कोण येणार गं पाहुणा , तो की ती ?

गर्भलिंग  कसे ठरते?

 दोनाचे चार हात झाले की संसाराची खर्या अर्थाने सुरुवात होते. नव्याची नवलाई संपली की प्रश्न सुरु. काही गुड न्यूज आहे की नाही ... कधी प्लानिंग  असते  एखाद्याचे. तर कधी आई होण्याची इच्छा असूनही हवी ती बातमी मिळत नाही असेही होते. कधी पहिला मुलगा आहे तर दुसर्यांदा मुलगी असावी असे वाटते तर  पहिली मुलगी असली तर नंतर मुलगा हवाहवासा वाटतो. मात्र अशा वेळी केवळ  उत्सुकता असले तर ठीक.  मुलींची  गर्भात  होणारी हत्या ही चिंतनीय ठरली.  मुले आणि मुली यांचे प्रमाण असमान  झाले. म्हणून गर्भलिंग चाचणीवर बंदी  आली आहे . पण तरीही  मुलगा होणार की मुलगी हे ठरते तरी कसे ?, हे कुतूहलही अनेकांना असते. या मागे निखळ विज्ञान आहे. ते कोणाच्याही हाती नाही. कोण येणार गं पाहुणा .... तो की ती ? ते आपण समजावून घेऊ या.

लिंगनिश्चिती म्हणजे ‘मुलगा होणार की मुलगी’ हे कसे होते ते पाहू या. पुरुषाच्या शरीरातील सर्व पेशींत (एक्स वाय) X Y ही लिंगसूत्रे (आणि ४४   शरीरसूत्रे) असतात, तर स्त्रीशरीरात लिंगसूत्रे फक्त ( एक्सएक्स ) XX प्रकारची असतात. शरीरसूत्रांची संख्या दोन्हीकडे समान आहे.

पुरुषाचे शुक्रबीज व स्त्रीचे स्त्रीबीज  यात निम्मी म्हणजे प्रत्येकी  २३  रंगसूत्रे असतात. या २३  पैकी एक रंगसूत्र  ‘लिंगसूत्र’ म्हणून ओळखले जाते; बाकीची २२  रंगसूत्रे ही ‘शरीरसूत्रे’ असतात. लिंगसूत्रे दोन प्रकारची असतात, म्हणून त्यांना X आणि Y अशी नावे आहेत.  पुरुषात शुक्रबीज तयार होताना पेशीविभाजनामुळे २२ + X आणि 22 +Y अशी दोन प्रकारची शुक्रबीजे तयार होतात. मात्र स्त्रीमध्ये तयार होणा-या लिंगपेशी  एकाच म्हणजे २२ + X प्रकारच्या असतात.स्त्रीबीजाचे फलन होते म्हणजे त्याला शुक्रबीज येऊन मिळते. स्त्रीबीजास पुरुषाकडून २२  X प्रकारचे शुक्रबीज  मिळाल्यास होणारा गर्भ ४४  XX (म्हणजे मुलगी) होईल. याउलट पुरुषाकडून २२ Y प्रकारचे शुक्रबीज मिळाल्यास होणारा गर्भ ४४ X Y (म्हणजे मुलगा) होईल. म्हणजे मुलगा होणार की मुलगी, हे एका अर्थाने पुरुषाकडून ठरते.

खरेतर वीर्यामध्ये असलेल्या लक्षावधी शुक्रपेशींमध्ये 22 X व 22 Y या दोन्ही प्रकारच्या पेशी असतात. शुक्रबीजांपैकी स्त्रीबीजास X मिळेल की Y ही गोष्ट योगायोगावर आणि काही अज्ञात परिस्थितीवर ठरते. परंतु मुलीच झाल्या तर स्त्रीला कुटुंबात,समाजात त्रास भोगावा लागतो. अनेक वेळा मारहाण, सोडून देणे, इत्यादी प्रकारांना तोंड द्यावे लागते. लिंगनिश्चितीची शास्त्रीय बाजू सर्वांना नीट कळायला पाहिजे. या माहितीमुळे काही प्रमाणात तरी हा अन्याय दूर व्हायला मदत होईल. पण केवळ जीवशास्त्रीय कारणांपलीकडे जाऊन मानवतेच्या पातळीवरच अशा सामाजिक दोषांचा मुकाबला करावा लागेल.

गर्भधारणा व गर्भाची वाढ

पुरुषाकडून आणि स्त्रीकडून प्रत्येकी एक सूक्ष्म बीज (पेशी) एकत्र येऊन गर्भधारणा होते. पुरुषाकडून येणा-या पेशीला शुक्रबीज म्हणतात आणि कडून येणा-या पेशीला स्त्रीबीज. स्त्री-पुरुषसंबंधाच्या वेळेस इतर परिस्थिती अनुकूल असेल तेव्हा या दोन पेशी एकत्र येऊन गर्भधारणा होते.

