योगाभ्यास निरामय जीवनाची गुरुकिल्ली

सुमारे २५०० वर्षांपूर्वी योगसूत्र' या नावाचा ग्रंथ महामुनी पतंजली यांनी लिहीला. या ग्रंथामध्ये त्यांनी योगाची यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी आठ अंगे सांगितली आहेत. पतंजली ऋषींनी आम्हा भारतीयांना दिलेली ही मोठीच देणगी आहे. आधुनिक काळात इतर अंगांचा विचार मागे पडून योग म्हणजे केवळ शारीरिक आसने आणि झालेच तर प्राणायाम असा समज निर्माण झाला. खरे म्हणजे, योग म्हणजे नुसती आसने नसून ती एक साधना आहे, जीवनशैली आहे. अज्ञान आणि काही गैरसमज यामुळे योगाभ्यासाचे महत्व जरा कमी होऊ लागले असतानाच भारतात स्वामी रामदेवबाबा यांचे नाव उदयास आले. त्यांनी संपूर्ण भारतात योगप्रसाराला हातभार लावला आणि अनुभवांती जनतेलाही योगाभ्यासाचे लाभ दिसू लागले. स्वामी रामदेव यांच्या संदर्भात अनेकांचे काही मतभेद असले तरी आपल्या देशात योगसाधनेचा प्रसार करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे हे निसंशयपणे मान्य करावे लागेल.

भारताचे प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत वर्षातील सर्वात मोठा असणारा दिवस अंतराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांच्या प्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठींबा दिला. अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारख्या देशांच्या प्रतिनिधींनी देखील या प्रस्तावाला पाठींबा दिला आणि डिसेंबर २०१४ मध्ये या प्रस्तावाला मान्यता मिळाली. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतराष्ट्रीय योग दिन जगभर साजरा करण्यात आला. योगाभ्यासाला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळण्याचे संपूर्ण श्रेय प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी यांना जाते. संपूर्ण जगाला ज्या गोष्टींची मान्यता आहे तिचा उगम भारतात झाला आहे याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे.

योग म्हणजे काहीतरी हिंदु धर्मातील काही तरी आध्यात्मिक प्रकार आहे असा काही लोकांचा, विशेषतः अन्यधर्मीयांचा गैरसमज आहे. तथापि, योगाभ्यासाला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाल्यानंतर हा गैरसमज दूर होण्यास खूपच मदत झाली आहे. परिणामी, अनेक इस्लामी, ख्रिश्चन देशांमध्ये देखील आता योगाभ्यास केला जात आहे. योग म्हणजे केवळ शारीरिक व्यायाम नव्हे तर शरीरसंवर्धनासोबतच मानसिक आरोग्यासाठी देखील योग अत्यंत लाभदायक आहे. योग हा मन, आत्मा आणि शरीर यांचे मिलन घडवतो. 

आसनांमुळे शरीरातील सर्व सांधे, पोट, पाठीचा कणा, मान, शरीरातील सर्व ग्रंथी यांना ताण मिळून त्या कार्यरत होतात व त्यामुळे शारीरिक आरोग्याला खूप लाभ होतो तर प्राणायामामुळे हृदय फुप्फुसे, मेंदू यासारख्या अवयवांना प्राणवायूचा मुबलक पुरवता होती आणि शरीर व मन शुद्ध, निरोगी राहते.

मानसिक आरोग्य चांगले नसले की त्याचा परिणाम शारीरिक आरोग्यावर होतो व मनुष्य शारीरिक व्याधींनी ग्रासला जातो ही बाब आता आधुनिक वैद्यकशास्त्रानेही मान्य केली आहे. उदाहरण द्यायचे झाले तर मानसिक ताण-तणावांमुळे माणसाला मधुमेह होऊ शकतो आणि त्यातूच पुढे इतरही व्याधींना सुरुवात होते. यासाठी योगाभ्यासाचा अतिशय चांगला उपयोग होतो. आजच्या धकाधकीच्या जीवनात मानवाला अनेक ताण-तणावांना सामोरे जावे लागते, प्राणायाम, धारणा, ध्यान, जप यामुळे असे ताण-तणाव दूर होण्यास मदत होते. दोन्हीच्या नियमित अभ्यासाने मनुष्याचे जीवन निश्चितच आनंददायी होते. अनेक लोक एखादा आजार झाल्यानंतर योगाभ्यास सुरु करतात आणि औषधे बंद करून आपला आजार योगाभ्यासाने सपशेल दूर होईल अशी अपेक्षा करतात. योगाभ्यासामुळे आजार दूर होतात हा फार मोठा गैरसमज आहे. योग हा आजार दुरुस्त करण्यासाठी नाही तर शक्यतो आजार होऊ नयेत, अगदी शरीर त्यागण्याची वेळ येईपर्यंत आनंदी जीवन जगता यावे यासाठी आहे. ज्याप्रमाणे तेलबियातून तेल काढल्यानंतर जो टाकाऊ पदार्थ उरतो तो जनावरांचे खाद्य म्हणून उपयोगी पडतो त्याप्रमाणे योगाभ्यासातून आजार दुरुस्त होण्यास मदत होत असल्यास तो मिळणारा जास्तीचा लाभ असतो. त्यामुळे आपला आजार योगासनांमुळे बरा होईल या असा समज करून घेऊन डॉक्टरांच्या सांगण्याशिवाय आजारावरील औषधे बंद करू नयेत. एकदा आजार झाला की तो डॉक्टरांच्या निदानानंतर त्यांनी दिलेल्या औषधोपचारानेच बरा होईल हे कायम लक्षात ठेवावे. अर्थात मधुमेह, उच्च रक्तदाब, दमा, पाठदुखी यासारख्या आजार लवकर बरे होण्यासाठी औषधांसोबतच योगाभ्यासाची मदत होते पुढील आयुष्यात निरोगी जीवन जगण्यास मदत होऊ शकते एवढे मात्र खरे.

थोडक्यात सांगायचे झाले तर आपल्या संस्कृतीने दिलेली ही प्राचीन देणगी आपण भविष्यात जपली पाहिजे शक्य होईल तेवढा योगसाधनेचा अंगीकार, प्रचार आणि प्रसार केला पाहिजे, जेणेकरून आपलेच नव्हे तर समाजाचेही स्वास्थ्य चांगले राहील. 

"समाधानाय सौख्याय, नीरोगत्वाय जीवने,

योगमेवाभ्यसेद् प्राज्ञः यथाशक्ती निरंतरम्.

जीवनामध्ये आरोग्य, सुख आणि समाधान प्राप्त करण्याचा एकमात्र उपाय योगाभ्यास हाच असून प्रत्येकाने आपल्या शक्तीप्रमाणे नित्य योगाभ्यास केला पाहिजे असा या वचनाचा अर्थ तो लक्षात घेऊन शुभस्य शिवम या न्यायाने दरवर्षीच्या योग दिनाची वाट न पाहता हा लेख वाचणाऱ्या सर्वांनी लगेचच योगाभ्यासाला सुरुवात करावी, हीच अपेक्षा

 

अँड. नीलकंठ तायडे, (९४२२१५९२३)