ग्रामीण स्त्रियांचे आरोग्य

ग्रामीण स्त्रियांचे आरोग्यजागतिक आरोग्य संघटनेने आरोग्याचा विचार करताना त्यात शारीरिक, मानसिक, सामाजिक, सांस्कृतिक आरोग्याचा समावेश  असावा, अशी व्याख्या केली आहे. सुदृढ आरोग्य हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. निकोप, निरोगी आरोग्य हा प्रत्येकाचा मानवी हक्क असला तरी ते मिळवणे व टिकवणे ही एक प्रक्रिया आहे आणि त्यासाठी सतत प्रयत्नशील राहणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. सुदृढ आरोग्य हा एक ठेवा आहे आणि या भक्कम पायावरच आयुष्यरुपी जीवनाची इमारत उभी असते.

समाजात स्त्री आणि पुरुष हे दोनही घटक महत्वाचे आहेत. त्यातही स्त्री शहरी आणि ग्रामीण अशी विभागणी केल्यास ग्रामीण भागातील स्त्रियांमध्ये आरोग्य समस्या अधिक आहेत, हे वास्तव लक्षात येते.

आरोग्य आणि शिक्षण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.भारतीय संविधानाने माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला तर भारतीय स्त्रीला तर मनुष्यत्व प्राप्त करून दिले. संविधानाने स्त्रीला न्याय मिळालेला असला तरी देखील ग्रामीण स्त्री आजही आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी नाही आणि आत्मविश्वासी नाही. अन्याय, अत्याचार, मानसिक त्रास, तुच्छतेची वागणूक यामुळे स्वातंत्र्यापूर्वी ग्रामीण आणि दुर्गम भागातील लोक  त्यांच्या मूलभूत गरजा, अन्न, वस्त्र, निवारा, तसेच आरोग्य विषयक सुविधांपासून वंचित होते. तेव्हा आरोग्याचा प्रश्न गौण होता कारण प्रश्न भुकेचा होता आणि ग्रामीण स्त्रीला कुटुंबाची जबाबदारी, काबाडकष्ट आणि तिला घरात असलेले दुय्यम स्थान यामुळे आरोग्याबद्दल विचार करायला फुरसतच नव्हती. आज स्वातंत्र्य मिळून इतके वर्ष झाले तरी ग्रामीण भागातील चित्र फारसे बदललेले दुर्दैवाने दिसत नाही.

समाज जीवनाचा ५०% भाग असलेली स्त्री आज एकविसाव्या शतकात, विज्ञान युगात देखील निरक्षर, परावलंबी दिसते. तिची सर्वांगीण प्रगती व्हावी, विकासाच्या धारेत आणता यावे, यासाठी सरकार दरबारी देखील भरपूर प्रयत्न होतात. पण आजही ग्रामीण स्त्री अज्ञान, अत्याचार, गरिबी, चालीरीती, रुढी यातच गुरफटलेली दिसते. शहरी स्त्रिया सुशिक्षित, आत्मनिर्भर, स्वावलंबी तसेच आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र दिसतात. तरीही त्यादेखील कर्मकांड, पूजाअर्चा यामध्ये अडकल्या आहेत. म्हणूनच खेड्यातील अशिक्षित स्त्री आणि शहरातील सुशिक्षित महिला यांचे  सक्षमीकरण, स्त्री पुरुष समानता आणि स्त्रीमुक्ती  करणे गरजेचे आहे.

आज जागतिकीकरण होवून जग जवळ आले तरी देखील स्त्री-भ्रूणहत्येची समस्या आपल्याला अस्वस्थ करते. महाराष्ट्रामध्ये अंदाजे १००० पुरुषांमागे ९२९ स्त्रिया आहेत आणि ० ते ६ वयोगटात हे प्रमाण १००० मुलांमागे ९९४ असे दिसते. हे आकडे अत्यंत बोलके आहेत. म्हणूनच शासकीय स्तरावर गर्भधारणेपूर्वी आणि गर्भधारणेनंतर गर्भलिंग  निदानावर बंदी आहे. किंबहुना हा गुन्हा असून शिक्षेचीही तरतूद आहे. मुलगा हवा हा अट्टाहास बदलणे गरजेचे आहे. मुलगी जन्माला आली की पालन पोषण, शिक्षण, संगोपन, विकास याबाबतीत मुलगा आणि मुलीमध्ये भेदभाव केला जातो. ग्रामीण भागामध्ये जर १०० मुली चौथ्या वर्गात असतील तर पदवीपर्यंत केवळ 1/3 उरतात.

