ह्यूमन मिल्क बँक.. एक वरदान

मित्रांनो तुम्हाला माहितच आहे  की बँक म्हणजे विशिष्ट गोष्टीचा साठा करण्याची जागा. ह्युमन मिल्क बँक  वेगवेगळ्या मातांनी दान केलेला दुधाला एका सुरक्षित ठिकाणी साठवते व मातेच्या दुधाची गरज असणाऱ्या बाळांना  पुरवठा करते.

मातेच्या दुधाला अमृताचा दर्जा दिल्या गेला आहे.  मातेचे दूध हे नवजात अर्भकासाठी सर्वोत्तम  असते. वेगवेगळ्या आजारांपासून  बाळाचे संरक्षण, संपूर्ण पोषण आणि बाळाचा संपूर्ण विकास मातेच्या दुधानेच होतो.

MOM म्हणजे Mothers Only Milk.. आईचे दूध  बाळासाठी सर्वश्रेष्ठ आहे. 

मिल्क बँक

संपूर्ण भारतात, तसेच आपल्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या रुग्णालयात, मिल्क बँक स्थापन झालेल्या आहेत. 
आज जाणून घेऊया सध्याः स्थितीत अमरावतीमध्ये मिल्क बँकचे ठिकाणं आहेत- पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज, डफरीन रुग्णालय, तसेच कॉटन मार्केट स्थित मुरके रुग्णालय. 

मिल्क बँकचे उद्देश-मातांना सहाय्यक

मिल्क बँक ही मातांना सहायक आहे. 
ज्या माता आपल्या नवजात बाळाला काही कारणास्तव स्वतःचे दूध देऊ शकत नाहीत किंवा डिलिव्हरी गुंतागुंतमुळे दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये भरती असतात त्यांच्या नवजात अर्भकांना मिल्क बँक  (एका डोनर- उदा. यशोदा मातेचे) दूध पुरवते. ज्या मातांना आजारास्तव पुरेसे दूध ही येत नाही त्या अर्भकांना दूध पुरवले जाते. काही कारणास्तव जर मातेचे निधन झाले असेल अशा अर्भकांना मिल्क बँक दूध पुरवते.

कोणत्या प्रकारच्या बाळांना मिल्क बँक सहाय्यक असते

  • कमी वजनाचे
  • कमी दिवसाचे
  • आजारी बाळ
  • काचेच्या पेटीत भरती असलेले बाळ
  • दत्तक घेतलेले बाळ
  • अनाथ आश्रमातील बाळ किंवा माता नसलेले सुदृढ बाळ

    अशा कोणत्याही बाळाला, ज्यांची माता तात्पुरता उपलब्ध नसते किंवा दूध पाजू शकत नाही, त्या बाळांना मिल्कबँकेचे दूध पुरवता येते.


मिल्क बँक मधील दूध सुरक्षित असते
    
होय. वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्यांमधून, तसेच प्रक्रियांमधून दाता मातेचे दूध जाते व ते संपूर्णपणे निर्जंतुक व सुरक्षित केल्या जाते. तसेच ते योग्य तापमानामध्ये साठवले जाते.  दाता किंवा डोनर माता यांचे देखील दानपूर्व परीक्षण चाचण्या केल्या जातात. म्हणूनच या डोनर माता जगातील सर्वात महान 'यशोदा माता' आहेत ज्या स्वतःच्या बाळाला आणि दुसऱ्यांच्या बाळाला दूध पुरवतात. 


मिल्क बँकची गरज

मिल्क बँक चि आज नितांत गरज आहे. वरील कारणे बघता सुरक्षित, स्वच्छ, मातेचे दूध हे गरजू बाळासाठी उपलब्ध होणे, सुदृढ बालक निर्माण करणे, सुदृढ समाज निर्माण करणे, तथा बाल मृत्युदर कमी करणे... हे काम मिल्क बँक सतत करत आहेत. म्हणूनच मिल्क बँकेची नितांत गरज समाजाला आहे. 

वरील माहिती आपण आपल्या मित्रांना, परिजनांना, आणि रुग्णांना पोचवावी जेणेकरून गरजू बाळास  डोनर यशोदा मातेचे दूध मिळेल हीच या लेखाची संकल्पना आणि विनम्र निवेदन.


डॉ सोनाली शिरभाते
राज्य कार्यकारिणी सदस्य,
महाराष्ट्र बालरोगतज्ज्ञ संघ