भारतीय कालगणना समृद्ध आणि विकासोन्मुख आहे. हिंदू नववर्षाची सुरुवात चैत्रशुद्ध प्रतिपदेपासून होते. हाच शालिवाहन संवत्सराचा पहिला दिवस !भारतीय संस्कृतीत महत्त्वाचे मानले जाणारे साडेतीन मुहूर्त असून त्यापैकी गुढी पाडवा हा एक आहे. म्हणूनच नुतन कार्याचा आरंभ किंवा संकल्प या दिवशी केला जातो. ब्रह्मदेवाने या दिवशी जगाची निर्मिती केली म्हणून सृष्टीच्या आरंभाचा हा दिवस म्हटला जातो. प्रभू श्रीरामचंद्राने रावणासह अनेक दुष्ट राक्षसांचा संहार केला. याच दिवशी आयोध्या प्रवेश केला व नगरवासीयांनी गुढ्या, तोरणे उभारून त्यांचे स्वागत केले. त्या आनंदाचे प्रतीक म्हणून साजरा होणारा हा सण, गुढी पाडवा !
सृष्टी नव्या सौंदर्याने सजली असते.वृक्षाना कोवळी, नवी पालवी फुटलेली असते. कोकिळेचे मधुर कुजन सुरू झालेले असते. पळस, गुलमोहर लाल भडक फुलांनी बहरला असतो, मोगरा, कुंदा, रातराणी धुंद सुगंधाने वातावरण गंधित करतो. सर्वत्र आल्हाददायक वातावरण असते. दिवस मोठा झालेला असतो. काही ठिकाणी व्यापारी वर्ग नवीन वही खाते लिहीण्यास प्रारंभ करतात.
या दिवशी प्रात:काळी उठून आबालवृद्ध मंगल स्नान करतात. पहाटे स्त्रिया अंगण गाईच्या शेणाने सारवून,त्यावर सुंदर रांगोळी काढून अंगण सजवतात. दाराला आम्रवृक्षाचे तोरण बांधायचे. वेळूच्या काठीला नवीन खण, साखरेची गाठी, आंब्याची व कडुलिंबाची डहाळी, फुलांची माळ बांधायची. त्यावर तांब्या किंवा छोटा गडू पालथा घालायचा आणि मुख्य दरवाजाच्या उजव्या हाताला ही काठी उभी करायची जी म्हणजे गुढी. गुढीपूजनाचे वेळी पुढील मंत्राने प्रार्थना करावी.
ब्रह्मध्वज नमस्तेsस्तु सर्वाभिष्ट फलप्रद |
प्राप्तेsस्मिन्वत्सरे नित्यं मद् गृहे मंगलम् कुरु||
घरातील लहानथोर मंडळींनी मनोभावे गुढीचे पूजन करावे. कडूलिंबाची कोवळी पाने, फुले, मिरे, जिरे, हिंग, ओवा, मीठ यांचे मिश्रण करून चूर्ण बनवावे. आरोग्य प्राप्तीसाठी सर्वांनी याचे सेवन केल्यामुळे शरीर तेजस्वी आणि निरोगी राहते. गोड पक्वान्नाचा गुढीला नैवेद्य दाखवावा.
नवीन पंचांगाचे पूजन करून, तसेच त्यावरील गणपती, ब्राह्मण, ज्योतिषांचे पूजन करावे. त्यांना दान आणि इच्छित भोजन देवून संतुष्ट करावे. ब्राह्मणाकडून वर्णफल ऐकावे. गीत, वाद्य, पूर्ण पुरुषांच्या कथा ऐकून तो दिवस आनंदात घालवावा. म्हणजे संपूर्ण वर्ष सुखात जाते, पवित्र सुरुवात होते. संध्याकाळी सूर्यास्ताच्या पूर्वी गुढीचे पूजन करून ती उतरविण्यात येते. अन्य वेळी तांब्या पालथा घातला जात नाही. पण या दिवशी ब्रह्मतत्व अधिक प्रमाणात पृथ्वी तलावर असते. ते पालथ्या तांब्यात साठविले जाते. त्यामुळे सर्वांना या ब्रह्मतत्वाचा लाभ अधिक प्रमाणात होतो. गुढीला बांधलेल्या गाठीचा प्रसाद घेतल्यामुळे उन्हाचा त्रास होत नाही. नूतन वर्षाचा सूर्योदय अरीष्ट नाश करून सुखसमृद्धी आनंद देऊन प्रगतीचे दालन उघडीत असतो.
भारतीय कालगणनेमध्ये विक्रम संवत पंचांग सर्वमान्य आहे. सनातन धर्माचे अनुयायी विवाह, व्रतबंध, नामकरण, गृहप्रवेश यासारखी शुभकार्ये विक्रम संवत्सरानुसार करतात. इ.स. पूर्व ५७ मध्ये विक्रम संवताचा प्रारंभ झाला. उज्जैनचा राजा विक्रमादित्य याच्या नावावरून हे नाव देण्यात आले. त्याने शकांचा पराभव केला आणि प्रजेला भयमुक्त केले. त्याच्या विजयाच्या स्मरणार्थ विक्रम संवत पंचांगाचा शुभारंभ २०७९वर्षांपूर्वी झाला.
