नोव्हेंबर महिन्यात आमचे छोटेसे टिमटाला गाव ३ दिवस उत्साहाने उधाणलं होतं. निमित्त होतं श्री. एकनाथजी रानडे यांचा जयंती सोहळा ३ दिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्याचं !
कन्याकुमारी येथील जगप्रसिद्ध स्वामी विवेकानंद शिलास्मारकाचे शिल्पकार आहेत श्रद्धेय श्री. एकनाथजी रानडे आणि त्यांचे जन्मगाव आहे टिमटाला. अमरावतीपासून अवघ्या २५ किलोमीटर अंतरावर असलेले छोटे, ५०० लोकवस्तीचे गाव आहे टिमटाला. श्री एकनाथजीचे कार्य किती मोठे ! आपण अमरावतीकर सुदैवी की ते आपल्या अमरावती जिल्ह्याचे आहेत. त्यांच्या प्रती कृतज्ञता म्हणून जनकल्याण सेवा संस्था संचालित डॉ. हेडगेवार हॉस्पिटल , अमरावतीच्या माध्यमातून या गावात गेल्या ९ वर्षापासून आरोग्य सुविधा पुरविल्या जातात. संवेदना पंचक्रोशी प्रकल्प संचालक डॉ.मानसी कविमंडन आणि प्रकल्प समन्वयक डॉ.नितीन पारखी यांच्या मार्गदर्शनात , हॉस्पिटलच्या टिमटाला संवेदना आरोग्य सेवा प्रकल्पांतर्गत दि. १९ नोव्हेंबर २०२३ रोजी श्री.एकनाथजी यांची जयंती ३ दिवस विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी केल्या गेली.
उपचारासोबतच वेगवेगळे उपक्रमाच्या माध्यमातून आजूबाजूच्या गावामध्ये आरोग्यविषयक जनजागृती, प्रशिक्षण, मार्गदर्शन करून नागरिकांना आरोग्यदृष्ट्या सुदृढ करण्याचा हॉस्पिटलचा मानस आहे. त्या अनुषंगाने या आरोग्य प्रकल्पांतर्गत तसा सातत्याने प्रयत्न केल्या जातो. नुकत्याच पार पडलेल्या जयंतीच्या कार्यक्रमातून देखील तो उद्देश साधण्याचा प्रयत्न झाला.
डेंटल ओ.पी.डी.चा शुभारंभ
तीन दिवसीय जयंती सोहळ्यात पहिल्या दिवशी
दि. १७ नोव्हेंबर रोजी आरोग्य केंद्रावर डेंटल ओ.पी.डी.चा शुभारंभ करण्यात आला. विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी, अमरावतीद्वारा संचालित डेंटल कॉलेजच्या माध्यमातून ही ओ.पी.डी. सुरु झाली. या दिवसापासून हॉस्पिटलने दर महिन्याच्या दुसरया शुक्रवारी रुग्णांना दाताशी संबंधित आजारांवर गावातच उपचाराची सोय पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिली आहे. या शुभारंभ प्रसंगी संवेदना पंचक्रोशी प्रकल्प संचालक डॉ.मानसी कविमंडन, डेंटल कॉलेजचे पब्लिक हेल्थ विभागाचे प्रमुख डॉ. श्री. टीबलेवाल, डॉ.सौ. पुंडकर , डॉ.हेड गेवार हॉस्पिटलच्या दंतरोग तज्ञ डॉ.साक्षी शहा, जावरा गावचे उपसरपंच श्री.प्रशांत ठाकरे, डॉ.नितीन पारखी, ग्रामपंचायत सदस्य श्री.संजय सहारे, श्री.विशाल गावंडे, सौ. सुलोचना तिडके उपस्थित होते. यावेळी डेंटल ॲम्बुलंसचे पूजन श्रीफळ फोडून करण्यात आलं. लगेच उपस्थत १५ रुग्ण या दिवशी तपासल्या गेले. चहा नाश्ता होवून पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाचा समारोप झाला.
धाव स्पर्धा,आरोग्य प्रदर्शनी ,रांगोळी स्पर्धा !
