प्रकाशचे बाबा एरवी शांत स्वभावाचे. हसतमुख. मात्र अलीकडे त्यांची चिडचिड वाढली होती आणि जोडीला विसरभोळेपणाही. आपली साधी कामे करताना त्यांचा गोधळ होई. कधी तर न सांगता घरून निघून जात. त्यांच्याजवळ नेहमी घरचा पत्ता आणि संपर्क क्रमांक असे. पण यामुळे घरचे काळजीत असत. हा स्मृतिभ्रंश असू शकतो .
बहुतेकदा आपल्या घरातील वृद्ध व्यक्तीला स्मृतिभ्रंश झाला आहे, हे समजायलाच वेळ लागतो. विसरणे, स्वभावामध्ये काही प्रमाणात बदल होणे, नेहमीची कामे न करता येणे आणि मग ती न करणे हे सगळे वृद्धत्वाचा नैसर्गिक भाग आहे, असे घरच्यांना वाटते, त्यामुळे सुरुवातीचे अनेक महिने किंवा वर्षे योग्य उपाय केले जात नाहीत. लक्षणे दिसायला लागली की लवकरात लवकर डॉक्टरांकडे गेले की, आवश्यक त्या चाचण्या आणि उपचार सुरू होऊ शकतात. डिमेन्शियाच्या उपचारांचा उद्देश बौद्धिक क्षमता आणि मेंदूतील बदल होण्याचा वेग कमी करणे, जितकी शक्य आहे तितकी रुग्णाची कार्यक्षमता कायम राखणे, लक्षणांची तीव्रता कमी करणे असा असतो. दैनंदिन कामे करता येणे, स्वतःची काळजी स्वतःला घेता येणे, संभाषण करता येणे, आपल्या गरजा घरच्यांना सांगता येणे, लघवीवरील आणि शौचावरील नियंत्रण कायम राहणे अशा अनेक क्षमता जास्तीत जास्त काळपर्यंत कायम राखता आल्या तर नातेवाईक किंवा मदतनीस अशा काळजीवाहकांवरील भार वाढत नाही आणि रुग्णाची काळजी घेणे सोपे होते.
डिमेन्शियाचे निदान झाल्यावर रुग्णाचे नातेवाईक आणि रुग्ण दोघांनाही ते निदान सांगणे आवश्यक ठरते. अगदी सुरुवातीच्या टप्प्यात रुग्ण असेल तर आपल्याला येत असलेल्या अडचणींची त्यांना जाणीव असते, आपल्या क्षमता कमी होत चालल्याचे जाणवते आणि त्यामुळे एक प्रकारची भीतीही वाटते, कधी निराश वाटते. आपले निदान काय आहे हे कळल्यावर भावना उचंबळून येतात. मनात अनेक शंका निर्माण होतात. आपले कसे होणार याची काळजी वाटते. अशा वेळी त्यांना घरच्या लोकांनी सांभाळून घेणे, समजावून घेणे अगत्याचे असते.
रुग्णाला घेऊन जेव्हा नातेवाईक डॉक्टरकडे जातात, तेव्हा डॉक्टरांनी त्यांना संवेदनशिलतेने उपचार सुचविणे महत्वाचे असते. रुग्ण आणि त्याचे नातेवाईक गोंधळलेले असतात, काळजीत असतात. कधी तर रुग्णाचे हे प्रमाण वाढले की कुटुंबीय हवालदिल होतात, या टप्प्यावर त्यांना आधार देणे हे डॉक्टरांचे काम असते.
डिमेन्शियाच्या रुग्णांमध्ये राग येणे, उत्तेजित होणे, बेचैन होणे, समाजात वावरताना किंवा घरात वागताना अनिर्बंध वागणे (कपड्यांचे भान नसणे, लैंगिक भावना वाढीस लागणे इ. त्यांना आपलेपणाने काळजी करणाऱ्या कुटुंबियांच्या भावनांची कदर नसणे, अलिप्तपणा असे अनेक बदल वर्तणूकीत आढळून येतात. त्याचबरोबर संशयीपणा, भास होणे, झोप न येणे, उदासपणा, निराशा अशीही लक्षणे आढळतात.पण रुग्ण मुद्दाम असे वागत नाहीत. त्यांना होणार्या स्मृतिभ्रंशाच्या त्रासाने ते असे वागतात, हे लक्षात घेणे महत्वाचे असते .
