कोणताही आजार झाला आणि त्याने गंभीर स्वरूप धारण केले की वैद्यकीय चाचणी करणे खूप महत्त्वाचे असते त्यामुळे आजाराचे स्वरूप आणि तीव्रता यांचे निदान करणे सोपे होते. पुढील उपचार करताना तज्ञ डॉक्टरांना औषधोपचाराची दिशा ठरवता येते. जाणून घेऊया वैद्यकीय चाचण्या.
अगदी सुरुवातीच्या काळात वैद्य किंवा हकीम रुग्णाच्या नाडी परीक्षणावरून आणि चेहऱ्याचे निरीक्षण करूनच कुठला आजार झाला असावा, याचा अंदाज घेत असत. मात्र विज्ञान क्षेत्रात प्रगती झाली आणि गेल्या दोन-तीन दशकात मात्र अशा प्रकारे उपचार करणे हे कालबाह्य झाले आहे. त्याला अनेक कारणे देखील आहेत.
१ - तंत्रज्ञान प्रगतीमुळे अनेक नवीन नवीन आजार आणि व्याधींचा देखील शोध लागला.
२ - वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी रुग्णांमध्ये एकाच प्रकारची आणि एकसारखे लक्षणे दाखवू शकतात. उदाहरणार्थ निमोनियाने होणारा खोकला आणि टीबीमुळे होणारा खोकला . प्रारंभीच्या काळात हा एक सारखाच वाटतो. मलेरियाचा ताप आणि मुत्र संस्थेच्या जंतुसंसर्गामुळे येणाऱ्या तापात दोन्हींमध्ये रुग्णाला थंडी भरून ताप येतो. त्यामुळे खोकला नक्की कशामुळे झाला आणि ताप येणे मागचे नक्की कारण काय? हे समजल्यानंतरच योग्य उपचार ठरविता येतात.
३ - आज निदान शास्त्राच्या प्रगतीमुळे अनेक प्रकारच्या व्याधी डॉक्टरांच्या लक्षात येऊ लागल्या आहेत .अनेक औषधी त्यावर उपलब्ध आहेत . प्रत्येक व्याधी, आजाराचे कारण वेगवेगळे असल्यामुळे त्या प्रत्येकावर उपलब्ध असलेल्या उपचारांमध्ये विविधता देखील आहे. रुग्णाला नक्की कोणता आजार झाला आहे, ते कळल्याशिवाय औषधांची अचूक निवड करणे डॉक्टरांना शक्य नाही.
४ - चुकीचे औषधोपचार झाल्यास मुळ रोग बरा होण्याऐवजी जास्त वाढीस लागू शकतो. शिवाय चुकीच्या औषधांमुळे रुग्णाच्या दुसऱ्या अवयवांवर वाईट परिणाम होऊ लागतात. त्याला वैद्यकीय भाषेमध्ये साइड इफेक्ट असे म्हणतात.
वरील सर्व बाबी लक्षात घेतल्यास निदाना करता विविध चाचण्या किती आवश्यक आहेत, हे मनाला पटल्या वाचून राहत नाही. या चाचणी केव्हा आणि कुठे करायच्या? हा विचार मनात येतोच. एखादा आजार म्हटला की डॉक्टर नाना प्रकारच्या चाचण्या करतात. उदा. प्रथम छातीत दुखायला लागले की हा हार्ट अटॅक तर नाही ना ? याची खात्री करून घेणे आवश्यक असते. यासाठी इसीजी काढून बरोबर रक्तातील काही चाचण्या देखील केल्या जातात आणि त्यावरून नेमकं निदान करता येतं .कधी एक्स-रे काढावा लागतो तर मधुमेहासारख्या व्याधी रक्ताची तपासणी देखील करून लगेच कळतात.
अनेक वेळा रक्तातील हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे रुग्णाला तातडीने रक्त देण्याची गरज असते किंवा एखाद्या व्यक्तीला अपघात झाल्यास बराच रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याच्या प्राणाला धोकाही खूप होऊ शकतो. अशा वेळी त्याला तातडीने रक्त देण्यासाठी आधी रुग्णाचा ब्लड ग्रुप तपासणी गरजेचे असते. गर्भवती स्त्रीच्या बाळाच्या योग्य वाढीसाठी आईच्या रक्तातील अनेक घटकांची पातळी मोजणे महत्त्वाचे असते. अनेक स्त्रियांना मासिक पाळीचा त्रास होत असल्यामुळे शरीरातील विविध ग्रंथींचा, विजांड ग्रंथीचा स्त्राव योग्य प्रमाणात होत आहे किंवा नाही, हे बघण्यासाठी शरीरातील विविध संप्रेरके तपासून बघता येतात. रक्ताप्रमाणे थुंकी, मल, मूत्र, वीर्य अशा अनेक शारीरिक द्रव्यांची तपासणी करून अचूक निदान करणे आता शक्य झाले आहे.
