हिताशी स्यान्मिताशी स्यात्कालभोजी जितेंद्रिंयः |
पश्यन् रोगान् बहून् कष्टान् बुद्धिमान विषमाशनात् ॥
मानवाने सदैव हितकारी भोजन सेवन केले पाहिजे तसेच नेहमी परिमित म्हणजे थोडं जेवण केलं पाहिजे भुकेपेक्षा अधिक सेवनाने शरीराची हानी होते , आपल्या इंद्रियांवर जय मिळवून अन्न निर्धारित वेळेवर घ्यावे. बुद्धिमान व्यक्ती आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींना निरनिराळ्या आरोग्य समस्यांनी त्रस्त व ग्रस्त पाहून स्वतःला विषम किंवा अहितकारक पदार्थांपासून दूर ठेवतात.
हितकारी भोजन म्हणजेच ज्या भोजनामुळे उदरभरण तर होतेच परंतु त्याच बरोबर शरीराला आवश्यक असणारी ऊर्जा, प्रथिने ,चरबी किंवा मेद, विटामिनस्,मिनरल असे सर्व घटक संतुलित प्रमाणात मिळतात. असे हीतकारी भोजन शरीराच्या निकोप वाढीसाठी व आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक करते."अति सर्वत्र वर्जयेत " या उक्तीप्रमाणे आहार जरी पौष्टिक असला तरी त्याचे सेवन योग्य प्रमाणातच झाले पाहिजे प्रत्येकाने ते आपापल्या भुकेप्रमाणे ठरवावे. भुकेपेक्षा अधिक किंवा कमी भोजन सेवन केल्यास ते सुद्धा हानीकारक ठरू शकते. अन्नग्रहण नेहमी योग्य ठरलेल्या वेळीच करावे कारण जठरातील पाचकरसाचा स्त्राव हा रोजच्या ठरलेल्या वेळीच होत असतो असं असताना जेवण चुकीच्या वेळेत घेतले तर अजीर्ण, अपचन अशा समस्या उद्धवतात आणि त्यामुळे योग्य वेळेवर अन्नग्रहण करण्यातच बुद्धिमानी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.दैनंदीन जीवनात आपण आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींना अनेक आजारांशी त्रस्त व ग्रस्त झालेलं बघतो , बऱ्याचदा त्यांचा आजाराचे मूळ हे त्यांच्या चुकीच्या आहार पद्धती मध्ये मिळू शकते, त्यामुळे निरोगी राहण्यासाठी स्वतःला अहितकारक किंवा विषम अन्नपासून दूर ठेवणेच श्रेयस्कर!