रजोनिवृत्ती

रजोनिवृत्ती / ऋतुनिवृत्ती (Menopause) म्हणजे पाळी बंद होणं.     

स्त्रीच्या मासिक पाळी कायमची बंद होण्याला रजोनिवृत्ती म्हणतात. रजोनिवृत्तीमुळे हार्मोन्समध्ये होणारे बदल सामान्यतः महिलांच्या वयाच्या चाळीशीमध्ये सुरूवात होते. सरासरी भारतीय महिला पाश्चिमात्य देशांमधील महिलांच्या तुलनेत जवळपास पाच वर्ष लवकर रजोनिवृत्तीचा अनुभव घेतात.

रजोनिवृत्ती ही अचानक होणारी प्रक्रिया नाही आहे. रजोनिवृत्तीची विविध लक्षणं आपल्याला वयाच्या विविध टप्प्यांत दिसू लागतात. हा काळ वास्तवात स्त्रीच्या जीवनातील परिवर्तनकाळ असतो. बहुतांश हे परिवर्तन नकळत व अल्प प्रमाणात होत असल्याने स्त्रीला कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही, परंतु काही स्त्रीयांना विशेष त्रासाला सामोरे जावे लागते. जेव्हा सलग १२ महिने पाळी येत नाही तेव्हा मेनोपॉज झालेला असतो.

मेनोपॉज व्हायच्या आधी स्त्रियांची मासिक पाळी अनियमित होते, जास्त ब्लिडिंग होतं. मानसिक आणि शारीरिक थकवा जाणवायला लागतो. अशा भावना निर्माण होतात, ज्या आधी कधीच अनुभवलेल्या नसतात.

स्त्रियांमधील हार्मोन्सची पातळी बदलत असते. स्त्रियांची पाळी नियंत्रित करण्यामागे इस्ट्रोजेन या हार्मोनचा वाटा असतो. स्त्रियांच वय जसजसं वाढत जातं तसतसं त्यांच्या अंडाशयातील अंडी कमी होतात. इस्ट्रोजेनची लेव्हल कमी जास्त होत असते, आणि नंतर तर ती कमी होऊन जाते आणि याच दरम्यान मेनोपॉजची लक्षणं दिसून येतात.

शरीरावर होणारे परिणाम
1.  गर्भाशयाच्या तोंडाचा आकार लहान होतो
2.  गर्भाशयाला आधार देणारे स्नायू अशक्त होतात
3.  गर्भपिशवी आकाराने कमी होते. अंडाशय लहान होते
4.  इस्ट्रोजन व प्रोजेस्ट्रॉन नामक हार्मोन्स कमी होतात
5.  गर्भपिशवी खाली आल्याने मूत्रमार्गावरील नियंत्रण कमी होते
6.  मानसिक आरोग्य बिघडते
7.  चिडचिडेपणा वाढतो
8.  सहनशीलता कमी होते
9.  अंग एकदम गरम वाटायला लागणे
10. घाम सुटणे, अंग एकदम थंड पडायला लागते
11. डोकेदुखी जाणवत राहते
12. छातीत धडधड होते
13. झोप लागत नाही.

सगळ्याच महिलांना ही लक्षणं जाणवतात असं नाही, पण ७५ टक्के महिलांना यातली लक्षणं जाणवतात. तर उरलेल्या एक चतुर्थांश महिलांना गंभीर लक्षणं दिसून येतात. ही लक्षणं सरासरी सात वर्षांपर्यंत राहू शकतात. जगातल्या तीनपैकी एका महिलेला याहीपेक्षा जास्त काळ ही लक्षणं जाणवतात.

काही आजारांचे धोके उद्भवतात. त्यामध्ये ओस्टीओपोरोसीस, हृदय व रक्तवाहिन्यांचे आजार, स्तनांचा कर्करोग यांचा समावेश होतो. रक्तदाब वाढणे (Hypertension), मधुमेह (Diabetes Mellitus) यासारख्या व्याधी; डोकेदुखी, पायदुखी, कंबरदुखी, कमी दिसणे, कानामध्ये विचित्र आवाज येणे, कमी ऐकु येणे, याही तक्रारींची भर पडते. त्याच्या परिणामांमुळे महिलांची मानसिक स्थिती बिघडण्यात आणखीनच भर पडते.

या दरम्यान स्त्रियांमध्ये
1. उदासिनता (Depression)
2. अतिकाळजी (anxiety)
3. निद्रानाश (Insomnia)
4. मानसिक ताणतणाव
5. चिडचिडी वृत्ती (irritability) (Stress) ही लक्षणे थोड्याबहुत प्रमाणात आढळतात.