हिंदू नववर्ष दिनी पृथ्वीसह मानवी शरीरशास्त्र आणि मनावर काय परिणाम होतो, हे पाहणे अधिक महत्वाचे आहे. भारतीय दिनदर्शिका सांस्कृतिकदृष्ट्या व वैज्ञानिक दृष्ट्या महत्त्वाची आहे. कारण तिचा संबंध ग्रहाच्या हालचालीशी आहे. वसंत ऋतूचा आरंभ प्रतिपदेपासून होतो.तो आनंदाने, उत्साहाने परिपूर्ण असतो. मोगरा, आम्रमंजीरीचा सर्वत्र सुगंध दरवळत असतो. पिके कापणीला आलेली असतात. योग्य मोबदला शेतकऱ्याला मिळाल्यामुळे त्याच्या घरातही सुख-समृद्धी नांदत असते. नक्षत्र अनुकूल स्थितीत असणारा हाच काळ असतो. सूर्य विषुववृत्तावर असतानाच येणाऱ्या पहिल्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा ही नवीन वर्षाची सुरुवात असते.त्यालाच आपण चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच “गुढीपाडवा” असे म्हणतो.वर्षाचे बारा महिने सहा ऋतूंमध्ये विभागले गेले आहेत,जे कृषी चक्र, नैसर्गिक फुलांचे बहर, पानांची गळती आणि हवामानानुसार आहेत.
चैत्र शुद्ध प्रतिपदेला सूर्योदयाच्या वेळी ब्रह्मदेवाने विश्वाच्या निर्मितीची सुरुवात केली. याच दिवशी सम्राट विक्रमादित्याने आपल्या राज्याची स्थापना केली. तो विक्रम संवताचा हा पहिला दिवस आहे. हा दिवस प्रभू श्री रामचंद्र राज्याभिषेकाचा दिन म्हणूनही मानला जातो. यावर्षी तर श्री रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्याने अतिशय उत्साह दिसतो आहे. देवीच्या चैत्र नवरात्राचा हा पहिला दिवस. शक्तीची उपासना आणि भक्तीचे नऊ दिवस. शिखांचे दुसरे गुरु अंगद देव यांचा हाच जन्मदिवस असून याच दिवशी स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली. ”कृण्वन्तो विश्वमार्यम“ हा संदेश दिला. याच दिवशी सिंध प्रांतातील प्रसिद्ध समाज रक्षक वरुणावतार, भगवान झुलेलाल प्रगट झालेत.
विक्रमादित्त्याप्रमाणे शालिवाहनाने हुणांचा पराभव करण्यासाठी चैत्र शुक्ल प्रतिपदेची निवड केली आणि दक्षिण भारतात सर्वोत्तम राज्य स्थापन केले. युधिष्ठीराचा राज्याभिषेकाचा देखील हाच दिवस ! रा.स्व. संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचा जन्म याच दिवशी झाला.
असा हा सर्वदृष्टीने महत्त्वाचा दिवस. पण अलिकडे पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरणाने गुढी पाडव्यापेक्षा इंग्रजी नववर्षाच्या आरंभ दिनालाच विशेष महत्त्व देण्यात आले आहे. गुढी पाडव्याला लोक एकमेकांना शुभेच्छा संदेश देतीलच, असे नाही. पण १ जानेवारीला हॅपी न्यु इअर मात्र आवर्जून म्हणणार. या निमित्याने सर्वांनी आत्मपरीक्षण करून आनंदाने गुढीपाडवा साजरा करावा. म्हणजेच नववर्ष सुखाने, आनंदाने जाईल. नववर्ष आनंदाने जावे म्हणून ही सार्वजनिक प्रार्थना करावी.
स्वस्ति प्रजाभ्य: परिपालयन्तां |
न्यायेन मार्गेण महीं महिषा:।
गोब्राम्हणेभ्य: शुभमस्तु नित्यं !
लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु ।।
काले वर्षतु पर्जन्य, पृथिवी सस्यशालिनी।
देsशोयं क्षोभरहितो, ब्राह्मणा: सन्तु निर्भया: ॥
अपुत्रा : पुत्रिणः सन्तु, पुत्रिणः सन्तु पौत्रिण: |
अधना : सधनः सन्तु, जीवन्तु शरदाशतम् ॥
सर्वेsत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया :|
सर्वे भद्राणि पश्यन्तु | मा कश्चिदुःखमाप्नुयात् ॥
शुभं भवतु. सर्वांना गुढीपाडवाच्या शुभेच्छा !
डॉ. अल्का बेडेकर
विष्णु भुवन, बालाजी प्लॉट, अमरावती