चरैवेति.......चरैवेति....
परिश्रमो मिताहारो भूगतावश्विनीसुतौ ।
तावनादृत्य नैवाहं वैद्यमन्यं समाश्रये ।।
भरपूर शारिरीक श्रम आणि मर्यादित आहार , हे दोन पृथ्वीवरील जणू अश्विनीकुमार आहेत. त्यांचा अनादर करून मी इतर कोणत्याही वैद्याचा आश्रय घेत नाही. (अश्विनीकुमार हे देवांचे वैद्य आहेत .) ऋग्वेदाच्या ऐतरेय ब्राम्हणांतील हे सुभाषित आहे . याचे तात्पर्य असे की , नेहमी परिश्रम करणारा मनुष्य बळकट व सुदृढ राहतो व त्यामुळे तो जगातील सर्व सुखे व आनंद उपभोगू शकतो. काय गम्मत आहे नाही ....ऋग्वेदकालीन रचना आजच्या काळातही किती चपखल बसते . कित्ती सोप्प करून सांगितलय . आणि या दोन्ही गोष्टी आज आम्ही नेमक्या उलट्या करतोय . संगणक , भ्रमणध्वनी इ. सोबतच निरनिराळी उपकरणं मिक्सर , फूडप्रोसेसर पासून तर भांडी आणि कपडे धुण्याच्या मशिनीपर्यंत .आता तर झाडूपोछाही रोबोट करणार म्हणे ..बसा फतकल मांडून निवांत..... तिकडे सायकल एक बरी होती म्हणावी तर दोनचाकी , चारचाकी गाड्या आल्या . बरं त्यातीलही जी काय थोडीफार मेहनत किक वगैरे मारण्याची , स्टियरींग फिरविण्याची ...ते ही सगळं ऑटोमॅटिक ....एकंदरीत शारिरीक श्रमाची पार वाट लावून टाकलीय . उसनं अवसान आणून मग जीम टीम लावायचं तिथे मोजून चार सहा महिने अतिरेकी श्रम करायचे ....इंस्टा , फेबु वर टाकण्यापुरते ....मग हुश्यssss.... लंबर स्प्रेन , स्लिप डिस्क , मसल पुल , लिगामेंट टियर अशा गोंडस नावांखाली पुन्हा शारिरीक श्रमाला सुट्टी ....साधं सोपं सोडायचं आणि मग कठीण जमत नाही म्हणून रडत बसायचं याला काय अर्थ आहे राव ....
तसचं मिताहाराच्या बाबतीत ....सध्या तर रस्त्यानी फिरतांना बघावं ...सगळीकडे नुसती हाॅटेल्स आणि सगळीकडे नुसती गर्दी ....खाण्यासाठी जन्म आपुला म्हणत नुसतं खात सुटलोय ...
नाहीतर डाएटच्या नावाखाली अतिरेकी न खाणं ....अहो कुठल्याही बाबतीत अति सर्वत्र वर्जयेत। म्हणतो आपण नाही का ...उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ...सांगणारी आमची उदात्त संस्कृति ....आणि आम्ही आज काय करतोय ....शरीर धारणासाठी आणि सुदृढ राहण्यासाठी जेवढं जरूरी आहे तेवढं खावं . सावकाश जेवावं ....सावकाश म्हणजे बसले निवांत तासभर खात असं नाहिये ....सावकाश म्हणजे स अवकाश ...थोडी जागा शिल्लक ठेवायचीय पोटात ....पचनक्रियेसाठी ....पचनाची चक्की फिरायला जागा हवी ना थोडी ....दाबून भरलत तर चक्की जाम होते ....फिरतच नाही . ही चक्की जाम की मग सगळ्या शरीरातील एक एक चक्की जाम व्हायला लागते . परिणाम शारिरीक हालचाल पहिले मंदावते . मग एक एक बिघाड सुरू शरीरयंत्रात .
बरं कशासाठी हे सगळं .....
शरीरं आद्य खलु धर्मसाधनम् । म्हंटलय ....धर्म , अर्थ, काम आणि मोक्ष या पुरूषार्थांच्या प्राप्तीसाठी , सुखोपभोगासोबतच अंतिम आनंद प्राप्त करण्यासाठीचं शरीर हे माध्यम आहे . चौर्यांशीच्या जन्ममरण फेऱ्यातून भटकून हे मानव शरीर मिळालय ....त्याचं पतन होवून पुन्हा चौर्यांशीच्या फेऱ्यात न अडकता अंतिम , शाश्वत आनंद प्राप्त करायचा असेल तर तोपर्यंत हे शरीर सुदृढ व बळकट असावच लागेल .अखिल ब्रम्हांडात सगळ्यात शक्तिशाली कोण आहे माहितीये.....सूर्य .. .का ....कारण तो सतत कार्यमग्न असतो ......परिश्रम करत असतो...मग आम्हांलाही त्यासम व्हावयाचे तर त्यासाठीचे दोन सोप्पे मार्ग सांगितलेत शारिरीक परिश्रम आणि मिताहार .....तेवढेही जमू नये आम्हाला....असं कसं चालेल....जमायलाच पाहिजे .......नाहीतर आहेच शुगर , बीपी , लठ्ठपणा , वातविकार , थायराॅईड आणि काय काय सोबतीला ....काय मग चलताय ना ....परिश्रम करायला.....आणि हो थोडसं पोटाला आधार ....खाऊन या हो....
वैद्य सौ.समिधा चेंडके , नागपूर