ही गर्भधारणा स्त्रीच्या ओटीपोटातल्या गर्भाशयात होऊन या दोन पेशी प्रथम एकजीव होतात. नंतर त्यापासून सतत विभाजनाने अनेक पेशींची निर्मिती होते. हळूहळू पेशींची संख्या वाढेल तशी त्यांची तीन पदरांमध्ये रचना होते. त्या प्रत्येक पदराची वेगळी वाढ होऊन निरनिराळे अवयव व संस्था तयार होतात. या सर्व घटनाक्रमाला साधारणपणे २८०  दिवस लागतात.

मनुष्यजात पृथ्वीवर जन्मली तिथे हवामान, जीवजंतू, वनस्पती, अन्न, इत्यादी सर्व शत्रू-मित्र पहिल्यापासूनच आहेत. त्यांतल्या काहींशी माणसाला लढायला लागते तर काही त्याला जगवतात. या लढाया मनुष्य हरायला लागला, की त्याला आजार, साथी असे स्वरुप येते आणि परिस्थिती अनुकूल असेल तर भरभराट होते. या सगळया प्रदीर्घ उत्क्रांती प्रवासात महत्त्वाचा धागा आहे तो रंगसूत्रे आणि गुणसूत्रांचा.

काळाप्रमाणे मानववंशात बदल होत गेले. मानववंश इजिप्तमधल्या नाईल नदीच्या खो-यापर्यंत जायला लक्षावधी वर्षे लागली. या प्रदीर्घ प्रवासात माणसाचे विविध वंश तंत्रज्ञान, भाषा, संस्कृती, पिके, आजार वगैरे जडण घडण होत गेली. आता या सर्वच प्रक्रियांनी वेग घेतला आहे.

आपले घर हे अनेक दगडविटांचे मिळून बनलेले असते. तसेच आपले शरीरही असंख्य सूक्ष्म पेशींचे बनले आहे . सूक्ष्म जीवजंतूंपैकी बरेच प्रकार केवळ एका पेशीचेच बनलेले असतात. या पेशी स्वयंपूर्ण असतात. सभोवतालच्या परिस्थितीतून अन्न घेणे, स्वसंरक्षण करणे, पुनरुत्पादन करणे, नको असलेले पदार्थ बाहेर टाकणे ही सर्व कामे ती एकच पेशी करते.मात्र प्राणी जेवढा प्रगत, तसा या पेशींच्या कामांमध्ये वेग वेगळेपणा असतो. माणसात प्रत्येक पेशीसमूहाचे काम वेगळे असते.

यासाठी पेशींचे अनेक प्रकार दिसून येतात. वीर्यातल्या प्रत्येक शुक्रपेशीला हालचालीसाठी शेपटी असते. स्त्रीजननसंस्थेत ठरावीक प्रवास करुन     स्त्रीबीजाचे फलन करण्याची त्यांची प्रवृत्ती असते. पेशींच्या या विविध गुणधर्मामुळे शरीरात असंख्य प्रकारची कामे पार पाडली जातात. प्रत्येक प्रकारच्या पेशींचा गुणसूत्र-संच सारखाच असतो. त्या त्या व्यक्तीत मात्र त्यातला काही भाग जागृत तर उरलेला सुप्त असतो.

साधी एक सजीव पेशी आपल्या हाताने निर्माण करणे हे आतापर्यंत माणसाला जमलेले नाही. ही सृष्टी निर्माण होताना पृथ्वीवरच्या हजारो चौरस मैलांच्या जमीन आणि अथांग पाण्यामध्ये कोटयवधी वर्षे निसर्गाकडून असंख्य प्रयोग झालेले आहेत. म्हणूनच मानवाने विज्ञानात खूप प्रगती केली, हे खरे आहे. आज तर  सरोगसी , टेस्ट ट्यूब बेबी  आणि नवनवीन प्रयोगाने मातृत्व प्राप्त करणे  सोपे झाले आहे, हे खरेच. पण नैसर्गिक मातृत्व प्राप्ती आणि मुलगा की मुलगी हे मात्र आजही प्रगत माणसाच्या  हाती नाही , हे खरे.

बाळासाठी झुरणारे अनेक जन असतात. म्हणूनच तो असो किंवा ती , आपण या नवीन जीवाचे आनंदाने स्वागत करणे , हेच हितकारी आणि आनंदाचे असते. कारण आई , बाबा ही गोड हाक कानी येणे , घरात दुडू दुडू धावणारी बाल पावले आणि त्यांचा  वावर हीच आनंदी जीवनाची , पालक होण्याची सुरुवात असते, नाही का ?

 

डॉ. तनया देशमुख 

स्त्रीरोग व प्रसूतीतज्ञ  डॉ हेडगेवार हॉस्पिटल, अमरावती