न्यूरोसायकियाट्रिस्ट डायरी

दैनंदिन जीवनात ताण, तणाव, नकोशा गोष्टी वाट्याला येणे, या गोष्टीला कमी जास्त प्रमाणात सगळ्यांना तोंड द्यावे लागते.  मात्र ते सहन करण्याची प्रत्येकाची क्षमता वेगळी असते. मात्र काही वेळा रुग्णाची मानसिक आंदोलने तीव्र झाली की डीसोसिएटव्ह ऍम्नेसियामध्ये अचानक  स्मरणशक्ती  कमी होते. त्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यावर आपल्याला हे सहज लक्षात येते. कधी तर अशी परिस्थिती उद्भवते की त्या व्यक्तीला वैयक्तिक माहिती, घर किंवा नाव देखील आठवत नाही. अशा वेळी मानसोपचार आणि औषधोपचार या सर्वच गोष्टी गरजेच्या असतात. हा त्रास काही तास, दिवस किंवा महिने, वर्षे सुरु असतो.

एक २७  वर्षांची महिला हॉस्पिटलमध्ये आली. ती अचानक बेशुद्ध झाल्याने तिच्यावर सुमारे अर्धा तास उपचार चालले. पण त्या दरम्यान ती तोंडी विचारलेले प्रश्न किंवा इतर गोष्टीना प्रतिसाद देत नव्हती. रुग्णालयात दाखल केल्यानंतर आणि प्राथमिक उपचार सुरू केल्यानंतर तिला शुद्ध आली. तिची रक्त तपासणी, ईसीजी, ईईजी, इमेजिंग केली गेली. त्यानंतर मात्र सुदैवाने ती दुसऱ्या दिवशी सामान्य झाली.

 तिचा आजार सामान्य वाटत नसल्याने डॉक्टरांनी शारिरीक आजाराची शक्यता नाकारली. तपासणीनुसार ती केस माझ्याकडे पाठवण्यात आली. महिला रूग्णासोबत असलेल्या आईला या विषयी प्रश्न केले तेव्हा तिने सांगितले की तिचे पतीशी फोनवर भांडण झाले होते. तिला दवाखान्यात आणले, भरती केले, त्या दिवशी सुमारे 3 तास आधी तिचा पतीसोबत फोन वर वाद झाला होता. गेली ७ वर्षे ती पतीसोबत एकत्र राहत होती, मात्र गेले १ वर्षे वेगळी, स्वतंत्र राहत होती.

यथावकाश बोलल्यावर तीला काय त्रास झाला, ती रुग्णालयात कशी आली हे तिला काहीही आठवत नाही... तिने सांगितले की ती १७ वर्षांची आहे, महाविद्यालयात शिकते आहे आणि आई-वडिल, भावासोबत राहते आहे. मधला काही वर्षांचा काळ तिच्या स्मृतीतून पुसला गेला होता, विसरला गेला होता. भाऊ, लग्न, नवरा आणि मुलाबद्दल विचारल्यावर तिने लग्न झाले किंवा मुलगा झाला हेच नाकारले. ते दोघेही तिला हॉस्पिटलमध्ये भेटायला आले तेव्हाही तिने त्यांना ओळखले नाही. नवऱ्याने तिला उभे राहण्यास मदत करण्याचा प्रयत्न करत असता विरोध केला आणि त्याला दूर  केले. तीच्या प्रकृतीच्या इतर कोणत्याही तक्रारी नाहीत. पुन्हा बेशुद्धही झाली नाही. 

तिला तात्पुरता स्मृतीभ्रंश झाला होता. तिच्या स्मृतीभ्रंशासाठी नियमितपणे पाठपुरावा करण्याचे ठरले आणि रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. तिच्या कुटुंबातील सदस्यांना मी खात्री दिली की ती हळूहळू सुधारेल. पुनरपासणीसाठी आल्यावर लक्षात आले की, तिची आरोग्यविषयक कोणतीही तक्रार नाही, दैनंदिन कामे ती नीट,  काळजीपूर्वक करीत होती आणि तिच्या आईला घरगुती कामात मदत करत होती. तिच्या मुलाची काळजी तिच्या पालकांनी घेतली. तिच्या आईच्या म्हणण्यानुसार ती घरी खूप कमी बोलते पण कोणतीही तक्रार करत नाही. मानसिक

 तणावासाठी तिच्यावर औषधोपचार चालू ठेवला गेला आणि दर आठवड्याला थेरपी सत्र चालू ठेवले गेले. हळुहळू २-३ सत्रातच मुलाच्या संगोपनात रस घेतला आणि कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधताना सहभागी होण्यास सुरुवात केली. सतत सत्र सुरु होतेच. ती उपचारांनासकारात्मक प्रतिसाद देऊ लागली. मागील १ वर्षातील तिच्या स्मृति आठवण्यास, व ते धागे जुळवण्यास सुरुवात केली. मात्र तिला ताण येईल, त्रास होईल, असे न करण्याची खबरदारी घ्या, असे मी आप्तांना सांगितले. त्यांनी यासाठी सहकार्य करण्यास संमती दिली. पुढच्या काही सत्रांमध्ये हळू हळू तिला सगळेकाही पूर्ववत आठवेल, सगळे सुरळीत होईल, असे मी त्यांना आश्वासन दिले, धीर दिला.

सुमारे 2-3 महिने सेशन्स झाली.  या नंतर तिची जवळजवळ १०० % स्मरणशक्ती परत आली  आहे.... सध्या कमीतकमी औषधोपचार सुरु आहेत. हे जोडपे आता वैवाहिक समुपदेशन घेत आहे.

 

डॉ. अक्षय चांदुरकर,
 मानसोपचार तज्ञ, 
डॉ. हेडगेवार हॉस्पिटल, अमरावती.