साधारण एक महिन्यापूर्वी रात्री १२ वाजता एके दिवशी अचानक हॉस्पिटलमधून फोन आला, २ वर्षाच्या बाळाच्या गळ्यात चिकन बोन (फॉरेन बॉडी) अडकले आहे ! त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता. श्वास घेतांना आवाज येऊ लागला होता. अगदी गळून गेलेल्या अवस्थेत तो मुलगा होता. पालकांकडे चौकशी केली असता, त्यांनीच त्याला स्वतःसोबत चिकन खायला दिले होते. मात्र त्या छोट्याला ते नीट खाता आले नाही. ते त्याच्या स्वरयंत्रात अडकले आणि त्याला श्र्वास घेण्यासाठी त्रास सुरू झाला मग मात्र पालक घाबरले. एकंदर अवस्था कठीणच वाटत होती. हाताशी वेळ कमी होता आणि अशा प्रसंगी विशिष्ट पेडिऍट्रिक इंस्ट्रुमेंट्स आणि आपरेशन थीएटर वेगळे आवश्यक असते. पण तशी व्यवस्था नव्हती. आम्हीही हतबल होतो. पण तरीही डॉक्टर म्हणून हातावर हात ठेवून बसणे शक्य नव्हते. एक्स रे केला तेव्हा ते हाड स्वरयंत्राच्या बरोबर खाली अडकले होते. हवेची नळी जवळ जवळ ब्लॉक झालेली. त्याला आम्ही ओटी मध्ये घेतले पण ते सर्जरी झालीच नाही. अनेस्थेशिया देऊ शकलो नाही आणि म्हणून ऑपरेशन नाही. आय सी यू मध्ये भरती करण्यात आले परंतु प्रयत्नानंतरही ते बाळ पहाटे पहाटे दगावले. कितीही अपेक्षित असले तरी धक्कादायक असे ते सत्य ती आई पचवू शकली नाही. ती अक्षरशः कोसळलीच. अगदी हतबल झालो. आम्ही डॉक्टर देखील माणसं असतो. कुटूम्ब वत्सल असतो. ती घटना मनातून जातच नाहीये.
असे अपघात टाळण्यासाठी पालकांनी काळजी घ्यायला हवी. कान-नाक-घशाची रचना, त्यांची कार्यपद्धती समजून घेऊन त्यानुसार काळजी घेणे हे यातील धोके टाळण्यासाठी जरूरी असते. पालक म्हणून आपणास २४ तास मुलांकडे खरंच लक्ष देणे शक्य असते का आणि लहान मुलांना समज कमी असल्याने त्यांना आपण नेमके काय करत आहोत याचे गांभीर्य नसते.
लहान मुले काय खातात , काय करतात याची काळजी मुल ४ -५ वर्षाचे होइपर्यंत घेणे खूपच अगत्याचे असते. मुलांच्या बोटाच्या चिमटीत येतील अशा गोष्टी कटाक्षाने दूर ठेवा . एक जण मुलांच्या पाठी हवा असतो, लक्ष देण्यासाठी !पेन्सिल, खडू, खोडरबर, मनी, कडधान्य, बिया, पेनाचे टोपण, घड्याळातील सेल, स्पंजचा तुकडा किंवा काहीही मुले नाकात, कानात घालून दवाखान्यात येतात. काही नाणे, सेफ्टी पीन, टणक खाद्य पदार्थांचे तुकडे, बोल्ट इत्यादी अपघाताने गिळून अन्ननलिका किंवा श्वसनलिकेत अडकलेले घेऊन दवाखान्यात येतात. नेमके काय, कशात आणि कुठे अडकले आहे यानुसार त्याची तीव्रता असते. हे प्रकार जीवघेणेदेखील ठरू शकतात. अशा कान-नाक-घशात घातलेल्या किंवा अडकलेल्या वस्तूंना आमच्या वैद्यकीय भाषेत ‘फॉरेन बॉडी म्हणतात.खेळता-खेळता अनवधानाने तर कधी गंमत किंवा उत्सुकता म्हणून लहान मुलांच्या कानात, नाकात किंवा घशात काहीतरी जाते. आपल्याला बाहेर दिसणाऱ्या कानापासून आत कानाच्या पडद्यापर्यंत २.५ से. मी. लांबीची एक हाडाची नळी (एक्स्टर्नल आॅडिटरी कॅनल) असते आणि ती इंग्रजी ‘एस’ आकाराची असते. इथली त्वचा थेट हाडावरच असते आणि शरीरात इतर ठिकाणी असणारे त्वचेखालील विविध स्तर या भागात नसतात. म्हणूनच या भागात आजारात होणाऱ्या वेदना असह्य असतात.