फार कमी स्त्रियांना माहीत आहे की रजोनिवृत्तीचे ३ टप्पे असतात-प्री- मेनोपॉज, मेनोपॉज आणि पोस्ट-मेनोपॉज.कमी वयातील मेनोपॉज (Early menopause)कमी वयात येणाऱ्या रजोनिवृत्तीच्या वेळेपुर्वीची रजोनिवृत्ती किंवा premature ovarian failure असेही म्हणतात. ४० पूर्वी येणार मेनोपॉज म्हणजे Early menopause. अर्थात कमी वयात प्रजनन क्षमता संपुष्टात येते. महिलांसाठी हि एक आव्हानात्मक स्थिती आहे.

वेळेपुर्वी येणारी रजोनिवृत्तीची कारणे :
l आनुवंशिकता
l खालावलेली जीवनशैली
l ऑटोइम्युन डिसऑर्डर
l केमोथेरपी किंवा रेडिओथेरपी उपचार
l धूम्रपान किंवा मद्यपान
l ओवरीयन सर्जरी (ओव्हरी काढून टाकलेली असणे)

प्रतिबंधात्मक उपाययोजना:
    रजोनिवृत्तीच्या कालावधीमध्ये होणारा शारीरिक आणि मानसिक त्रास कमी करण्यासाठी दैनंदिन जीवनशैलीत काही मूलभूत बदल करणे आवश्यक आहे. उदा. दिनक्रम तणावरहित राखणे; शरीराचे वजन संतुलित राखण्यासाठी हलका आहार घेणे; शारीरिक व्यायाम (४० मिनिटे दररोज असे आठवड्यात निदान ५ दिवस) करणे;
-    आहारात कॅल्शियमयुक्त पदार्थांचा अधिक समावेश करणे;
-    सकस व संतुलित आहार घेणे;
-    भरपूर पाणी पिणे इत्यादी.

स्त्रीरोगतज्ञ खालील चाचण्यांची शिफारस करू शकतातः
फॉलिकल-उत्तेजक संप्रेरक (FSH):
जेव्हा तुम्ही रजोनिवृत्तीकडे जाता, तेव्हा FSH वर जातो.

एस्ट्रॅडिओलः
एस्ट्रॅडिओलची पातळी आपल्या अंडाशयाद्वारे किती इस्ट्रोजेन तयार होत आहे हे सांगते. रजोनिवृत्ती दरम्यान, एस्ट्रॅडिओलची पातळी कमी होते.

थायरॉईड संप्रेरकः
थायरॉईड ग्रंथीच्या समस्यांमुळे रजोनिवृत्तीची नक्कल करणारी लक्षणे उद्भवतात.

रजोनिवृत्तीच्या लक्षणांसाठीची उपाययोजनाः

१)    निद्रानाशासाठी झोपेची औषधे
२)    योनीच्या शोषासाठी इस्ट्रोजेन-आधारित वंगण आणि मॉइश्चरायझर्स (ज्याला स्थानिक हार्मोन थेरपी देखील म्हणतात)
३)    केस गळणे आणि केस गळणे यासाठी काही औषधे 
4)    पोस्टमेनोपॉझल ऑस्टिओपोरोसिस (कमकुवत आणि ठिसूळ हाडे) साठी औषधे आणि व्हिटॅमिन डी पूरक.
5)    UTIS साठी प्रतिजैविक
6)    उदासीनता, चिंता साठी औषधे
7)    हॉट फ्लॅशसाठी हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी (HRT)
8)    जीवनशैलीत बदल जसे की धूम्रपान बंद करणे आणि अल्कोहोलचे सेवन कमी करणे. 

या वयात त्यांना समजून घेणे, समजावून सांगणे, त्यांच्याशी आत्मियतेने वागणे महत्त्वाचे आहे. म्हणून त्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकुन घेणे अतिशय गरजेचे असते. घरातील स्त्री चार दिवस बाहेर गेली की
    " तू गेल्यावर फिके चांदणे
    घर परसूही सुने सुके,
    मुले मांजरापरी मुकी अन्
    दर दोघांच्या मधे धुके ".

अशी अवस्था होऊन सगळे भांबावतात ना अगदी तसंच इस्ट्रोजेन नाहीसं झाल्यावर शरीरातील अवयवांचं होतं. घरातील सर्व मंडळींनी समजून घेऊन स्त्रीला ह्या काळात मानसिक आधार देणे गरजेचे असते.

 

डॉ. सुयोगा पानट
स्त्रिरोग व प्रसुतिशास्त्र तज्ञ