शेवगा (ड्रमस्टिक) म्हणजे पौष्टिक कॅप्सुलच !

डॉ. हेडगेवार हॉस्पिटलमध्ये हेल्दी  संडे उपक्रमांतर्गत  मी “ हेल्दी फुड “ म्हणून रेसिपीसाठी सर्वप्रथम निवडला तो शेवगा. सहज अंगणात दिसणारा हा शेवगा(drumsticks) म्हणजेच मोरिंगा. त्याचे पान, खोड, बिया, शेंगा, पाने, फुले बहुगुणी आहेत. आहारतज्ञ म्हणून मी त्याचा विचार करते तेव्हा त्याचे अनेक उपयोग आठवतात,औषधा इतकेच तो औषधी गुणधर्म असलेला आहे. शेवगा (ड्रमस्टिक) म्हणजे पौष्टिक कॅप्सुलच होय !म्हणूनच अंगणाची शोभा वाढविणारा हा शेवगा वृक्ष मी लेखासाठी निवडला.

एखादा टपोरा गुलाब आपली नजर खिळवून ठेवतो तसे शेवग्याच्या झाडाला लटकलेल्या हिरव्यागार लांब शेंगा व त्याची गुणी पाने माझी नजर खिळवून ठेवतात. भारतीय आहारात शेवग्याच्या शेंगेचं स्वतःचं स्थान आहे. शेवगा आहारात अगदी रोज वापरला तरी हरकत नाही कारण त्याचे औषधी गुणधर्म !

शेवग्याच्या शेंगेला "वंडर स्टीक' तर झाडाला "ट्री फॉर लाईफ' म्हटले जाते. कारण शेवग्याच्या शेंगा व या झाडाची पाने हे पौष्टीकतेत अतिशय समृद्ध पातळीवर आहेत.

मी असे का म्हणते ते सोदाहरण सांगते. शेवग्याच्या शेंगांमध्ये आयर्न, पोटॅशियम, कॅल्शियम, सोडीअम, डायटरी फायबर, व्हीटँमिन सी आहेच व त्याच्या पानांमध्ये बीटाकेरोटीन, प्रोटीन, डायटरी फायबर, विटॅमिन सी, कॅल्शियम, आयर्न ही पोषण तत्वे आहेत. या पानांत म्हणूनच शेवग्यास "पॉवर हाउस ऑफ मिनरल्स' म्हटले जाते.  निसर्ग उपचारात शेवग्याचे फार मोठे महत्व आहे. त्यापासून संत्र्याच्या सातपटीने अधिक विटॅमिन सी, गाजराच्या चार पटीने अधिक विटॅमिन ए,केळीच्या तिप्पट पोटॅशियम, दह्याच्या दुप्पट प्रोटीन, पालकाच्या दुप्पट आयर्न,कितीतरी डायटरी फायबर व झिरो कॉलेस्टेर मिळते ही यादी खूप मोठी आहे.

शेवग्याची शेंग ही गर्भवती महिला आणि वाढीला लागलेल्या मुलांसाठी उत्तम भाजी आहे ! ती रक्‍त शुद्ध करणारी आहे तसेच ज्यांना कफाचा त्रास आहे (दमा, जुनाट खोकला) अशांनी शेवगा नियमित खावा. यकृत व प्लीहाचे आजार असणाऱ्यांनी शेवग्याचे सूप घ्यावे. शेवग्यामध्ये अँन्टी ऑक्सिडंट गुणधर्म असून ते मधुमेह, कर्करोग प्रतिबंधक ठरते.अँटीस्पाझमोडिक गुण असल्यामुळे स्नायूंच्या त्रासापासून आराम देते. अँलर्जी विरोधी क्षमता असल्यामुळे रक्तदाब कमी करण्यास मदत करते.

शेवगा कॅन्सर रोखण्यासाठी फायदेशीर असून ते अँन्टी पायरेटिक गुणधर्म असलेले आहे. ते ताप कमी करण्यास फायदेशीर आहे. यात अँन्टी अल्सर गुणधर्म असून अल्सरची निर्मिती कमी करते. यामुळे किडनी स्टोन कमी होण्यास मदत होते. हेपेटो संरक्षणात्मक असून यकृताचे नुकसान टाळते, लघवी साफ होते, कॉलेस्टेरोल कमी करण्यास मदत करते. 

अगदी १०० ग्रॅम शेवग्याच्या शेंगेत २९.६ कॅलरीज, प्रोटिन्स २.६१ ग्रँम, फॅट्‌स ०.१ १  ग्रॅम्स, कार्बोहायड्रेट ३.७५ ग्रॅम्स, डायटरी फायबर ६.८२, सोडीअम २२.३१, पोटँशियम ४१८, कॅल्शियम ३३.३०, आयर्न ०.७२, विटामिन सी ७१.७८ असते. पानातील रसामध्ये जीवाणूनाशक तत्त्व असतं. खोडातून एक भु-या रंगाचा डिंक मिळतो. तसंच बियांमधून रंगरहिन तेल मिळतं. शेवग्यात मोठया प्रमाणात खनिजं आढळतात. शेवग्यापासून जीवनसत्व ‘अ’, ‘क’ आणि ‘ई’ तयार करतात. पाणी शुद्धीकरणात शेवग्याच्या बियांचा वापर होतो.म्हणून हे आहे सुपर फुड ! 