काही वेळा एक्स-रे, सोनोग्राफी, डॉपलर या यंत्रांच्या सहायाने शरीराच्या आतील भागांचे चित्र आपण बघू शकतो आणि त्यामध्ये काही बदल झाला आहे काय? हे पडताळून बघू शकतो. तात्पर्य हेच की, योग्य निदानासाठी आवश्यक त्या चाचण्या करून घेणे ही आजच्या काळाची गरज बनलेली आहे. अनेक रुग्ण आपले थोडेसे पैसे वाचविण्याकरिता चाचण्या करण्याची टाळतात. जुजबी, थातूरमातून उपचार घेणे पसंत करतात आणि स्वतःचे आरोग्य हरवून बसतात ! अनेकदा रुग्ण प्रश्न करतात ....
प्रश्न - सगळ्या चाचण्या एकदम करण्याची गरज असते का?
रुग्णांनी याचे उत्तर स्वतः न शोधता आपल्या डॉक्टरांवर विश्वास टाकावा. प्रत्येक आजाराची लक्षणे आणि रोगांमध्ये दिसणारी चिन्हे लक्षात घेऊनच डॉक्टर काही चाचणी ठरवितात .चाचणी या सामान्य किंवा प्राथमिक स्वरूपाच्या आणि काही खास चाचण्या असतात. प्राथमिक स्वरूपाच्या चाचणीतून काही बोध झाल्यानंतर खास चाचण्यांकडे डॉक्टरांचे लक्ष जाते. त्यामुळे अशा चाचण्या करावयास सांगितलेले असताना त्या करून घेण्याचे टाळण्यापेक्षा योग्य वेळी आणि डॉक्टरांशी स्पष्ट बोलून विचारपूस करून वेळीच केल्यास फार मोठा अनर्थ टाळायला नक्कीच मदत होते आणि रुग्णाचे आरोग्य आटोक्यात ठेवता येते. अशा प्रकारच्या चाचण्यांबद्दल माहिती मिळवून घेण्यासाठी हवे तर आपल्या फॅमिली डॉक्टरची देखील मदत घ्यावी. अनेक चांगले पुस्तके आणि लेख देखील आजकाल उपलब्ध असतात. त्यातून प्राथमिक माहिती मिळू शकेल. (ते वाचताना मात्र शंभर टक्के विश्वास ठेवू नये. कारण तो लेख किती तज्ञ डॉक्टरांनी लिहिलेला आहे हेही महत्त्वाचे असते.)
प्रश्न - अशा चाचण्या कुठे होतात आणि कुठे कराव्यात ?
वैद्यकीय क्षेत्रातही काही प्रमाणात अनेक ठिकाणी भोंदूगिरी आपल्याला अनुभवाला येते. म्हणूनच डॉक्टर निवडताना त्यांची डिग्री आणि त्यांचा अनुभव या दोन्हींचा विचार करूनच त्याच्यापर्यंत जावे. भाजी मार्केटमध्ये भाव करतो त्याप्रमाणे विचार न करता तज्ञ डॉक्टरकडे जावे आणि चाचण्या करणारे डॉक्टरही तज्ञच असावा, हा आग्रह ठेवावा. कारण चाचणीच्या निष्कर्षावर अवलंबूनच डॉक्टर औषधोपचार करणार असतात .त्यामुळे चाचणी अयोग्य रीतीने केल्यास योग्य निष्कर्ष कुठून होणार ?
प्रत्येक चाचणी कशासाठी करणे गरजेचे आहे, हे जाणून घेण्याचा रुग्णाचा देखील मानवी हक्क आहे. त्यामुळे सविस्तर चर्चा रुग्णांनी किंवा त्याच्या आप्तांनी करणे टाळू नये . चाचणी करणारे तज्ञ हे एम.डी. डिग्री घेतलेले पॅथॉलॉजिस्ट किंवा रेडिओलॉजीस्ट असतात. आपल्या चाचणी बद्दल त्यांच्याशी संपर्क साधून चाचण्यांच्या निष्कर्षावर देखील चर्चा करावी.
आपले आरोग्य आणि व्याधीचा पूर्णपणे अंदाज घेणे आणि सृजनशीलतेने डॉक्टरी सल्ल्याप्रमाणे वागून औषध उपचार घेणे हे आपले कर्तव्य आहे .... ज्याला हे समजलं तो निश्चितपणे ठणठणीत होणार, निरामय होणार, हे नक्की. म्हणूनच वेळीच वैद्यकीय तपासण्या करा आणि स्वतःचे आरोग्य निरामय राखण्यासाठी स्वतःलाच मदत करा.
- डॉ. राजेश इंगोले
वैद्यकीय अधिक्षक