सद्य:स्थितीत विज्ञानाच्या लक्षणीय प्रगतीमध्ये माणसाच्या जीवनमानात आमुलाग्र बदल झाले आहेत. अर्थात ते प्रशंसनीय आणि स्तुत्यही आहेत.आपले जीवनमान निश्चितपणे उंचावलेले आहे पण परिणाम स्वरूप माणूस हा स्वयं केंद्रित झालेला आहे की काय, असं प्रत्येक संवेदननशील मनाला जाणवतं. आज संपत्ती, सत्ता आणि सन्मान या त्रयीला आयुष्यात इतकं प्राधान्य दिलं जातं की, मी व माझे (I, my, mine) या पलिकडेही एक जग आहे, ह्याचे विस्मरण होत आहे की काय,अशी दाट शंका डोकावू पाहत आहे आणि याचीच फलश्रुती म्हणून की काय, “निरामय“ त्रैमासिकाच्या आयोजकांना “आजच्या तरुण पिढीसाठी योग आणि अध्यात्माचे महत्त्व” या विषयावर लेखन व्हावं, असं वाटलं असं मी समजते. एखाद्या गोष्टीची गरज ही त्याच्या अभावामुळेच निर्माण होते, असा सामान्य समाज आहे.
मागील ४० वर्षांपासून अमरावतीत राजापेठ परिसरात दीपार्चन सभागृहात भारतीय योगाभ्यासींसाठी, भारतीय योगाभ्यासी मंडळातर्फे स्त्री व पुरुषांसाठी नि:शुल्क योग वर्ग चालतात. गेल्या दोन दशकांपासून मी स्त्रियांच्या योग वर्गात जाते आणि यथाशक्ती योगासने, प्राणायाम, ओंकार, जपयोग, निद्रा व ध्यानाभ्यास करते आणि योगप्रेमी भगिनींना शिकवते. आम्हा सर्वांच्या अनुभवातून मी निश्चितपणे सांगू शकते की, योगाभ्यास ही काळाची गरज आहे. सर्व वयाच्या स्त्री-पुरुषांसाठी
आजच्या उच्चविद्या विभूषित तरुण पिढीचा विचार करता असं दिसतं की,
१. प्रगत विज्ञानामुळे त्यांचे शारीरिक श्रम मोठ्या प्रमाणात कमी झाले असले तरी मानसिक श्रम मात्र वाढलेले आहेत. प्रत्येक नोकरदाराला व प्रामुख्याने उच्च पदाधिकाऱ्यांना (Target bound work) कामाचा मानसिक ताण फार वाढला आहे. ज्यामुळे Depression हा आजार बळावतो आहे .
२. उच्च शिक्षणामुळे ज्ञानाबरोबर आर्थिक स्वयंपूर्णताही वाढते आहे पण परिणामी अहंकारही वाढतो आहे.
३. खाण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत त्यात बऱ्याच वेळा हेल्दी फूड(Helathy Food) चा अभाव दिसतो . परिणामी पचनासंबंधीच्या तक्रारी वाढताना दिसतात.
४. नोकरीत व व्यवसायासाठी ही अतिशय तीव्र स्पर्धा झाल्यामुळे अनेक वेळा ती हेल्दी कॉम्पिटिशन न राहिल्यामुळे राग, द्वेष वाढण्याकडे कल होतो. या सर्व परिस्थितीचा विचार करता तरुण मन अशांत,अस्थिर आणि दुर्बल झाल्यामुळे वाईट सवयीच्या आहारी जाण्यास प्रवृत्त होऊन व्यसनाधीन होण्याची शक्यता वाढते. अर्थात सर्व तरुण पिढी व्यसनासक्त आहे असं मला अजिबातच म्हणायचं नाही. पण पूर्वीपेक्षा ते प्रमाण सातत्याने वाढताना दिसत आहे, हे नाकारता पण येत नाही .