खेळाच्या माध्यमातून पोरांचे निरामय आरोग्य निर्माण व्हावे ,हा उद्देश होता दुसर्या दिवशीच्या धाव स्पर्धेचा ! दुसरे दिवशी, दि. १८ नोव्हेंबर रोजी सकाळी लहान मुलांसाठी ३ गटात “धाव स्पर्धा” आयोजिली गेली. पहिल्या गटात वर्ग १ ते ५ चे विद्यार्थी, दुसर्या गटात ६ ते १० चे विद्यार्थी आणि तिसरा गट ११ वि आणि वरील सहभागी स्पर्धकांचा होता. प्रत्येक गटातून तीन बक्षीसे देण्यात आली. यामध्ये पहिल्या गटात ९, दुसऱ्या गटात २१, आणि तिसऱ्या गटात ३ स्पर्धक उतरले. खेळाच्या माध्यमातून पोरांचे निरामय आरोग्य निर्माण व्हावे, असा संदेश दिल्या गेला. डॉ. हेडगेवार हॉस्पिटलचे प्रबंधक श्री. संकेत सहारे व जनकल्याण सेवा संस्थेचे समन्वयक श्री. वैभव नागमोते यांनी स्पर्धकांना हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेचा शुभारंभ केला. याच दिवशी गावातील महिलांसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले गेले होते. महिलांना आरोग्य विषय देवून त्यावर रांगोळी काढायची होती. यामध्ये २३ महिला सहभागी झाल्या होत्या. आरोग्यविषयक वेगवेगळे संदेश देणाऱ्या रांगोळ्या यावेळी सहभागी महिलांनी काढल्या.यासोबतच सर्वांसाठी “आरोग्य प्रदर्शनी स्पर्धा” आयोजित केल्या गेली. यामध्ये सहभागी स्पर्धकांना विविध विषय दिले गेले होते. डासामुळे पसरणारे आजार व बचाव, दुषित पाण्यामुळे होणारे आजार व उपाय, सर्पदंश: काय करावे - काय नाही, अवयव दान, निरोगी जीवनासाठी आहार व दिनचर्या, मोबाईलचा वापर आणि दुष्परिणाम, दातांची काळजी कशी घ्यावी इ . यामध्ये हॉस्पिटलचा स्टाफ आणि गावातील स्पर्धक मिळून ६५ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेमध्ये एक गट इ. पहिली ते दहाविचा आणि दुसरा गट अकरावी आणि त्यावरील वयोगटातील स्पर्धकांचा होता. प्रत्येक गटातून ३-३ बक्षीस काढण्यात येणार होते.
दिंडी, अभ्यासिका उद्घाटन व “स्वस्थ ग्राम निरामय ग्राम” चा संकल्प
दि. १९ नोव्हेंबर रोजी म्हणजे प्रत्यक्ष जयंतीदिनी दिवसाच्या सुरुवातीला टिमटाला गावातून “आरोग्य दिंडी “ काढण्यात आली. श्री हनुमान मंदिरापासून आरोग्य दिंडीमध्ये नारे देत, घोषणा देत, हाती आरोग्य फलक घेत ही दिंडी संवेदना आरोग्य केंद्रावर पोचली. यावेळी संथेचे अध्यक्ष श्री. अजय श्रॉफ, विश्वस्त अविनाश भोजपुरे, सतीशजी बक्षी, सेवाव्रती श्री. श्रीरंग कविमंडन, सेवाव्रती सौ.वनिता कविमंडन, डॉ.अमित कविमंडन, डॉ. मानसी कविमंडन, अनिता कुलकर्णी या दिंडीत बालगोपाळांसह उत्साहाने सहभागी झाले.
गावातील विद्यार्थ्यांना प्रसन्न वातावरणात अभ्यास करता यावा, या उद्देशाने केंद्रावर सुरु करण्यात आलेल्या श्रद्धेय एकनाथजी रानडे अभ्यासिकेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष श्री. अजय श्रॉफ, ग्रापं. सदस्य श्री. संजय सहारे यांनी केले. श्रद्धेय एकनाथजीच्या प्रतिमेचे पूजन, हारार्पण आणि दीपप्रज्वलन झाले. विजेत्या स्पर्धकांना संस्थेचे अध्यक्ष श्री. श्रॉफ, विवेकानंद केंद्र अमरावतीचे अधिकारी श्री. चारुदत्तजी चौधरी, आणि विभाग कार्यवाह प्रा.डॉ.श्री.दत्ताजी रत्नपारखी, ग्रापं. सदस्य सौ. सुलोचना तिडके यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले. संवेदना पंचक्रोशी प्रकल्प संचालक डॉ.मानसी कविमंडन यांनी प्रस्तावना केली. प्रमुख वक्ते दत्ताजी यांनी एकनाथजी रानडे यांचे जीवन चरित्र उपस्थित लोकांसमोर उलगडले.
हॉस्पिटलच्या सामाजिक कार्यकर्त्या विजया चिखलकर यांनी सूत्रसंचालन केले तर अनिकेत कराळे यांनी आभार प्रदर्शन केले. “स्वस्थ ग्राम निरामय ग्राम” ची शपथ घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
अनिकेत कराळे
संवेदना आरोग्य केंद्र, टिमटाळा