ट्रेनमध्ये आम्हा मित्र-मैत्रिणींच्या खूप रंगलेल्या गप्पा
अभ्यासाचा बोजा, नवीन सिनेमा, चांगली हॉटेल्स-विषय अनेक
शिकायला असता का इथे? समोरच्या कोपऱ्यातून आवाज झाला
एक आंधळा, शेजारी काठी, कपडे जेमतेम
आवाजाच्या दिशेनं तो असंच काहीतरी विचारत होता
अर्धवट उघड्या त्या केविलवाण्या डोळ्यांकडे बघत
दोन-चार उत्तरं दिली
त्यापुढे मात्र आमच्या पांढरपेशा मनाला त्याच्याशी बोलणं गैरजरुरी वाटलं
आणि आमच्या गप्पांत केवढा तो व्यत्यय!
दबल्या आवाजात ट्रेनमधल्या आंधळ्या पांगळ्यांना नावं ठेवत गप्पा परत सुरु झाल्या!
आमच्या हसण्या खिदळण्यात त्या सहप्रवाशाचा आवाज हरवून गेला
अशीच स्टेशनं जात राहिली
आम्ही आता देशाविषयी बोलत होतो
गरीबी, उपासमार, बॉर्डर, अतिरेकी,
सगळेच खूप हिरीरीने बोलत होते
तेवढ्यात तोच आवाज पुन्हा आला
आमच्या कपाळांवर आठ्या चढल्या
"तुम्ही एवढे मनापासून बोलत आहात म्हणून फक्त सांगतो”
बातम्यांमध्ये ऐकलेला गेल्या दहा तारखेचा स्फोट आठवतो?
भीषण रणधुमाळी होती, आम्ही हार जात नव्हतो,
त्यांना येऊ देत नव्हतो
तशातच त्यांनी तो स्फोट केला
कित्येकांचे प्राण, अनेकांचे हातपाय
माझे फक्त डोळे गेले”!
एकदमच आमच्या माना खाली गेल्या
कशाकशामुळे ते काय सांगणार
तो त्याचे डोळे सरहद्दीच्या रक्षणार्थ ठेवून आला होता
आंधळे तर आम्ही होतो!
डॉ. मानसी कन्नडकर कविमंडन
जनरल फिजिशियन