ना. धो. महानोर - भावांजली

    ना. धो. महानोर म्हणजेच नामदेव धोंडो महानोर.

    ‘ह्या शेताने लळा लावला असा असा की, 
    सुखदु:खाला परस्परांशी इसरलो, 
    आता तर हा जीवच असा जखडला, 
    मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो’

असं म्हणणारे हे कवी मातीशी जोडलेले नसतील तर नवल. त्यांची कविता तशी गावातली, पण  मनामनातली. प्रेम ही भावना जितकी शुद्ध तितकी जिवंत. जितकी सरळ तितकीच तरल. प्रेमाचं वर्णन अनेक कवींनी अनेक कवितांमधून केलं आहे. तसंच महानोरांनी पण केलं. मग त्यात नवं काय?  नवे आहेत शब्द , नवी आहे कल्पना आणि नवा दृष्टिकोन. एखाद्या गोंडस पाखराला पिंजऱ्यात ठेवावं , मोत्याचा दाणा द्यावा ,मनापासून काळजी घ्यावी - म्हणजे प्रेम आणि  एखाद्या पाखराला अलगद ओंजळीत घ्यावे, पाठीवरून हात फिरवावा आणि पुन्हा रानात नेऊन सोडावे , परत केव्हातरी असेच भेटण्यासाठी... नकळत , म्हणजेही प्रेमच. यातला दुसरा प्रकार म्हणजे महानोरांची ही कविता. 

    उन्हात चांदणं आलं लाज पांघरूनी ..
    यातली मोहिनी कळायला आपण ऊन तरी असायला हवं किंवा चांदणं तरी.

    त्यांची कविता समजण्यासाठी नसून उमजण्यासाठी आहे... ओंजळ पसरून वाट पहा, फुलपाखराप्रमाणे अलगद येऊन बसेल ! आज त्यांच्या आठवणीतत्यांचीच एक कविता...

    चिंब पावसानं रानं झालं आबादानी
    झाकू कशी पाठीवरली, चांदणं गोंदणी
    झाकू नको कमळनबाई, एकांताच्या कोनी
    रूपखनी अंगावरली, सखे लावण्याची खाणी
    राया तुझे हात माझ्या हातात गुंफूनी
    उन्हात चांदणं आलं लाज पांघरूनी
    तुझ्या डोळ्यांच्या सांदीत, सावल्यांची राणी
    पान्यामंदी झिम्मा धरं, आभाळ अस्मानी
    अंगावरी थरथर उठली झिम्मड भिजल्यावानी
    सांगता ना येई काही साजणा बोलांनी

 

डॉ. सुमित पात्रिकर
रेडिओलॉजिस्ट
डॉ. हेडगेवार हॉस्पीटल, अमरावती