सूर्य संवेदना पुष्पे ,दीप्तीकारुण्यगंधने I
लब्ध्वा शुभं नववर्षेऽस्मिन कुर्यात्सर्वस्य मंगलम् ॥
(ज्याप्रमाणे सूर्य प्रकाश देतो,संवेदनेतून करूणे चा जन्म होतो,पुष्प सदैव सुगंध देतात त्याचप्रमाणे येणारे नवीन वर्ष हे आपल्यासाठी प्रत्येक दिनी व प्रत्येक क्षणी मंगलमय होवो)
निरामयच्या सर्व वाचकांना इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, निरामयचा पौष शुध्द प्रतिपदेचा हा पंचविसावा अंक राष्ट्रीय युवक दिनाच्या पावन दिवशी आपल्या पुढ्यात सादर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.
12 जानेवारी म्हणजेच स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस त्यांचे थोर विचार, राष्ट्रभक्ती,दूरदृष्टी,तरुण-तरुणींसाठी त्यांनी दिलेले उपदेश व मार्गदर्शन आजही तितकेच प्रासंगिक आहे.
सगळ्या जगावर त्यांनी आपल्या गहन शिकवणी आणि प्रभावी कृतींद्वारे अमिट छाप सोडली. शिकागो येथील १८९३च्या जागतिक धर्मपरिषदेत आपल्या उद्घाटनाच्या भाषणात त्यांनी श्रोत्यांना "माझे बंधू आणि भगिनी " म्हणून संबोधित केले आणि राष्ट्रीयत्वाचे व धर्माचे अडथळे तोडून टाकले. हे साधे पण शक्तिशाली संबोधन जगभरातील लोकांमध्ये प्रतिध्वनित झाले आणि जगाचा भारतीयांकडे पराधीन तसेच हीन भावनेने बघण्याचा दृष्टिकोन बदल . जगाला भारताच्या समृद्ध आध्यात्मिक वारशाची ओळख झाली तर प्रचलित रूढी आणि चालीरीतीना आव्हान दिले गेले. स्वामी विवेकानंदांच्या वैश्विक बंधुत्वाच्या संदेशाचा परिवर्तनकारी प्रभाव, देवाच्या निराकार स्वरूपावरील त्यांचे विचार, वैदिक ज्ञानाचे महत्त्व, भगवान बुध्दांचा अष्टांगिक मार्ग आणि भगवद्गीतेतील कर्माची संकल्पना आजही सर्वांसाठी अनुकरणीय आहेत.
स्वामी विवेकानंद यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, असंख्य लोकांना आपल्या देशाच्या सांस्कृतिक वारशाचा अभिमान बाळगण्यासाठी तसेच वसाहती अत्याचाराविरुद्ध लढण्यासाठी प्रेरणा दिली. शिक्षण आणि तरुणांचे सशक्तीकरण ही सामाजिक परिवर्तनाची गुरुकिल्ली आहे यावर त्यांचा ठाम विश्वास होता आणि त्यांनी परंपरागत आणि आधुनिक दोन्ही ज्ञान देणार्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. विवेकानंदांच्या शिकवणी आणि आदर्श असंख्य तरुणांच्या जीवनाला आकार देतात, कारण त्यांनी समृद्ध आणि आध्यात्मिकरित्या जागृत राष्ट्र निर्माण करण्यासाठी तरुणांची प्रचंड क्षमता ओळखली होती. “उठा, जागे व्हा आणि उद्दीष्ट साध्य होईपर्यंत थांबू नका…” असा संदेश त्यांनी तरुणांना दिला.
आपल्या भाषणांद्वारे त्यांनी आंतरधर्मीय सुसंवाद वाढवला आणि व्यक्तींना प्रेम, करुणा आणि सेवा या सार्वत्रिक मूल्यांचा स्वीकार करण्यास प्रेरित केले. भारताचा स्वातंत्र्यलढा, शिक्षण, युवक कल्याण आणि आध्यात्म यातील त्यांचे योगदान कितीतरी पिढ्यांना प्रेरणा देत आहे व सामाजिक परिवर्तन आणि आध्यात्मिक ज्ञान मिळवू पाहणाऱ्यांसाठी ते मार्गदर्शक प्रकाश आहेत. त्यांच्या याच विचारसरणीला अनुसरून युवा वर्गासंबधी विविध लेख या अंकात समाविष्ट करण्यात आले आहेत.
युवा शक्ती हा ऊर्जेचा प्रचंड स्त्रोत आहे परंतु त्या ऊर्जेचे योग्य दिशेने वहन होण्यासाठी योग्य मार्गदर्शन,अनुशासन,दूरदृष्टी तसेच प्रभावी नेतृत्व यांची गरज आहे. आजच्या काळात दिसणारी स्पर्धा, आत्मकेंद्री वृत्ती, सामाजिक मूल्यांचा ऱ्हास, दिखाऊपणा, कौटुंबिक आणि सामाजिक दडपण, आर्थिक विषमता, दिशाहीन मनस्थिती यामुळे युवा वर्गात नैराश्य, चिंता यासारखे मानसिक आजार बळावत चाललेले आहेत.एकीकडे स्वतःला सिद्ध करण्यासाठी मुलं प्रचंड मानसिक दडपणाखाली वावरताना दिसतात तर दुसरीकडे अगदीच बेफिकिर आणि स्वतःच्याच जगात मग्न, कुणाचाही,कसलाही विचार न करणारी व बऱ्याचदा व्यसनात गुरफटलेली अशी देखील पहायला मिळतात. अशावेळी आपण कुठे चुकतोय, कुठे कमी पडतोय याचा विचार करणे क्रमप्राप्त आहे. मानसिक आजाराबरोबरच उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयाचे विकार, अतिलठ्ठपणा हे आजार सुद्धा कमी वयातच बळावत चालले आहेत त्यांच्या कडेही दुर्लक्ष करता येणार नाही.यासाठी lifestyle modification म्हणजेच दैनंदिन जीवनात चांगल्या सवयी लावणे व वाईट व्यसनांचा त्याग करणे, योग्य आहार, व्यायाम, निद्रा इत्यादीचा अवलंब करणे आवश्यक आहे. कुठलाही बदल किंवा सवय अचानक निर्माण होत नसते त्यामुळे लहान वयापासूनच केवळ शैक्षणिक यश हे लक्ष्य न ठेवता मुलांमध्ये शारीरिक, मानसिक, भावनिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे तसेच अध्यात्मिक, सामाजिक मूल्ये रुजविणे ही काळाची गरज आहे. याप्रमाणे निर्माण झालेली सशक्त पिढी राष्ट्राची सर्वप्रकारे उन्नती करेल यात शंका नाही. कवी केशवसुतांच्या तुतारी कवितेतील या ओळी युवा वर्गाला नक्कीच प्रेरणा देतील अशी आशा आहे.
प्राप्तकाल हा विशाल भुधर
सुंदर लेणी तयात खोदा
निजनामे त्यावरती नोंदा
बसुनी का वाढविता मेदा
विक्रम काही करा चला तर "
डॉ प्रज्ञा बनसोड