

पालकांसाठी टिपा
    पालक म्हणून,प्रिकॉशियस प्युबर्टीबद्दल काळजी वाटणे साहजिक आहे. आपण लवकर तारुण्यासारखी वाटणारी लक्षणे गांभीर्याने घ्यावी यासाठी पुढील बाबी लक्षात ठेवाव्या लवकरात लवकर वैद्यकीय सल्ला घ्यावा व निदान करून घ्यावेजेव्हा उपचार आवश्यक असते तेव्हा ते पूर्णपणे समजून सकारात्मकतेने करून घ्यावेत. मुलांशी संवाद साधा. व त्यांच्या शरीरात काय चालले आहे ते त्यांना सोप्या भाषेत स्पष्ट करा.त्यांना त्यांच्या भावनांबद्दल मोकळेपणाने बोलण्यास प्रोत्साहित करा.त्यांच्या वयानुसार त्यांना योग्य वागणूक द्या.छेडछाड करनाण्याकडे लक्ष द्या.त्यांच्यात कुठलाही न्यूनगंड निर्माण होणार नाही असे पाहा.त्यांचा स्वाभिमान वाढवण्यासाठी जे काही करता येईल ते करा. दिसण्यापेक्षा ग्रेड किंवा क्रियाकलापांवर प्रशंसा करा. ते करत असलेल्या कामाचे खुल्या मनानं कौतुक करा, शरीर बद्दल हीन भाव निर्माण होऊ देऊ नका.समुपदेशन किंवा समर्थन गट( तुमच्या सारख्याच समस्येला सामोरे जात असणारा गट) देखील तुम्हाला मदत करू शकतात. याला उपचारांची किंवा समुपदेशनाची तशी खूप आवश्यकता असतेच असे नाही, परंतु तरीही तुम्ही तुमच्या मुलाला डॉक्टरांकडे घेऊन जावे,जेणे करून त्याला तुम्हाला योग्य मार्गदर्शन करता येईल. प्रिकॉशियस प्युबर्टीची चिन्हे असलेली बहुतेक मुले योग्य उपचार व मार्गदर्शनाने वैद्यकीयदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या स्थिर होऊन एक आनंदी आयुष्य जगू शकतात.

 

वनिता राऊत
मानस शास्त्रज्ञ