गेल्या अनेक वर्षापासून समुपदेशन क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळे अनेक अनुभव गाठी बांधल्या जातात .त्यातील काही अनुभव जीवनाचे मोठमोठे तत्वज्ञान अगदी सहज सांगून जीवनाला एक वेगळीच कलाटणी देऊन जातात .आज असाच एक अनुभव आपणा सोबत शेअर करणार आहे .
खरतर ही केस तशी फार सुरवाती पासून माझ्या कडे नव्हती (अश्या केसेस ना खरच केस म्हणावे का हाच प्रश्न आहे), एका समारंभात तिची आणि माझी ओळख झाली आणि तू समुपदेशन करतेस न? मग मला तुझी जरा मदत हवी आहे, अशा अगदी सहज संवादातून सुरूवात झाली .ती सर्वप्रथम भेटायला आली तेव्हा आल्या आल्या तिने मला अगदी स्पष्ट सांगितले, की आज तू मला सहानुभूती, कीव किंवा कुठलेही उपकार म्हणून मदत नको करू, माझ्या आधीच्या आयुष्यात काय झाले ते तू ऐक आणि मग तुझे मत दे व एक व्यावसायिक मदत तू मला कर ! इतके स्पष्ट आणि निर्भीडपणे बोलायला सुरुवात केल्या मुळे माझी तिच्या बद्दलची उत्सुकता वाढली आणि तिने सांगायला सुरूवात केली, ती जन्मतः अपंग नव्हती, तिचा जन्म एक सुदृढ बाळ म्हणूनच झाला परंतु वयाच्या नवव्या वर्षी काही तरी न्यूरोलोजीकल समस्येमुळे तिचे पाय अधू होण्यास सुरूवात झाली आणि वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत ती पूर्णपणे व्हील चेअरवर अवलंबून राहिली. आता जरी ती सगळे अगदी सहज सांगत होती परंतु हे सगळे होत असताना तिला किती मानसिक त्रास होत होता हे तिच्या चेहऱ्याकडे बघून कळत होते.
तिने सांगितले की त्या काळात तिने फक्त अभ्यास एके अभ्यास इतकेच आयुष्य आखले होते, अश्या आयुष्याचा काय फायदा अशा विचाराने दोन तीन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला होता पण ते सगळे प्रयत्न अयशस्वी ठरले. डोक्यात सतत स्वतःला संपवण्याचे विचार घोळत असत परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते कदाचित, घरातील लोकांचे प्रयत्न आणि प्रेम तिच्या या आत्मघातकी विचारांवर आळा घालण्याचे काम करत होते... यात तिच्या आईची महत्वाची भूमिका होती.
आत्महत्येचा विचार तीव्र असणाऱ्या लोकांना आपण जसं सांगतो की कुणी तरी अशी व्यक्ती शोधून ठेव आयुष्यात जिला कधीही काहीही बोलले तरी ती तुमच्या साठी कधीही कुठेही उपलब्ध असेल. अशीच तिच्या आयुष्यात तिची आई होती . एकदा तिची आई तिला पुण्याच्या बाल कल्याण संस्थेमध्ये घेऊन गेली तेथील काही मुलांची ओळख तिच्या आई ने तिला करून दिली त्यांच्या स्टोरी तिला सांगितल्या... ते सध्या जे काम करतात त्या बद्दल सांगितले ... ती भेट तिच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. तिच्या "स्व" ची जाणीव तिला फार प्रकर्षाने व्हायला सुरूवात झाली. माझ्यात खूप गोष्टी इतरांपेक्षा खूप चांगल्या आहेत जसे की आपण उच्च बुद्धिमत्ता असलेली एका सधन कुटुंबात जन्मलेली व्यक्ती आहोत फक्त शरीर अधू झालय बुद्धी नाही. या तिच्याच स्व संवादाने तिच्या आयुष्याला एका वेगळ्याच वळणावर तिला आणून सोडले जिथे अनेक मार्ग दिसायला लागले ....जगण्याला अर्थ मिळाला असे वाटायला लागले ..आणि एका नवीन प्रवासाला सुरूवात झाली.
हळूहळू तिने शरीराच्या अधूपणावर दुर्लक्ष करून आपल्या शक्ती स्थानावर लक्ष केंद्रित करायला सुरूवात केली आणि आज त्याचा परिणाम असा आहे की तिच्याकडे वयाच्या २८ व्या वर्षी २५ पेक्ष्या अधिक विविध क्षेत्रातील पदव्या आणि पदविका आहेत. मानसशास्त्र, समाजशास्त्र, फ़िजिओ थेरपी, विधी, पत्रकारिता , PhD अश्या अनेक विषयात ती काम करते ..तिची आई तर तिला जिवंत enpsclopidia च म्हणते. ती आता स्वतःच्या पायावर उभी आहे. आई वडील पाठीशी आहेत पण ती त्यांचा कुबड्या म्हणून कधीच वापर करत नाही. स्वतःची धडपड आणि आत्मविश्वासाच्या जोरावर तीने आज त्यांना proud parents असल्याची भावना अनुभवायला दिली आहे. आज ती अनेकांसाठी प्रेरणास्थान आहे. माझ्याकडे ती ज्या कामासाठी आली होती त्यातही ती फार स्पष्ट होती फक्त जरा मदत हवी होती. तिच्याशी बोलल्यावर मलाच खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या ...जसे आपले सगळे ठीकठाक असताना किती कारण देतो आणि यामुळे आपलेच नुकसान होत असते हेही आपण विसरतो आपण बरेचदा बाह्य गोष्टीतच स्वतःला रमवत असतो आणि बाह्य रुपावरूनच लोकांना लेबल लाऊन मोकळे होत असतो आणि यामुळेच आपण कितीतरी गोष्टीपासून वंचित राहतो. जर आपल्या जाणीवा नेणीवा जागृत ठेऊन काही बाबी पाहिल्या तर कोणताच नकारात्मक विचार आपल्यावर हावी होऊच शकत नाही, आपण मुळात कसे आहोत आपल्यात काय चांगले आहे काय वाईट आहे हे आपल्यापेक्षा इतर कुणालाच चांगले ठाऊक नसते, परंतु आपण स्वतःला दुसऱ्याच्या चष्म्यातून बघतो आणि स्व पासून लांब जातो .म्हणून मी जसा आहे / जशी आहे तसा स्वतःचा स्वीकार करणे आणि आपल्याला जे उत्तम करता येतं त्यावर जाणीवपूर्वक लक्ष देऊन सातत्याने प्रयत्न करत राहणे हेच खऱ्या यशाचे गमक ठरू शकते. शेवटी इतकेच की आयुष्य हे एकदाच मिळते तिथे पुन्हा retake नसतो म्हणून त्याला पारितोषिकाप्रमाणे उपभोगावे, आनंद घ्यावा, द्यावा, नाकारात्मकतेला दूर लोटावे आणि सकरात्मकतेचीची कास धरावी ....सोप्पे नसले तरी अशक्य मात्र नक्कीच नाही आणि आपण जर ठरवले तर निसर्ग ही आपल्या मदतीला धाव घेतो ....
वनिता राऊत
मानसशास्त्रज्ञ, अमरावती