युवकांचे स्फुर्तीदाते – स्वामी विवेकानंद 

भारताचा बंगाल प्रांत तेजाने उजळला
विश्वनाथ भुवनेश्वरी पोटी विवेकानंद जन्मला
महान विद्वत्ता घेऊन धर्मरक्षक बनला
युवकांचा स्फूर्तिदाता स्वामी विवेकानंद जाहला..१..

दत्त कुटुंबाचा  किर्तीसुगंध दरवळे
अचाट बुद्धिमत्तेचे वरदान तया लाभले
ईश्वरचंद्र विद्यासागरी शालेय शिक्षण घेतले
कोलकता प्रेसिडेन्सी कॉलेजचे एकमेव प्रथम ठरले......२..

धर्म,शास्त्र,इंग्रजी,समाजशास्त्र, कला, इतिहासात पदवी घेतली
खेळ,मल्लखांब यातही निपुणता मिळवली
वेद,अध्यात्म,गीता,रामायण,महाभारत अभ्यासली
देव खरंच दिसतो का , हीच  तळमळ जीवा लागली...३...

रामकृष्ण परमहंसाची -गुरुभेट जाहली
“चराचरात ईश्वर” ही गोष्ट ध्यानी उमगली!
देशाची दुरवस्था भ्रमंतीत  पाहिली
देशसेवेसाठी जनहितार्थ उडी घेतली.....४...

देशकल्याणार्थ  संन्यास व्रत घेतले
गुरुमाँ शारदेने आशीर्वाद दिधले
शिकागोच्या विश्वधर्म परिषदेत जगताचे मन जिंकले
भारताच्या धर्म संस्कृतीला समजावून सांगितले...५...

देश -विदेशात दिले वेदांताचे ज्ञान
वेदांत संस्था बहु स्थापून, ज्ञानी  केले थोर सान
जगतात उंचावली भारताची मान!
भारताकडे पाहण्याची दृष्टी बदलण्या दिले  योगदान...६...

किती किती विचार दिले सुंदर!
शिष्य थोर  जाहले जगभर
निवेदिता भगिनी त्यात अग्रेसर
राम कृष्ण मठांची लावली मोहर...७....

युवकांना दाविले मार्ग  रास्त शिक्षणाचे
दिप लाविले सर्वत्र तत्वज्ञानाचे
“उतिष्ठ ,जाग्रत !“ मंत्राने जागरण केले युवकांचे 
म्हणाले ,चालत राहा, क्षितिज मिळण्या ध्येयप्राप्तीचे...८...
नरेंद्रच ज्ञानतेजाने “स्वामी विवेकानंद” बनले
युवकांचे  प्रेरणास्त्रोत जाहले!
जगतश्रेष्ठ ज्ञानी म्हणूनी मान्यता पावले
अफाट बुद्धिमत्तेने लोक स्मृतीधर म्हणू लागले....९..

कन्याकुमारीत तीन वर्षे ध्यानस्थ राहिले
अमेरिकेतील  माझ्या बंधू भगिनींनो ,भाषणात संबोधिले
त्याच क्षणी असंख्य मनांशी नाते जुळविले
प्रेरणादायी विचारयुक्त ग्रंथ लिहिले....१०....

अवघ्या छत्तीस वर्षात पंचत्वात झाले विलीन
बारा जानेवारी त्यांचा जन्मदिन
साजरा होऊ लागला युवकदिन म्हणून
तेजस्वी सुंदर हा प्रज्ञावंत चिरायू राहीन ११...

स्वामी विवेकानंद झाले अमर
त्यांचे विचार मनामनात राहतील  निरंतर
आचरण त्यांच्या विचारांचे करी आत्मनिर्भर
कोटी नमन त्यांना , वाहूया  चरणी, पुष्पे ओंजळीभर.….१२...

 

डॉ. शुभांगी ना. इंगोले
कॅम्प रोड, अमरावती