कानाचा पडदा या नळीच्या शेवटी काही अंशात तिरपा असतो आणि इथून पुढे मधल्या कानाचा भाग सुरू होतो. बाहेरून निमुळत्या पोकळीसारख्या वाटणाऱ्या नाकात बऱ्यापैकी जागा असते आणि मागच्या बाजूला उतार असतो. नाक आणि घसा मागून एकमेकांना जोडलेले असतात. तोंड उघडून आत पाहिल्यावर दिसणाऱ्या भागांव्यतिरिक्त घशात खालच्या बाजूला श्वासननलिका (समोर) व अन्ननलिकांची (मागे) सुरुवात असते. श्वसननलिकेच्या सुरुवातीला स्वरयंत्र असते आणि श्वसननलिकेच्या तोंडावर एक झापड (इपिग्लोटीस) असते. नाकातून घेतलेला श्वास नाकातून मागे जाऊन घशात समोरच्या बाजूस असलेल्या श्वसननलिकेत येतो तर आपण खाल्लेला घास मागच्या बाजूस असलेल्या अन्ननलिकेत जातो. घशात या दोन्हीही प्रवाहांचे (एअर अॅण्ड फूड पॅसेज) क्रॉसिंग असते. आपण गिळताना त्या क्षणाकरिता श्वसननलिकेची झापड बंद असते तर बोलताना, रडताना, श्वास घेताना ती उघडी असते.कान-नाक-घसा एकमेकांशी जोडलेले असल्यामुळे आणि त्यांच्या क्लिष्ट रचनेमुळे कोणताही घरगुती उपाय न करतात तातडीने दवाखान्यात नेणे हिताचे असते.घरच्या घरी चिमट्याने काढण्याचा प्रयत्न करणे, शिंका याव्यात म्हणून तपकीर ओढायला देणे, कानात मनाने औषध किंवा घरगुती काही घालणे किंवा पाठीवर थोपटणे वगैरे प्रकार करण्यामुळे अधिकचा धोका संभवू शकतो.
कान, नाक, घशातील नाजूक भागांना धोका होण्याव्यतिरिक्त रक्तस्राव होण्याचा आणि या फॉरेन बॉडी श्वसननलिकेत वा अन्ननलिकेत जाण्याची दाट शक्यता असते.बाह्यरुग्ण विभागात सहजासहजी निघणाऱ्या या फॉरेन बॉडी काढण्याकरिता मग विनाकारण काथ्याकूट करावी लागते आणि श्वसननलिकेत गेल्यास जीवाला धोका होऊ शकतो तो वेगळाच. कानात किडा वगैरे गेल्यास घरगुती उपाय म्हणून एखादवेळेस घरी असलेले कोणतेही कानाचे ड्रॉप्स घातलेले चालतात पण इतर वेळेस म्हणजे तेव्हा फुगण्यासारख्या फॉरेन बॉडी (बिया, कडधान्य इ.) असतात तेव्हा असे करण्याने ते काढायला आणखीन अवघड होऊन बसते.
शक्यतो स्वत: काहीही न करता डॉक्टरांकडे जाणे हेच जास्त फायद्याचे आणि लवकरात लवकर त्रास कमी करणारे असते. श्वसननलिका किंवा अन्ननलिकेत अडकलेल्या फॉरेन बॉडी आॅपरेशन थिएटरमध्ये भूल देऊन दुर्बिणद्वारे काढाव्या लागतात. बऱ्याचदा लहान मुलांनी असे नाकात घातलेले दुर्लक्षित राहते आणि काही दिवसानंतर दुर्गंधी येणे किंवा रक्त येणे सुरू होते. नाकातल्या त्या “फॉरेन बॉडी” एव्हाना कुजलेल्या असल्यामुळे अशा प्रकारच्या रुग्णातदेखील भूल देऊन काढण्याची गरज पडते. पालकांनी त्यामुळे लहान मुलांत ती समज निर्माण करणे, जमेल तेवढे लक्ष देणे, अशावेळी घरगुती उपायांना टाळणे आणि वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक असते. वर उल्लेखित उदाहरणावरून पालकांनी मुलांच्या काय किंवा प्रसंगी मोठ्यांच्या घशात फॉरेन बॉडी अडकणे या गोष्टीला गांभीर्याने घेणे व तातडीने वैद्यकीय उपचार मिळणे आवश्यक आहे . योग्य ती खबरदारी घेतल्यास पालकांना अवेळी धावपळ करावी लागणार नाही, मुलांच्या जीवाला धोका होणार नाही आणि पालकांना आपल्या लाडक्या मुलांना कधीच कायमचे मुकावे लागणार नाही.
डॉ. रवी गणेशकर
कान, नाक, घसा आणि गळा कॅन्सर तज्ञ