आपण गर्भाशयमुखाचा कर्करोग टाळू शकतो?

जानेवारी, हा गर्भाशयमुखाचा कर्करोग जागरूकता महिना म्हणून पाळला जातो.  या अनुषंगाने, या महत्त्वाच्या आणि विशेषतः प्रतिबंधात्मक कॅन्सर बद्दल जाणून घेऊया.

कर्करोग म्हटलं की मनात भीती निर्माण होते. जगभरातील स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग म्हणजे सर्वाइकल कॅन्सर हा खूप चिंतेचा विषय आहे. स्त्रियांमध्ये होणाऱ्या कर्करोगा मध्ये  हा कर्करोग चौथ्या क्रमांकावर आहे. या कॅन्सरमुळे सगळ्यात जास्त महिलांचा मृत्यू होतो. जागतिक  आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, 2020 मध्ये केलेल्या एका सर्व्हेत हे लक्षात आलं की जगात जवळपास 6,04,000 महिलांना हा कर्करोग झाला होता. तर जवळपास 3,42,000 महिलांनी यामुळे आपला जीव गमावला. साधारण हा कर्करोग ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस (HPV)यामुळे होतो. HPV ह्या विषाणूचा प्रादुर्भाव पुरुषांनाही होऊ शकतो. आज या कर्करोगापासून वाचण्यासाठी लस निर्माण झाली आहे. मात्र या लसीबद्दल हवी तशी जनजागृती झालेली नाही. आज आपण या कर्करोगा बद्दल आणि लसीबद्दल जाणून घेणार आहोत.

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग
    गर्भाशय आणि योनीमार्गाला जोडणारा भाग ग्रीवा किंवा सर्विक्स जो गर्भाशयाच्या खालच्या बाजूस योनीमार्गात उघडतो. या ठिकाणी होणारं संक्रमण म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर.

गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सरचे प्राथमिक लक्षणं 
मासिकपाळीच्या दिवसात अति-रक्तस्राव आणि वारंवार पाळी
लैंगिक संबंध ठेवल्यानंतर रक्तस्राव
लैंगिक संबंध दरम्यान वेदना.
ओटीपोटात वेदना.
योनीमार्गातून सतत पांढरा द्रव (White Discharge) येणे
पांढरा द्रवाला घाणेरडा वास येणं
वारंवार योनीमार्गाचं इंन्फेक्शन
रजोनिवृत्तीनंतर (menopause) योनीतून रक्तस्त्राव.

ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस (HPV) म्हणजे काय?
    HPV  हा विषाणू सामान्यपणे लैंगिक संबंधातून संक्रमित होतो. आपल्यापैकी 80% लोकांना आयुष्यात एकदातरी या विषाणूची बाधा होते. त्याची लागण आणि संक्रमणही सहज होतं. पण तुम्ही HPV पॉझिटिव्ह असेल म्हणजे कॅन्सरचं झाला आहे असं नाही. कारण या व्हायरसचे 200 प्रकार आहेत. त्यात 14 प्रकार हे गंभीर आजारात मोडतात. त्यात या कॅन्सरचा समावेश आहे. साधारण HPV झालेल्या महिलांना काही उपचार न घेता ही बरा होतात. मात्र हा व्हायरस दीर्घ काळ तुमचा शरीरात राहिला आणि त्यातून जखम होऊन त्याकडे दुर्लक्ष झाल्यास तुम्हाला या कॅन्सरचा धोका अधिक असतो. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाव्यतिरिक्त, दोन्हीपुरुष आणि स्त्रियांमध्ये, एचपीव्ही संसर्ग डोके, मान, ऑरोफॅरीनक्स आणि एनोजेनिटल क्षेत्राच्या कर्करोगाशी संबंधित आहे.

HPV infection होण्याची कारणं
1.    त्वचेला झालेल्या जखमेतून हा विषाणू त्वेचपासून त्वचेच्या संपर्कात आल्यावर होतो
2     हा विषाणू ज्यांच्या शरिरात आहे अशा व्यक्तीने दुसऱ्यासोबत संभोग केल्यास होतो.
3.    तोंडावाटे संभोग केल्यावर हा व्हायरस तोंडात आणि श्वसनमार्गात जाऊ शकतो.
4.     लैंगिक संबंधात जास्त सक्रिय असणाऱ्या महिलांना याची लागण होऊ शकते.

