मात्राशी सर्वकालं स्यान्मात्रा ह्यग्नेः प्रवर्तिका । मात्रां द्रव्याण्यपेक्षन्ते गुरुण्यपि लघून्यपि । । १ ॥
गुरुणामर्धसौहित्यं लघूनां नातितृप्तता । मात्राप्रमाणं निर्दिष्टं सुखं यावद्विजीर्यति ।। २।
“व्यक्ती तितक्या प्रकृती’ ही मराठी भाषेत असलेली म्हण आयुर्वेदातून आली आहे असे म्हणण्यास काही हरकत नाही. व्यवहारात आपल्याला अनेक प्रकारची माणसं पाहायला मिळतात. कुणाचे जेवण हे अर्ध्या पोळीने, भाकरीने होते कुणाला तीन-चार पोळ्या, भाकरी सहज पचतात. परंतु पचते म्हणजे नेमके काय हे देखील आपण बारकाव्याने समजून घेतले पाहिजे.
सेवन केलेल्या अन्नाने आपला उत्साह वृद्धिंगत झाला आहे का? स्वच्छ अशी ढेकर येते की अन्नाचा अर्धवट वास असणारी अशी येते, मल-मूत्र-स्वेद यांचे प्रवर्तन विनासायास होते की थांबून व कष्टाने होते. अंगाला हलकेपणा वाटतो का? तहान आणि भूक जाणवते का? अशा बारकाव्यातून अन्न सेवनाची व्यक्तीस सापेक्ष मात्रा म्हणजे प्रमाण ठरते. हे प्रमाण त्या त्या व्यक्तीसाठी अचूक असेल तरच त्याने जठराग्नी प्रदीप्त होतो. आहाराची मात्रा ही सेवन केल्याजाणाऱ्या पदार्थांच्या स्वभावावर म्हणजेच गुरुत्व-लघुत्व त्यानुसार ठरली पाहिजे. उदाहरण द्यायचे झाले तर द्रव पदार्थ जसे लिंबू सरबत हे एक माणूस एक ग्लास या प्रमाणात सहज पिऊ शकतो. परंतु जर तोच द्रव पदार्थ बासुंदी हा असेल तर त्याचे प्रमाण फार तर एक किंवा दोन वाटी असू शकते. जर बासुंदी सारखे स्वभावाने जड किंवा गुरुत्व पदार्थ अत्याधिक मात्रेत सेवन केले तर शरीरावर निश्चितच त्याचे अनाठाई परिणाम दिसून येतात. म्हणून पचायला जड असणारे पदार्थ हे जितके अभ्यवहरण आपण करू शकतो. म्हणजे एका वेळी जेवढे अन्नग्रहण करू शकतो त्याच्या अर्ध्या मात्रेत खाणे हे श्रेयसकर...! भाजके धान्य जसे साळीच्या लाह्या, राजगिऱ्या लाह्या हे पचायला हलके असणारे पदार्थ पोटभर खावे जेणेकरून त्याची तृप्तता जाणवेल परंतु ते शरीराला अपाय मात्र करणार नाहीत.
ज्याला हे प्रमाणाचे संतुलन साधले, तो सुखी आयुष्याचे गमक उमजून स्वास्थ्य संपन्न होईल हे निःसंशय.
- वैद्य सोनिया मुळे-काळे