सुगरण महिलांनी शेवग्याचे पदार्थ तयार करून मुलांना द्यावे तसेच त्याचे सूप द्यावे. आठवड्यातून किमान ३ ते ४ वेळा शेवगा आहारात असलाच पाहिजे. शेवग्याची शेंगाची भाजी, सूप, शेवग्याचे सरबत करून ते फ्रीझमध्ये थंड करून घ्यावे. शेवग्याची चटणी, शेवगा सूप, शेवग्याचे पराठे, पापड... कितीतरी पदार्थ करता येतील. कुटुंबाचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी बाजारातील वाढीव शेवगा विकत घेऊन सर्वतोपरी सहकार्य करावे. शेंगांचा गर काढण्यासाठी त्या शिजवून घेऊन त्याचा गर काढून तो वाळविता देखील येतो. हे ओर्गानिक कॅल्शियम पचनास चांगले असते. जास्त पक्व शेंगा घेतल्यास त्यात जास्त कॅल्शियम मिळते. मात्र ते सावलीत वाळवून ठेवावे लागते. 

यात चोथ्याचे प्रमाण चांगले आहे. यामुळे अनेक लाईफस्टाईल डिसिजेसमधे (हृदयरोग, मधुमेह, उच्चरक्‍तदाब, गाऊट इ.) शेवगा हितकारक ठरतो. शेवग्याच्या पानांचा रस प्यायल्याने उचकी थांबते व धाप लागणं कमी होते. शेवग्याच्या पानांच्या रसात चमचाभर साखर घेऊन तो तीन दिवस प्यायल्याने वायूने आलेला गोळा नाहीसा होतो. शेवग्याच्या पानांच्या रसाने डोकं चोळलं असता डोक्यातील कोंडा निघून जातो. मस्तकशूळ झाला असल्यास शेवग्याच्या पानांच्या रसात मिरे वाटून त्याचा लेप लावावा. पोट फुगलं असल्यास शेवग्याच्या पानांच्या रसाचा काढा तयार करून त्यात हिंग व सुंठ घालून तो प्यावा. शेवग्याच्या पानांच्या रसाचा काढा करून त्यात मिरे, संधव व पिंपळीचं चूर्ण घालून प्यायल्याने प्लिहोदर बरा होतो. वायूचा प्रकोप होऊन शरीरात कुठंही दुखत असल्यास शेवग्याच्या काढय़ात सुंठ व हिंग घालून प्यायल्याने वेदना थांबते. शेवग्याच्या पानांच्या रसात मध घालून डोळ्यांत घातल्याने डोळे दुखणं थांबतं. मस्तकात वेदना होत असल्यास शेवग्याचा डिंक दुधात वाटावा आणि त्याचा लेप मस्तकावर लावावा. त्यामुळे वेदना कमी होतात. मिरपूड व शेवगा बारीक कुटून एकत्र करून हुंगल्यास शिंका येऊन डोकेदुखी दूर होते.

 शेवग्याच्या शेंगांची भाजी खाल्ल्याने भूक लागते, तोंडाला चव येते. शेवग्याच्या शेंगांचा जेवणात वापर होत असल्याने त्यांना बाजारात मोठय़ा प्रमाणात मागणी असते. शेवग्याने अनेक औषधी गुण पाहता त्यांना पौष्टिक कॅप्सुलच म्हणायला हवी. शेवग्याच्या शेंगा कॅल्शियम गोळ्या ऐवजी खाऊ शकता इतके त्यात कॅल्शियम आहे.शेवगा, सांधेदुखीवरही उपयोगी आहे.

 हे अभिमानानं सांगावंसं वाटतं की, भारतातील शेवग्याचे पीक मागील वर्षी एक्स्पोर्ट झाले. शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला. पण आम्ही भारतीयांनी आमचे सगळे जुने ते सोने सोडले आहे. आम्हाला पाहिजे आहे आधुनिक, महागडे खाद्य आणि पेय. शेवगा खाणे आम्ही सोडले आहे . त्याला आम्ही नाक मुरडतो. यामुळे कॅलशियमची कमतरता वाढून गुडघेदुखी, मणकेदुखी, सांधेदुखी हे आजार लोकांमध्ये फोफावत चालले आहेत. समुद्रातील शिंपले दळून कॅलशियम तयार केले जाते व त्याच्या महागड्या गोळ्या लोक खाऊन किडनी स्टोनसारख्या दुसऱ्या आजाराला बळी पडत आहेत. गुराढोरांचे, जनावरांचे कॅलशियम कमी झाल्याने त्यांच्या आरोग्याच्या समस्याही वाढलेल्या आहेत. दुधाची गुणवत्ता ढासळली आहे. त्यामुळे लहान मुलांचे दात किडून जाताना दिसत आहेत.  

पण आहारात अति जास्त प्रमाणामध्ये घेतल्यास नुकसानदायक ठरू शकते. उदा. गर्भवती महिलांनी सुरुवातीच्या दिवसात शेवगा टाळावा. अँलर्जी असल्यास चेहऱ्यावर किंवा त्वचेवर सूज येऊ शकते. तसेच जळजळ होवू शकते. पण हे होण्याचे प्रमाण कमी आहे.

पाश्चात्य देशात जंक-फूडमुळे हाडांचे विकार वयाच्या १५ व्या पासूनच दिसत आहेत. हाडांचे झिजणे, कॅलशिमची कमतरता रोखण्यासाठी तेथे शेवग्याचा वापर चालू झाला आहे. हे उदाहरण यासाठी दिले की आम्हाला पाश्चात्य खानपानाची भुरळ पडली आहे. म्हणूनच जरा मागे वळून पहा. आमचा निसर्ग सोन्याची खाण आहे. चला तर मग, त्याचे जतन करूया....निरामय राहण्यासाठी, समृद्ध आयुष्य जगण्यासाठी अशा सहज उपलब्ध पदार्थांचा आहारात समावेश करूया. पटतंय ना?

 

प्रतीक्षा ठोसर,

आहार तज्ञ