HPV infection ची प्राथमिक लक्षणं
*    एचपीव्ही असलेल्या बहुतेक लोकांना हे माहित नसते की त्यांना संसर्ग झाला आहे. त्यातून त्यांना कधीच लक्षणे किंवा आरोग्य समस्या निर्माण होत नाहीत
*    काही लोकांना जननेंद्रियाच्या मस्से आल्यावर त्यांना HPV असल्याचे कळते.
*    महिलांना पॅप चाचणीचा असामान्य परिणाम मिळाल्यावर त्यांना HPVअसल्याचे कळू शकते. (गर्भाशयाच्या कर्करोगाच्या तपासणीदरम्यान). गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सरच्या स्क्रिनिंग चाचण्या
*    ग्रीवा सायटोलॉजी ( PAP Smear Test)- पॅप स्मीअरमध्ये तुमच्या ग्रीवामधून पेशी गोळा करतात . साधारण वयाच्या 30 ते 65 वर्षांपर्यंत दर तीन वर्षांनी गर्भाशय मुखाची पॅपस्मिअर तपासणी करावी.
*    ऍसिटिक ऍसिड (VIA) लागू केल्यानंतर व्हिज्युअल तपासणी.
*    High-risk Human Papilloma Virus (HPV) DNA Testing- दर 5 ते 10 वर्षांनी करावे.

लसीद्वारे घाला या कॅन्सरला आळा
    आपल्या भारतात या कॅन्सरचा प्रतिबंध करण्यासाठी सध्यस्थितीला दोन लसी उपलब्ध आहेत. भारतात बायव्हॅलेंट आणि क्वाड्रिव्हॅलेंट एचपीव्ही लसींला 2008 मध्ये मान्यता मिळाली असून जवळपास 14 वर्षांपासून कॅन्सरविरोधात लस उपब्धत आहे. मात्र आजही त्याप्रमाणात या लसीबद्दल जनजागृती नाही. आता Nanovalent Vaccine सुद्धा उपलब्ध आहे जी HPV च्या ९ प्रकारच्या विषाणू विरोधात काम करते.
ही लस कधी घेता येते?

ही लस 0.5 मिली डोसमध्ये उपलब्ध आहे. ते डेल्टॉइड म्हणजेच  दंडामध्ये इंट्रामस्क्युलरली दिले पाहिजे. व्यक्ती लसीकरणादरम्यान बसलेले असावी आणि लसीकरणानंतर 15 मिनिटे निरीक्षण केले जाते.

1.    ९ ते १५ वयोगट ही मुलींसाठी लस घेण्याची योग्य वेळ.  ही लस दोन डोसमध्ये दिली जात असून, साधारण या डोसमध्ये 6 महिन्यांचा फरक असतो.

2.    १५-२६ वर्षांवरील मुलींसाठी तीन डोस (०, १-२ महिने, ६ महिने)

3.    तुम्ही जर २५-४५ वर्षांच्या आहात आणि ही लस घेतली नसेल तर तुम्हाला तीन डोस घ्यावे लागतील. (०, १-२ महिने, ६ महिने)

4.    ५ वर्षांवरील मुली ही लस घेऊ शकतात मात्र याचा प्रभाव कमी राहतो.

5.    ही लस मुलांमध्येही दिली जाऊ शकते. हे डोके, मान, ऑरोफॅरीन्क्स आणि त्यातील एनोजेनिटल कर्करोगांना प्रतिबंधित करते 
    9 ते 26 वयोगटातील मुलांना लसीकरण केले जाऊ शकते
    9-14 वर्षे 2 डोस 0, 6 महिने
    15-26 वर्षे 3 डोस 0, 2, 6 महिने

ही लस सुरक्षित आहे का?
*    आजपर्यंत कोणतीही गंभीर सुरक्षा समस्या किंवा दुष्परिणाम दिसले नाहीत
*    एचपीव्ही लस दिलेल्या सर्व वयोगटातील पुरुष आणि स्त्रिया, इंजेक्शन साइटला - वेदना (35-88%), लालसरपणा यांचा समावेश होतो (5-40%), आणि सूज (4-35%) येऊ शकते
*    एचपीव्ही लस सुरक्षित असून चांगल्या प्रकारे सहन केली जाते आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या व्यक्तींमध्येही वापरली जाऊ शकते.

    या सगळ्याचा निष्कर्ष असा आहे की, साध्या लसीच्या वापराने आपण अत्यंत प्राणघातक कर्करोग टाळू शकतो. आपण फक्त याबद्दल अधिक जागरूक असणे आवश्यक आहे.

 

डॉ. पल्लवी शेटे
स्त्रीरोग व प्रसुती तज्ञ
डॉ. हेडगेवार हॉस्पीटल, अमरावती