लहान मुले संवेदनशील असतात. लहान वयापासूनच दातांच्या आरोग्याचे महत्व मनावर ठसवण्यासाठी , दातांचे आरोग्य चांगले ठेवण्याची सवय लहानपणापासून लागावी , यासाठी हॉस्पिटलने संस्थेच्या टीमटाला संवेदना आरोग्य केंद्र येथे एक अभिनव स्पर्धा आयोजित केली होती, “स्वच्छ दात स्पर्धा” ..
टीमटाला संवेदना आरोग्य केंद्र येथे “स्वातंत्र्य दिनी जिल्हा परिषदेतील “ लहान मुलांसाठी “स्वच्छ दात “ ही अभिनव स्पर्धा घेण्यात आली. वातावरण देशप्रेमाने भारलेले होते . मुले उत्साहात होती. लहान मुले निरोगी तर भावी नागरिक निरोगी होतील . निरोगी नागरिकांनी देश समृद्ध होतो. आरोग्यावर पैसा कमी खर्च होतो आणि आपण अधिक क्षमतेने आणि उत्साहाने काम करू शकतो. मुले हे देशाचे वैभव असल्याने या भावी नागरिकांच्या मनात लहान वयात दंत आरोग्याचे महत्व बिंबवणे महत्वाचे आहे . कारण दंत आणि मुख आरोग्य हा शरीराचा जणू आरसा असतो ! म्हणूनच ही दंतरोग तज्ञ ही शाखा महत्वाची आहे . उत्तम मुख आरोग्य म्हणजेच उत्तम स्वास्थ्य. एका अर्थाने दातांची काळजी घेणे म्हणजे आपल्याच स्वास्थ्याची जपणूक करणे होय.
वयाच्या सहा वर्षापर्यंत दुधाचे २० दात तोंडात असतात तर नंतर आपल्याला कायमचे ३२ दात येतात. दुधाचे दात किडले असले तर पुढे कायम येणारे दात तसेच किडलेले येतील असे नाही , पण परिणाम होवू शकतो, हे नक्की. तसेच लहानपणी दात किडल्यामुळे दात लवकर पडल्यास नंतर दातांची रचना वाकडी येणे, उशिरा येणे, हिरडीवर सूज येणे , हा त्रास होवू शकतो. हिरडी मजबूत होण्यासाठी आहारात सात्विक ,सकस पण साधे अन्न खावे. भाजी, फळांचा आहारात समावेश असावा . पण गोड खाणे, चहा, कॉफी अधिक घेण्याची सवय असल्यास व चूळ न भरल्यास दात खराब होण्यास सुरुवात होते.
जनकल्याण सेवा संस्था संचालित डॉ. हेडगेवार हॉस्पिटलचे प्रकल्प संचालक डॉ. यशोधन बोधनकर हे कल्पक आणि कितीतरी पुढचा विचार करणारे आहेत. त्यांनी म्हणूनच स्वातंत्र्य दिनी ही स्पर्धा ग्रामीण भागात आयोजित केली . ग्रामीण भागात विद्यार्थी संख्या कमी असते. पण संख्या महत्वाची नसून त्यांचा सहभाग महत्त्वाचा वाटतो.मुळात त्यांना दाताची स्वच्छता समजणे , ती जाणीव होणे आणि पुढे दातांची काळजी घेणे , ही सुरुवात या निमित्याने होणार होती. यासाठी ही स्पर्धा होती. सुमारे एक महिना आधीच मुलांना स्पर्धेची कल्पना दिली होती. त्यामुळे त्यांनी दात रोज स्वच्छ , दोन्ही वेळा घासणे ही प्रारंभिक काळजी घेणे सुरु केली होती, हे विशेष .
मी मुलांना दातांचे महत्व शब्दांनी सांगण्याबरोबरच चित्र काढून सांगणे अधिक पसंद केले कारण माझ्या मते मुलांना चित्र आवडते, शब्दांपेक्षा ते अधिक बोलके आणि परिणामकारक असते. ब्रश करण्याचे महत्व, ब्रश का करावा, कसा करावा आणि मुख आरोग्य हे माझे मुद्दे होते.
मुख आरोग्य - मुलांना ब्रशिंग कसे करावे , हे सांगितले. दात नेहमी हिरडी कडून चावण्याच्या भागाकडे घासावे. तर खालून वर याप्रमाणे खालचे दात तर वरून खाली असे वरचे दात स्वच्छ करावेत. दात म्हणजे शरीर निरोगी ठेण्याची पहिली पायरी आहे. कारण दात स्वच्छ नसतील तर शारीरिक आजारांची सुरुवात होते.जसे , शारीरिक स्वच्छतेसाठी रोज अंघोळ करणे महत्वाची असते , अगदी तसेच दातांच्या स्वच्छतेसाठी रोज दोनदा ब्रश करणे आवश्यक आहे ! तोंडाचे आरोग्य म्हणजे शारीरिक आरोग्य होय .पोटासाठी सर्व धावपळ असते आणि हे पोट व पचन हे निरोगी दातांवर अवलंबून असते. कारण दात निरोगी नसतील तर अन्न पचन होत नाही. अन्न नीट चावून खाता येत नाही आणि दातातील अशुद्धी पोटात जाते. यामुळे अनारोग्य सुरु होते .
दातांवर उपचार – अन्न दातात साठून राहिल्यास हिरडीवर सूज येणे, दातांतून रक्त येणे, तोंडाचा घाण वास येणे ( मुख दुर्गंधी ) , दात किडणे,लवकर पडणे इ लक्षणे दिसून येतात. दातांची कीड असेल तर तोंडाचा सुरुवातीला सिमेंट भरणे, कीड अधिक वाढली असेल तर रूट कँनल करावे लागते. दातात फटी असल्यास ऑर्थो उपचार करावे लागतात .
बक्षिसे गावकरी, शिक्षक, पालक, मित्रांसमोर मिळाल्याने मुले साहजिकच खुश होते. पण मुलांना आवाहन केले की ही माहिती त्यांनी स्पर्धेसाठी नव्हे तर नेहमी लक्षात ठेवावी . स्पर्धा , बक्षीस , कौतुक यासाठी म्हणून नाही तर आरोग्याची किल्ली म्हणून दात जपावेत, स्वच्छता राखावी. त्यांना समारोपात संदेश देणे अगत्याचे होते. तो काय ?तर आपल्या मित्रांना, पालकांना आणि जमेल तितक्या अधिक लोकांना दाताचे महत्व पटवून द्या. इतर अवयवाप्रमाणेच दात महत्वाचे असून दातांची काळजी घ्या आणि आरोग्याचा पाया मजबूत करा.
डॉ . साक्षी शाह, (B.D.S.)
दंतरोगतज्ज्ञ , डॉ हेडगेवार हॉस्पिटल, अमरावती