खरे तर निसर्गाने दिलेल्या अनेक जबाबदाऱ्या स्त्रीने आनंदाने स्वीकारलेल्या आहेत. त्यात मासिक धर्म, गर्भधारणा, प्रसुती, स्तनपान, बालसंगोपन, कुटुंबाची जबाबदारी अशा अनेक गोष्टी आहेत. यामुळे सुरुवातीपासूनच तिच्या निकोप वाढीसाठी आणि सुदृढ आरोग्यासाठी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. ग्रामीण, दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील स्त्री रुग्णालयात आणली जाते तेव्हा तिची अवस्था अतिशय वाईटच असते. रक्ताच्या थारोळ्यात, बेशुद्ध अवस्थेत स्त्रिया कित्येकदा दवाखान्यात येताच मृत्युमुखी पडतात. यामुळे मता मृत्यूचा दरही वाढतो. माता मृत्यू दर अत्यंत संवेदनशील असा इंडिकेटरच आहे. समाजाच्या आरोग्याचे मोजमाप हे स्त्रीच्या आरोग्यावरूनच केले जाते. वेगवेगळे राष्ट्रीय कार्यक्रम आणि सरकारी योजनाची, कृती आराखडा यांची अंमलबजावणी करणे, स्त्रिया आणि बालकांसाठी असलेल्या  योजना घरोघरी पोहोचवणे, माहिती देणे गरजेचे आहे. सुरक्षित मातृत्व, बालजीवित्वाचा कार्यक्रम, आरसीएच हा कार्यक्रम राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात सामावून घेण्यात आला. दुर्गम, अतिदुर्गम भागातील माता आणि बालकांना योग्य आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी यंत्रणा सतत प्रयत्नरत आहे. मात्र ग्रामीण महिलांमध्येच याबाबत जागरूकता दिसून येत नाही. सरकारी योजना विनामूल्य असून त्याचा लाभ घेण्याबद्दलची उदासीनतेचे कारण म्हणजे अज्ञान होय.जन्माला येणाऱ्या बाळाची निकोप आणि सुदृढ वाढ होण्यासाठी मातेचे आरोग्य देखील चांगले राहणे गरजेचे असते. यासाठी प्रसवपूर्व तपासणी, प्रसुतीमध्ये काळजी, प्रसूती पश्चात काळजी, स्तनपान, बाळाचे संगोपन, लसीकरण या गोष्टी उपलब्ध आहेत. तरुण मंडळींसाठी पौगंडावस्थेतील आरोग्याची काळजी घेण्यासाठी  दवाखाने आणि अनेक योजना देखील आहेत. तरुण वर्ग भावी नागरिक आहे आणि म्हणूनच त्यांचे भवितव्य महत्त्वाचे आहे. काही सामाजिक प्रश्नांकडे देखील डोळेझाक करून मुळीच चालणार नाही ज्यामध्ये मुल नसलेल्या स्त्रिया, कुमारी माता, विधवा माता, बलात्कारी स्त्रिया, वेश्या व्यवसाय करणाऱ्या भगिनी, कैदी महिला ई.साठी सामाजिक कार्यकर्ते, आरोग्य सेवक तसेच समुपदेशकांची आवश्यकता आहे. वृद्धाश्रमातील वृद्ध महिलांची  देखील स्वयंसेवी संघटना, कार्यकर्ते, शासन यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. मानवी मूल्यांवर आधारित समाज निर्माण करावयाचा असेल तर स्त्रियांच्या आरोग्याचा प्रश्न मुळापासूनच सोडविणे अपरिहार्य आहे. महिला विकास, सक्षमीकरणासाठी पुरुष वर्गाने पुढे येऊन पोषक वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे.

आजच्या  स्त्रीला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रगतीपथावर जावयाचे आहे.समाजाची इच्छाशक्ती, कायदे, सरकारी योजनाचा लाभ घेऊन पुढची सक्षम पिढी आणि सक्षम महिला निर्माण झाल्यास देशाची प्रगती खऱ्या अर्थाने होईल.कारण सुशिक्षित आणि सुदृढ माता आपल्या घराची प्रगती खऱ्या अर्थाने करू शकते. 

 

डॉ. पुष्पा अनिल थोरात
स्त्रीरोग तज्ञ, अमरावती