५. विज्ञानाची लक्षणीय उपलब्धी म्हणजे मोबाईल आहे. विना कष्टाने कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान घरीच प्राप्त करण्याचे उत्कृष्ट साधन म्हणजे मोबाईल. पण हे दुधारी शस्त्र आहे, हे अजिबात विसरून चालणार नाही. त्याच्या उपयोगाने मिळणारे त्वरित ज्ञान हे तुमचे विचार, उचार व आचारांना निश्चितपणे समृद्ध करून श्रेष्ठत्वही देऊ शकतो व अधोगतीलाही नेऊ शकतो, या गोष्टीचे विस्मरण होऊन चालणार नाही. अर्थात लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना याची गरज व महत्त्व पटले आहे व त्याचा चांगला वापरही होताना दिसतो.
आता “योग” म्हणजे काय, याचा पण थोडक्यात विचार करू. योग हा युज धातूपासून आला असून युज युज्यते म्हणजे आत्म्याचे परमात्म्याशी मिलन, एकरूप होणे म्हणजे योग. महर्षी पतंजलीनी अष्टांग योगात यम,नियम, आसन, प्राणायाम व प्रत्याहार ह्यांचा अंतर्भाव "बहिरंग साधनेत " केला आहे. तसेच धारणा,ज्ञान व समाधी याला “अंतरंग साधना “असे विशद केले आहे .गीतेत भगवंतांनी,योगा: चित्तवृत्ती निरोधा:” हा व "समन्वय योग उच्यते ", अशी योगाची व्याख्या केली आहे. याचाच अर्थ असा की योग म्हणजे फक्त आसन आणि प्राणायाम याचाच अभ्यास नसून, ते मनुष्यत्वाकडून मुमुक्षत्वाकडे जाण्याचा मार्ग प्रशस्त करणारा एक अतिशय उत्कृष्ट आणि प्रभावी साधन(माध्यम) आहे, असे म्हटल्यास चूक ठरू नये .
प्रत्येकाच्या आयुष्यात “यश आणि अपयश “ येणारच आहे व ते अपरिहार्यही आहे. पण योगाभ्यासाने ते दोन्ही पचवण्याची शारीरिक आणि मानसिक क्षमता तुम्हाला प्राप्त होते . परिस्थितीशी लढण्याचे व त्यावर मात करण्याचे सामर्थ्य नियमित योगाभ्यासाने मिळते. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो .विचार स्पष्ट आणि प्रगल्भ होतात .परिणामी मन शांत, शुद्ध आणि स्थिर होऊन " नाहं कर्ता, हरी: कर्ता, हरी कर्ता ही केवलम" या वचनाचा अर्थ स्पष्ट होऊन परिणामतः परमेश्वरावरील श्रद्धा आणि प्रेम वाढतं आणि त्याचं निस्सिम भक्तीत रूपांतर होतं .कर्तेपणाची भावना संपुष्टात येऊ लागते व अहंकाराला आळा बसतो. अहंकार हा माणसाच्या भौतिक व आध्यात्मिक प्रगतीतला फार मोठा अडसर (धोंडा) आहे हे आपण जाणतो व मान्यही करतोच . थोडक्यात बुद्धिजीवी माणसाची शारीरिक,मानसिक, बौद्धिक व आध्यात्मिक उन्नती जितक्या लवकर होईल तितकं त्याचं आयुष्य सुखी,समृद्ध आणि समाधानी होईल. देव, देश आणि धर्मासाठी आयुष्य कारणी लावण्याची इच्छा प्रबळ होऊन आपल्या आई-वडिलांचे नाव उज्ज्वल करण्यातच मनुष्य जन्माचे सार्थक आहे, हेही पटेल व तसे आचरण करण्यास तो प्रवृत्त होईल .
So young man keep walking on the path of spirituality & believe that you can achieve anything in life and for that control yourself, alter your thinking & delete negativity. God bless you.
शोभा सोहोनी
रवीनगर, अमरावती