अशा वेळी डॉक्टरकडे वेळीच नेल्यास रुग्णांची तपासणी करून औषधे दिली जातात. रुग्णाला औषध सहन होते की नाही ते पाहून त्याचा डोस वाढवला जातो. या औषधांनी १०० % बदल होत नाहीत, पण रुग्णाचे वागणे, स्मरणशक्ती यातील दोषांची तीव्रता कमी होते, हा त्रास होण्याचे प्रमाण कमी होवून तब्येत लवकर बिघडत नाही. त्रासाचा कालावधी वाढतो. मात्र औषधांचे काही दुष्परिणाम असतात. यामुळे रुग्णाला भूक न लागणे, वजन कमी होणे, पोटात मळमळणे, झोप कमी होणे, कधी कधी हृदयाची गती कमी होणे , हा त्रास होतो आहे का, याकडे लक्ष द्यावे लागते.
भावनिक आधार :
स्मृतिभ्रंशावर उपाय करताना केवळ औषधे देऊन पुरत नाही. रुग्णाची स्मरणशक्ती, दैनंदिन कामे, वर्तणुकीच्या समस्या या सगळ्यांकरिता रुग्णाशी संवाद साधणे, वर्तणुकीचे उपाय करणे उपयोगी असते. स्मरणशक्तीचे खेळ, व्यायाम रुग्णांना सांगितले जातात .रुग्णाच्या बुद्धीला, स्मरणशक्तीला चालना द्यायला चांगला उपयोग होतो. काही वेळेस भूतकाळातील आठवणी, अनुभव इतरांसमोर मांडायला प्रोत्साहन दिले जाते आणि ती त्या रुग्णाची ताकद ठरते. यातून रुग्णांना भावनिक आधार मिळतो, आत्मविश्वास वाढतो. रुग्णावर चिडचिड न करता त्यांना समजावून घ्या. त्यांना भावनिक आधार द्या.यामुळे रुग्ण आणि कुटुंबीय दोघांचा त्रास कमी होईल.
रुग्ण मनातील गोष्टी जमतील तशा व्यक्त करतात. रुग्णाचे असंबद्ध वागणे, बोलणे तज्ञ जाणून घेतात, यामुळे रुग्णाला बरे वाटते . मात्र रुग्णाच्या वर्तणुकीत झालेल्या बदलांसाठी वेगवेगळे उपाय करावे लागतात. त्यांचा रोजचा दिनक्रम नक्की करणे, वर्तणुकीच्या समस्या काही विशिष्ट कारणाने निर्माण होतात का ते कारण शोधणे, घरातून बाहेर जायला मिळाले नाही, भूक लागली की, सतत प्रश्न विचारणे अशी कारणे लक्षात आली तर त्यावर उपाय करता येतात.घरातून बाहेर जाणे, राग येणे, उत्तेजित होणे यामध्ये रुग्णाच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी लागते. त्यांना सुयोग्य सवयी लावून, सरावाने काही करून कामे घ्यावी लागते. रुग्ण या सवयी विसरणार नाहीत असा प्रयत्न करावा लागतो .
रुग्णाशी काही प्रेमाने बोलणे, त्यांना वेळ देणे ,काही बौद्धिक छंद , कोडे सोडवणे, क्यूब लावणे, बुद्धिबळ,पत्ते खेळणे असे उपाय केले जातात. वृत्तपत्र वचन, चालू घडामोडींची चर्चा, रुग्णाची मते जाणून त्यांना ती व्यक्त करायला सांगणे, घरातील, बागेतील छोटी कामे करणे, यातून बुद्धीला चालना मिळते. रुग्णाच्या कलात्मकतेला प्रोत्साहन देणे , सामुहिक छोटे खेळ खेळण्याने एकत्रितपणाची भावना निर्माण होते.रुग्ण एकटा असल्यास रुग्णाच्या सुरक्षेची काळजी घेणे, वृद्ध व्यक्ती हरवू नये यासाठी नाव, पत्ता लिहून कायम रुग्णांच्या जवळ ठेवणे, मित्र ,आप्त , कॉलनीतील ग्रुपवर त्यांचा लेटेस्ट फोटो ठेवून आजाराची माहिती देवून ठेवल्यास सगळेच अशा वेळी मदत करत, रुग्ण दिसल्यास प्रेमाने चौकशी करून घरी नेणे, कुटुंबियांना कळवणे अशी मदत करतात. डॉक्टर, कुटुंब , शेजारी आणि समाजाने अशी मदत केल्यास अशा रुग्णाचे उपचार, काळजी घेणे सोपे होवू शकते. साथी हाथ बढाना ...ही भावना असल्यास अशा रुग्णाचे उपचार सोपे होतात. कोणीतरी मदतीला आहे, ही भावना कुटुंबाला दिलास देते.
नियमित व्यायाम, पुरेशी झोप, मित्र मैत्रीणीना भेटणे, आनंदी राहणे, आपल्या समस्या शेअर करणे, कोडी सोडवणे अश्या काही सध्या गोष्टींमुळे स्मृतिभ्रंशाचा धोका आपण कमी करू शकतो.
डॉ. दीपाली विधळे
वृद्धोपचार तज्ञ